उपवासकाळातील तिसरा सप्ताह
शुक्रवार दि. २८ मार्च २०२५
प्रतिसाद : मी प्रभू तुमचा देव आहे.
१) कुणा अपरिचिताचे बोलणे मला ऐकू येत आहे. तुमच्या खांद्यावरले ओझे उतरणारा मीच. हातामधल्या पाट्या काढून टाकणाराही मीच. संकटात तुम्ही धावा केलात; मी तुम्हांला सोडवले.
२) वादळी मेघात मी दडलेला असताना तुम्हांला उत्तर दिले. मरिबा येथल्या झऱ्याजवळ मी तुमची कसोटी घेतली इस्रायली जनहो, जरा माझे ऐकायचे होते!
३) तुम्ही अन्य देवतांच्या भजनी लागू नका. परक्या देवतांच्या पाया पडू नका. इजिप्त देशातून तुम्हांला बाहेर आणणारा, मी प्रभूच तुमचा देव आहे.
४) माझ्या लोकांनी माझे ऐकले तर, इस्राएल लोक माझ्या मार्गाने चालाले तर! इस्राएलला मात्र मी उत्तमपैकी गहू खायला घालीन; पहाडावरल्या मधाने तृप्त करीन.
शास्त्र्यांपैकी एक जण त्यांचा वाद ऐकून आणि येशूने त्याला समर्पक उत्तर दिले हे पाहून पुढे आला आणि त्याने येशूला विचारले, "सर्वात पहिली आज्ञा कोणती?" येशूने उत्तर दिले, "पहिली ही की, हे इस्राएल, ऐक; आपला देव परमेश्वर हा अनन्य परमेश्वर आहे आणि तू आपला देव परेमश्वर ह्याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जिवाने, संपूर्ण बुद्धीने व संपूर्ण शक्तीने प्रीती कर. दुसरी ही की, जशी स्वत:वर तशी आपल्या शेजाऱ्यांवर प्रीती कर. ह्यापेक्षा मोठी अशी दुसरी कोणतीही आज्ञा नाही." तो शास्त्री त्याला म्हणाला, "गुरुजी, आपण ठीक व खरे बोललात की, तो एकच आहे आणि त्याच्याशिवाय दुसरा कोणी नाही; आणि संपूर्ण मनाने, संपूर्ण बुद्धीने व संपूर्ण शक्तीने त्याच्यावर प्रीती करणे आणि जशी स्वत:वर तशी आपल्या शेजाऱ्यांवर प्रीती करणे, हे सर्व होमार्पणे व यज्ञ ह्यापेक्षा अधिक आहे." त्याचे हे सुज्ञपणाचे उत्तर ऐकून येशू त्याला म्हणाला, "तू देवाच्या राज्यापासून दूर नाहीस.” तेव्हापासून त्याला आणखी काही विचारण्याचे कोणालाही धैर्य झाले नाही.