उपवासकाळातील चौथा सप्ताह
शुक्रवार दि. ४ एप्रिल २०२५
येशू गालिलात फिरू लागला; कारण यहुदी त्याला जिवे मारायला पाहत होते, म्हणूण त्याला यहुदियात फिरावेसे वाटले नाही. यहुद्यांचा सण म्हणजे मंडपांचा सण जवळ आला होता. त्याचे भाऊ सणाला गेल्यानंतर तोही, उघडपणे न जाता गुप्तपणे वर गेला.ह्यावरून येरुशलेमकरांपैकी कित्येकजण म्हणू लागले, “ज्याला जिवे मारायला पाहतात तो हाच ना? पाहा, तो उघड उघड बोलतो व ते त्याला काही म्हणत नाहीत! हा ख्रिस्त आहे, हे अधिकाऱ्यांनी खरोखरच ओळखले आहे काय? तरी हा कोठला आहे हे आम्हांला ठाऊक आहे; पण ख्रिस्त येईल तेव्हा तो कोठला आहे हे कोणालाही कळणार नाही." ह्यावरून येशू मंदिरात शिक्षण देत असता मोठ्याने म्हणाला, "तुम्ही मला ओळखता व मी कोठला आहे हेही तुम्हांला ठाऊक आहे. तरी पण मी आपण होऊन आलो नाही; ज्याने मला पाठवले तो खरा आहे, त्याला तुम्ही ओळखत नाही. मी तर त्याला ओळखतो; कारण मी त्याच्यापासून आहे व त्याने मला पाठवले आहे." ह्यावरून ते त्याला धरायला पाहत होते; तरी कोणी त्याच्यावर हात टाकला नाही, कारण त्याची वेळ तोवर आली नव्हती.