उपवासकाळातील पहिला सप्ताह
सोमवार दि. १० मार्च २०२५
“ज्याअर्थी तुम्ही ह्या कनिष्ठ बंधूंपैकी एकासाठी केले त्या अर्थी ते माझ्यासाठी केले आहे."
येशूने आपल्या शिष्यांना म्हटले,"जेव्हा मनुष्याचा पुत्र आपल्या वैभवाने सर्व देवदूतांसह येईल, तेव्हा तो आपल्या वैभवशाली राजासनावर बसेल. त्याच्यापुढे सर्व राष्ट्रे जमवली जातील आणि जसे मेंढपाळ शेरडांपासून मेंढरे वेगळी करतो तसे तो त्यांना एकमेकांपासून वेगळे करील आणि मेंढरांना तो आपल्या उजवीकडे व शेरडांना डावीकडे ठेवील. तेव्हा राजा आपल्या उजवीकडच्यांना म्हणेल, अहो, माझ्या पित्याचे आशीर्वादितहो, या, जे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुम्हांकरिता सिद्ध केले आहे, ते वतन घ्या. कारण मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खायला दिले. तान्हेला होतो तेव्हा मला प्यायला पाणी दिले. परका होतो तेव्हा मला घरात घेतले. उघडा होतो तेव्हा तुम्ही वस्त्र दिले. आजारी होतो तेव्हा माझ्या भेटीला आला. बंदिशाळेत होतो तेव्हा तुम्ही माझ्याकडे आला. त्यावेळेस नीतिमान त्याला उत्तर देतील, “प्रभूजी,आम्ही तुम्हांला केव्हा भुकेले पाहून खायला दिले ? केव्हा तान्हेला पाहून प्यायला दिले? तुम्हांला परके पाहून केव्हा घरात घेतले ? उघडे पाहून केव्हा वस्त्र दिले? आणि तुम्हांला आजारी अथवा बंदिशाळेत पाहून केव्हा आम्ही तुमच्याकडे आलो? तेव्हा राजा त्यांना उत्तर देईल, “मी तुम्हांला सत्य सांगतो ज्याअर्थी तुम्ही कनिष्ठ बंधूपैकी एकाला केले, त्या अर्थी ते मला केले आहे. मग डावीकडच्यानाही तो म्हणेल, अहो, शापग्रस्तहो माझ्यापुढून निघा. सैतान आणि त्याचे दूत ह्यांच्यासाठी जो सार्वकालिक अग्नी सिद्ध केला आहे त्यात जा. कारण भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खायला दिले नाही. तान्हेला होतो तेव्हा मला प्यायला पाणी दिले नाही परका होतो तेव्हा मला घरात घेतले नाही. उघडा होतो तेव्हा मला वस्त्र दिले नाही आजारी व बंदिशाळेत होतो तेव्हा माझ्या भेटीला आला नाही. त्यावेळेस हेही त्याला उत्तर देतील, प्रभुजी, आम्ही केव्हा तुम्हांला भुकेले, तान्हेले, परके, उघडे, आजारी किंवा बंदिशाळेत पाहिले आणि तुमची सेवा केली नाही? तेव्हा तो त्यांना उत्तर देईल, मी तुम्हांला सत्य सांगतो की, ज्याअर्थी ह्या कनिष्ठांपैकी एकालाही केले नाही, त्याअर्थी ते मला केले नाही. ते तर सार्वकालिक शिक्षा भोगायला जातील आणि नीतिमान सार्वकालिक जीवन उपभोगायला जातील