उपवासकाळातील ३ सप्ताह
मंगळवार दि. २५ मार्च २०२५
प्रतिसाद : हे प्रभो, तुझ्या इच्छेप्रमाणे वागण्यास मी तयार आहे.
१. यज्ञ आणि अर्पणे ही तुला हवीशी नसतात, पण ऐकायला तू माझे कान उघडे ठेवले आहेत. होमबली आणि पापबली तुला नकोत. ह्यावरून मी म्हणालो : पाहा, मी तयार आहे !
२. ग्रंथपटात माझ्याविषयी लिहून ठेवले आहे की, तुझ्या इच्छेप्रमाणे मी वागावे. माझ्या देवा, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यात मला आनंद वाटतो, तुझे वचन माझ्या अंतर्यामी आहे.
३. हे प्रभो, महासभेत मी तुझ्या नीतिमत्वाचा पुरस्कार केला. मी आपले तोंड बंद ठेवले नाही, हे तुला माहीत आहे.
४. तुझे नीतिमत्व मी माझ्या हृदयात लपवून ठेवले नाही. तुझी विश्वसनीयता व मुक्तीची योजना मी जाहीर केली. तुझी दया आणि तुझे सत्य मी महासभेपासून गुप्त ठेवले नाही.
दुसरे वाचन इब्री १०:४-१०
वाचक : इब्री लोकांस पत्र यातून घेतलेले वाचन
बैलांचे आणि बकऱ्यांचे रक्त पापे दूर करण्यास असमर्थ आहे. म्हणून ख्रिस्त जगात येण्याच्या वेळेस म्हणाला, "यज्ञ आणि अन्नार्पण ह्यांची तुला इच्छा नव्हती, तू माझ्यासाठी शरीर तयार केले. होमांनी आणि पापाबद्दलच्या अर्पणांनी तुला संतोष नव्हता.
ह्यावरून मी म्हणालो, 'पाहा, हे देवा', ग्रंथपटात माझ्याविषयी लिहून ठेवले आहे, "तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी मी आलो आहे."
वर उल्लेखिल्याप्रमाणे तो म्हणाला, "यज्ञ, अत्रार्पणे, होम आणि पापाबद्दलची अर्पणे, ह्यांची इच्छा तुला नव्हती आणि त्यात तुला संतोष नव्हता" (ही नियमशास्त्राप्रमाणे अर्पिण्यास येतात ) आणि मग तो म्हणाला, "पाहा, मी तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यास आलो आहे." ह्यात दुसरे स्थापण्यासाठी तो पहिले नाहीसे करतो. त्या इच्छेने आपण येशू खिस्ताच्या एकदाच झालेल्या देहार्पणाद्वारे पवित्र केलेले आहो.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
आलेलुया, आलेलुया!
शब्द देह झाला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली आणि आम्ही त्याचा गौरव पाहिला.
आलेलुया!