सामान्यकाळातील पहिला सप्ताह

बुधवार 

१३ जानेवारी २०२१
 पोयतिअर्सचे संत हिलरी

(महागुरू, वर्तनसाक्षी, धर्मपाल, धर्मपंडित)

दुष्प्रवृत्तीचे अनावश्यक आकर्षण टाळून ज्या व्यक्ती लहान बालकासमान साधेपणाचे जीवन जगतात त्यांनाच देवाच्या राज्यात प्रवेश मिळतो.संत हिलरी

प्रभू आपला  तारणारा म्हणून स्वीकारीतो  तेंव्हा  आपल्या जीवनात परिवर्तन घडून येतो . तसेच जोपर्यंत आपल्या पापांबद्दल पश्चाताप करुन इतरांना आपण क्षमा करीत नाही तोपर्यंत कोणत्याही चमत्काराची आपण अपेक्षा करु नये.  प्रभू येशू आपल्या  प्रत्येकाला आरोग्यदान देण्यास तयार आहे. परंतु आपल्या श्रध्देच्या सहकार्याशिवाय आणि आपली बरे होण्याची इच्छा असल्याशिवाय प्रभूची कृपा आपणास प्राप्त होऊ शकत नाही.

आपला शारीरिक अथवा मानसिक आजार प्रभू बरा करु शकतो, ह्याची  उदाहरणे अनेक जणांची साक्ष ऐकल्यानंतर कळतात. अनेक ठिकाणी माणसांचे परिवर्तन झाल्याचे आपण ऐकतो, म्हणजेच प्रभू सतत कार्यशील आहे कारण आपले सर्व व्याधी त्याने आपल्यावर घेतले आहेत.' (१ पत्रे १:२४) मध्ये म्हटले आहे, त्याला बसलेल्या माराने तुम्ही निरोगी झाला आहात.' 
✝️

"नाना प्रकारच्या रोगांनी पीडलेल्या पुष्कळ माणसांना त्याने बरे केले "

✝️

पहिले वाचन :  इब्री  २:१४-१८

वाचक :  इब्री लोकांस पत्र यातून घेतलेले वाचन २:१४-१८

ज्या अर्थी मुले एकाच रक्तमांसाची होती त्या अर्थी तोही त्यांच्यासारखा रक्तमांसाचा झाला; हेतू हा की, मरणावर सत्ता गाजवणारा म्हणजे सैतान, ह्याला मरणाने शून्यवत करावे आणि जे मरणाच्या भयाने आयुष्यभर दास्याच्या बंधनात होते त्या सर्वांना मुक्त करावे खरे पाहता, तो देवदूतांच्या साहाय्यास नव्हे तर आब्राहामाच्या संतानाच्या साहाय्यास येतो. ह्यास्तव त्याला सर्व प्रकारे आपल्या बंधूंसारखे होणे अगत्याचे होते. लोकांच्या पापांबद्दल प्रायश्चित करण्याकरिता त्याने स्वत: देवासंबंधीच्या गोष्टींविषयी दयाळू  आणि विश्वसनीय प्रमुख याजक व्हावे. ज्या अर्थी त्याने स्वतः परीक्षा होत असता दुःख भोगले त्या अर्थी ज्यांची परीक्षा होत आहे त्यांना साहाय्य करावयास तो समर्थ आहे.

हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र १०५:१-४,६-९

प्रतिसाद :प्रभू आपला करार सर्वकाळ आठवतो

१) आलेलुया!  प्रभूला धन्यवाद द्या, त्याच्या नामाचा धावा करा, राष्ट्रांमध्ये त्याचे कार्य जाहीर करा. त्याचे गीत गा, त्याचे कीर्तन करा, त्याच्या सगळ्या अद्भुत कृत्यांचे वर्णन करा!

२) त्याच्या पवित्र नामाचा अभिमान बाळगा, प्रभूला शरण जाऊ पाहणाऱ्यांचे मन आनंदित होवो. प्रभूचा आणि त्याच्या सामर्थ्याचा शोध करा, त्याच्या दर्शनासाठी सतत आतुर असा.

