Marathi Bible Reading | Saint Benedict Biscop | 12h January 2021

सामान्यकाळातील पहिला सप्ताह

मंगळवार 

१२ जानेवारी २०२१
 संत बेनेडिक्ट बिस्कोप

(मठाधिकारी, वर्तनसाक्षी)

प्रभू येशु ख्रिस्ताचा अधिकार स्वर्ग आणि पृथ्वी व्यापून टाकणारा आहे. संत पौलाने म्हटले आहे. 'स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखालील प्रत्येक गुढघा प्रभू येशूच्या नावाने टेकला जाईल आणि जीभ कबुली देईल की येशू ख्रिस्त हा प्रभू आहे' (फिलिपै २:१०).  येशू ख्रिस्ताला शरण जाऊन आपण आपले सर्वस्व म्हणून त्याला स्वीकारले आहे  तर मग कोणत्याही दुष्ट शक्तीची किंवा सैतानाची आपल्याला भीती असता कामा नये.
सर्व अधिकार प्रभू येशूकडे सोपविले आहेत. म्हणूनच तर येशूने अधिकारयुक्त वाणीने अशुद्ध आत्म्याला एका माणसातून बाहेर काढले. प्रभू येशू देवाचा पुत्र म्हणजेच देव आहे. त्याचा अधिकार सर्वव्यापी आहे.
प्रभू येशूच्या नावाने आपण अशुद्ध आत्म्याला हाकलून लावू शकतो. 
✝️

"तो त्यांना शास्त्री लोकांसारखा नव्हे तर अधिकार असल्यासारखा शिकवीत होता."

✝️

पहिले वाचन :इब्री २:५-१२

वाचक :  इब्री लोकांस पत्र यातून घेतलेले वाचन 

आम्ही ज्या भावी जगाविषयी बोलत आहो ते त्याने देवदूतांच्या अधीन ठेवले नाही. तर एका ठिकाणी कोणी अशी साक्ष दिली आहे :

"मर्त्य मानव तो काय की तू त्याची आठवण करावी? अथवा मानवपुत्र तो काय की तू त्याला दर्शन द्यावे? तू त्याला देवदूतांपेक्षा किंचितकाल कनिष्ठ केले आहे, तू त्याला गौरव आणि थोरवी ह्यांनी मुकुटमंडित केले आहे, तू सर्व काही त्याच्या अधीन-त्याच्या पायांखाली ठेवले आहे.' 

सर्व काही त्याच्या अधीन ठेवले आहे, म्हणजे त्याच्या अधीन ठेवलेले नाही असे काही राहू दिले नाही. परंतु सर्व काही त्याच्या अधीन ठेवले आहे असे अजून आपल्या दृष्टीस पडत नाही खरे. देवाच्या कृपेने प्रत्येकाकरिता मरणाचा अनुभव घ्यावा म्हणून ज्याला देवदूतांपेक्षा किंचितकाल कनिष्ठ केले होते, तो येशू मरण सोसल्यामुळे गौरव आणि थोरवी ह्यांनी मुकुटमंडित केलेला असा आपण पाहतो.

कारण ज्याच्यासाठी सर्व काही आहे आणि ज्याच्याद्वारे सर्व काही आहे, त्याने पुष्कळ पुत्रांना गौरवात आणताना त्यांच्या तारणाचा जो प्रवर्तक त्याला दु:खसहनाद्वारे त्याने परिपूर्ण करावे हे उचित होते. कारण जो पवित्र करणारा आणि ज्यांना पवित्र करण्यात येत आहे ते सर्व एकापासूनच आहेत; ह्या कारणास्तव त्यांना बंधू म्हणावयाची त्याला लाज वाटत नाही. तो म्हणतो, "मी आपल्या बंधूजवळ तुझ्या नावाची कीर्ती वर्णीन, महामंडळात तुझे स्तवन करीन."

हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र ८:२,५-९

प्रतिसाद :प्रभो, आपल्या हातच्या कलाकृतींवर तू तुझ्या पुत्राला स्वामित्व दिले आहेस.

१) हे प्रभो, आमच्या परमेश्वरा, साऱ्या भूतलावर तुझे नाम कितीतरी थोर आहे! तू मर्त्य मानवाची आठवण करावी, क्षुद्र मानवजातीची तू पर्वा करावी, असा तो कोण?

