उपवासकाळातील दुसरा सप्ताह
मंगळवार दि. १८ मार्च २०२५
येशू लोकसमुदायांस व आपल्या शिष्यांस म्हणाला, “शास्त्री व परूशी हे मोशेच्या आसनावर बसले आहेत. म्हणून ते जे काही तुम्हांस सांगतील ते सर्व आचरीत व पाळीत जा. परंतु त्यांच्या कृतीप्रमाणे करू नका, कारण ते उपदेश करतात पण तसे आचरण करत नाहीत. जड अशी ओझी बांधून ते लोकांच्या खांद्यांवर देतात, परंतु ती काढण्यास ते स्वतः बोटही लावावयाचे नाहीत. आपली सर्व कामे लोकांनी पाहावी म्हणून ते ती करतात. ते आपली मंत्रपत्रे रुंद व आपले गोंडे मोठे करतात. जेवणावळीतील श्रेष्ठ स्थाने, सभास्थानांतील श्रेष्ठ आसने, बाजारात नमस्कार घेणे व लोकांकडून गुरुजी म्हणवून घेणे त्यांस आवडते. तुम्ही तरी आपणास गुरुजी म्हणवून घेऊ नका, कारण तुमचा गुरू एक आहे व तुम्ही सर्व भाऊभा आहात. पृथ्वीवरील कोणाला आपला पिता म्हणू नका, कारण तुमचा पिता एक आहे. तो स्वर्गीय आहे. तसेच आपणास स्वामी म्हणवून घेऊ नका, कारण तुमचा स्वामी एक आहे. तो ख्रिस्त होय. पण तुमच्यामध्ये जो मोठा असेल त्याने तुमचा सेवक व्हावे. जो कोणी स्वतःला उंच करील तो नमविला जाईल आणि जो कोणी स्वतःला नमवील तो उंच केला जाईल.”