३) त्याचा सेवक आब्राहाम ह्यांचे वंशजहो, त्याने निवडलेले याकोबचे वंशजहो. तो प्रभू आमचा देव आहे: साऱ्या जगावर त्याचीच सत्ता चालते.

४) तो आपला करार सर्वकाळ आठवतो, म्हणजे हजारो पिढ्यांसाठी दिलेले अभिवचन पाळतो; तो करार त्याने आब्राहामशी केला, तो पाळण्याची इसहाकजवळ शपथ घेतली.


जयघोष

आलेलूया,आलेलूया !

तुम्ही आपली हृदये आज कठोर करू नका तर परमेश्वराच्या वाणीकडे लक्ष द्या.

आलेलूया !

शुभवर्तमान 

मार्क १: २९-३९

वाचक :   मार्कलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

   येशू सभास्थानातून निघाल्यावर तो लगेच याकोब आणि योहान ह्यांच्याबरोबर शिमोन आणि आंद्रेया ह्यांच्या घरी गेला. शिमोनची सासू तापाने आजारी पडली होती, तिच्याविषयी लागलेच त्यांनी त्याला सांगितले. तेव्हा त्याने जवळ जाऊन तिच्या हाताला धरून तिला उठवले आणि तिचा ताप निघाला आणि ती त्यांची सेवा करू लागली.

त्या सायंकाळी, सूर्यास्त झाल्यावर लोकांनी सर्व आजाऱ्या आणि भूतग्रस्तांस त्याच्याकडे आणले आणि सबंध शहर दाराशी लोटले. तेव्हा नाना प्रकारच्या रोगांनी पीडलेल्या पुष्कळ माणसांना त्याने बरे केले आणि अनेक भुते काढली. त्या भुतांनी त्याला ओळखले म्हणून त्याने त्यांस बोलू दिले नाही.

मग तो सकाळी मोठ्या पहाटेस उठून बाहेर गेला आणि रानात जाऊन तेथे त्याने प्रार्थना केली. तेव्हा शिमोन आणि त्याचे सोबती त्याचा शोध करीत गेले आणि तो सापडल्यावर ते त्याला म्हणाले, "सर्व लोक आपला शोध करीत आहेत." तेव्हा तो त्यांना म्हणाला, "मला आसपासच्या गावात उपदेश करता यावा म्हणून आपण दुसरीकडे जाऊ, कारण ह्याच उद्देशाने मी निघालो आहे." मग तो सबंध गालिलात त्यांच्या सभास्थानातून उपदेश करीत आणि भुते काढीत फिरला.

प्रभूचे हे शुभवर्तमान...

सर्व :  हे ख्रिस्त तुझी स्तुती असो.  


चिंतन : 
देवाच्या राज्याची शुभवार्ता ही केवळ घोषणा नाही तर ती कृती आहे. तिच्याद्वारे माणसाला वाईटापासून मुक्त केले जाते. येशू शिकवतो तो देवाचा शब्द आहे आणि येशू सामर्थ्यशाली कार्य करतो. हे सगळे तो साध्या मार्गाने करतो. तो आजारी स्त्रीला उठण्यासाठी मदत करतो. तो परिचित, अनुकूल, आणि मानवी रितीने हात धरतो. प्रभू, पवित्र ख्रिस्त शरीराद्वारे मी स्वीकारतो आणि तू मला माझ्या तुला स्वार्थापासून, माझ्या प्रार्थनेविषयी तिरस्कारापासून बरे करतो. 
प्रभू मला पेत्राच्या सासूसारखा आत्मा दे. ती बरी होताच लगेच त्यांची सेवा करू लागली. ती त्यांच्या सेवेत हजर झाली. ती शिष्यत्वाचा आदर्श आहे. देवाकडून लाभलेल्या आरोग्याला योग्य प्रतिसाद म्हणजे येशूची आणि खिस्तसभेची सेवा करणे. मी सेवा करून घेण्यासाठी नव्हे तर सेवा करण्यासाठी आलेला आहे.


प्रार्थना :हे प्रभू येशू, आम्ही अनेकवेळा मेंढरांप्रमाणे बहकतो व आपआपल्या मार्गाने चालतो आम्हास तुझा तारणदायी मार्ग दाखव आणि सर्वकाळचा आनंद बहालकर, आमेन.