२) तरीपण देवापेक्षा तू त्याला किंचित कनिष्ठ केले आहेस; त्याला वैभव आणि मोठेपणा ह्यांनी अलंकृत केले आहेस, आपल्या हातच्या कलाकृतीवर तू त्याला स्वामित्व दिले आहेस, सारे काही त्याच्या चरणांपाशी ठेवले आहेस. 

३) शेरडेमेंढरे, गुरे ढोरे, अगदी एकूणएक जंगली जनावरे, आकाशातली पाखरे, समुद्रातले मासे, सागरात संचार करणारे प्राणी देखील तू त्याच्या चरणापाशी ठेवले आहेत.


जयघोष

आलेलूया,आलेलूया !

माझ्या प्रभो, तुझा मार्ग मला दाखव, तुझ्या सत्याला अनुसरून वागायला मला शिकव.

आलेलूया !

शुभवर्तमान 

मार्क १: २१-२८

वाचक :   मार्कलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन १:२१-२८

   येशू आणि त्याचे शिष्य कफर्नाहुमस  गेले आणि लागलेच त्याने शब्बाथ दिवशी सभास्थानात जाऊन शिक्षण दिले. त्याच्या शिकवणीवरून लोक थक्क झाले, कारण तो त्यांना शास्त्री लोकांसारखा नव्हे तर अधिकार असल्यासारखा शिकवीत होता. त्याचवेळी त्यांच्या सभास्थानात अशुद्ध आत्मा लागलेला एक मनुष्य होता, तो ओरडून म्हणाला "हे येशू नाझरेथकरा तू आमच्यामध्ये का पडतोस? आमचा नाश करावयास आलास काय ? तू कोण आहेस हे मला ठाऊक आहे, देवाचा पवित्र तो तूच." परंतु येशूने त्याला धमकावून म्हटले, "गप्प राहा आणि ह्याच्यातून नीघ , तेव्हा अशुद्ध आत्मा त्याला पिळून मोठ्याने ओरडला आणि त्याच्यातून निघून गेला. तेव्हा ते सर्व इतके थक्क झाले की ते एकमेकांस विचारू लागले, "हे आहे तरी काय ? काय ही अधिकारयुक्त नवीन शिकवण! हा अशुद्ध आत्म्यांनाही आज्ञा करतो आणि ते त्याचे ऐकतात." ही त्याचा कीर्ती लागलीच गालिलाच्या चहूकडल्या सर्व प्रांतात पसरली.

प्रभूचे हे शुभवर्तमान...

सर्व :  हे ख्रिस्त तुझी स्तुती असो.  


चिंतन : 
आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशूने अशुद्ध आत्मा काढण्याचा वृत्तांत ऐकायला मिळतो. संत मार्कच्या शुभवर्तमानात अशाप्रकारचे चार वृत्तांत आहेत. शुभवर्तमान येशूच्या अधिकारयुक्त शिकवणुकीविषयी आपल्याला सांगते. येशू त्या काळच्या शास्त्री आणि परुशांच्या शिकवणुकीपेक्षा अगदी वेगळी शिकवण देत असे. अशुद्ध आत्म्यांवर येशूचा अधिकार पाहून सर्व लोक आश्चर्यचकित झाले नियमशास्त्र शिकवणारे गुरू, त्यांना शिकविलेले धडे गिरवत असत, तर येशू मात्र आपला वैभवयुक्त अधिकार जो त्याला त्याच्या व्यक्तिमत्त्वातून मिळाला होता तो दर्शवत होता. मी मुलांबरोबर किंवा मित्रांबरोबर येशूविषयी किंवा देवाविषयी बोलताना कसे बोलतो? आपण शास्त्र्यासारखे बोलतो का? जे फक्त तेच तेच शब्द आणि वाक्य उच्चारत असतात, जे ते धर्मशिक्षणात शिकलेले असतात. येशूचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आणि श्रद्धेची खात्री पटलेला असा साक्षीदार म्हणून मी जगात वावरतो का? सामान्य शिक्षक सांगतो, चांगला शिक्षक स्पष्टीकरण देतो, श्रेष्ठ शिक्षक प्रात्यक्षिक दाखवितो. महान शिक्षक प्रेरणा देतो. येशू सदैव प्रेरित करतो.


प्रार्थना : तुझ्या वचनावर व सामर्थ्यवर अवलंबून विश्वासाने जीवन जगण्यास प्रभू येशू आम्हाला प्रेरणा व कृपा दे, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या