प्रथम त्या तीन मागी लोकांना बाळाच्या शोधार्थ पाठविले. त्या तीन मागी लोकांना येशू बाळाचा शोध लागला. परंतु त्यांना स्वप्नात देवदूताने सूचना दिल्यामुळे ते परत हेरोदकडे न जाता दुसऱ्या वाटेने आपल्या देशात निघून गेले. जेव्हा ही बातमी हेरोदला समजली तेव्हा त्याच्या अंगाचा तीळपापड झाला. त्याच्या तळपायाची आग मस्तकाला जाऊन भिडली. त्याने शिपायांना आदेश दिला की, दोन वर्षे आणि त्याहून कमी वय असलेल्या बालकांची हत्या करा. देऊळमाता आज अशा सर्व बालकांचा सण साजरा करीत आहे.
ही बालके एकूण किती होती हे सांगणे कठीण आहे परंतु बेथलेहेमसारखे लहानसे गाव लक्षात घेता आधुनिक बायबलपंडितांच्या मते ही संख्या २५च्या आसपास असावी. हेरोद राजाने केलेल्या विविध क्रूर आणि अमानुष छळांची संख्या इतकी मोठी होती की, जोसेफुस नावाच्या इतिहासकाराला लहान बाळांचे हे हत्याकांड आपल्या लिखाणात समाविष्ट करावेसे वाटले नाही. परंतु ख्रिस्तसभेने मात्र ह्या बालकांना रक्तसाक्षी म्हणून गौरविलेले आहे कारण येशूबाळाच्या अप्रत्यक्षरित्या संरक्षणार्थ ह्या बाळकांना मरण पत्करावे लागले. त्या बाळकांच्या मातांच्या सांत्वनासाठी ख्रिस्तसभेने आजच्या मिस्साबलीतील उपासनेत धर्मगुरूंना लाल वेदीवस्त्र वापरण्याची आज्ञा केलेली आहे. निरपराध बालकांचा सोहळा पहिल्यांदा ४८५ मध्ये साजरा करण्यात आला. इंग्लंडमध्ये तो बालकदिन म्हणून साजरा केला जायचा तर जर्मनी आणि फ्रान्स या देशांमध्ये संत निकोलसच्या दिनी (६ डिसेंबर) सांता क्लॉज म्हणून ज्या मुलांची निवड झालेली असायची त्याच मुलाला महागुरुस्वामींच्या आसनावर बसविले जायचे. हा बाल-महागुरू मिस्सामधील प्रास्ताविक प्रार्थना गायचा वा म्हणायचा, छोटेसे प्रवचनवजा कथाकथन करायचा आणि शेवटी आशीर्वाददेखील द्यायचा. ही निरपराध बालके गायनमंडळाची आश्रयदाती मानली जातात.
चिंतन : बाळकांस माझ्याजवळ येऊ द्या, त्यांना मना करू नका कारण देवाचे राज्य त्यांच्यासारख्यांचेच आहे. (लूक १८:१६ )
देवाला निष्पाप बालके प्रिय असतात कारण स्वर्गाचे राज्य त्यांच्या सारख्यांचेच आहे. 'देव प्रकाश आहे,' मात्र अंधाराच्या राज्याची आस धरलेली माणसे सत्ता, वैभव आणि धन दौलतीसाठी भ्रष्टाचाराचा आणि रक्तपाताचा मार्ग अवलंबित असतात. अशा सर्व अंध राज्यकर्त्या पासून आपले रक्षण करण्याच्या प्रभू परमेश्वराठायी आपण आपले जीवन समर्पित करु या. विशेषत: आपल्या गावपरिवारात व कुटुंबात आपलेल्या सर्व बालकांसाठी विशेष प्रार्थना करु या.
पहिले वाचन १योहान १:५-२:२
वाचक :योहानचे पहिले पत्र यातून घेतलेले वाचन
"येशू ख्रिस्ताचे रक्त आपल्याला सर्व पापांपासून शुध्द करते."
जो संदेश आम्ही येशू ख्रिस्तापासून ऐकला आहे तो तुम्हांला जाहीर करतो. तो संदेश हा की, देव प्रकाश आहे आणि त्याच्या ठायी मुळीच अंधार नाही. त्याच्याबरोबर आपली सहभागिता आहे असे जर आपण म्हणत असलो पण अंधारात चालत असलो, तर आपण खोटे बोलतो, सत्याने वागत नाही. पण जसा तो प्रकाशात आहे तसे जर आपण प्रकाशात चालत असलो, तर आपली एकमेकांबरोबर सहभागिता आहे आणि त्याचा पुत्र येशू ह्याचे रक्त आपल्याला सर्व पापांपासून शुध्द करते.
आपल्या ठायी पाप नाही असे जर आपण म्हणत असलो, तर आपण स्वतःला फसवतो आणि आपल्याठायी सत्य नाही. जर आपण आपली पापे पदरी घेतली, तर तो विश्वसनीय आणि न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करील व आपल्याला सर्व अनीतीपासून शुध्द करील. आपण पाप केले नाही, असे जर आपण म्हटले तर आपण त्याला लबाड ठरवतो आणि त्याचे वचन आपल्याठायी नाही.
अहो माझ्या मुलांनो, तुम्ही पाप करू नये म्हणून हे मी तुम्हांला लिहितो. जर कोणी पाप केले, तर नीतिसंपन्न असा जो येशू ख्रिस्त तो पित्याजवळ आपला कैवारी आहे आणि तोच आपल्या पापांबद्दल प्रायश्चित्त आहे, केवळ आपल्याच पापांबद्दल नव्हे तर सर्व जगाच्याही पापांबद्दल आहे.
हा प्रभूचा शब्द आहे.
शुभवर्तमान मत्तय २:१३-१८
वाचक : मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
“हेरोदने बेथलेहेममधील सर्व बाळकांना माणसे पाठवून ठार केले. "
ज्ञानी लोक गेल्यावर, पाहा, प्रभूचा दूत योसेफला स्वप्नात दर्शन देऊन म्हणाला, "ऊठ, बाळक व त्याची आई ह्यांना घेऊन इजिप्त देशात पळून जा आणि मी तुला सांगेपर्यंत तेथेच राहा, कारण बाळकाचा घात करण्यासाठी हेरोद त्याचा शोध करणार आहे." मग तो उठला आणि बाळक व त्याची आई ह्यांना घेऊन रातोरात इजिप्त देशात निघून गेला आणि हेरोदच्या मरणापर्यंत तेथे राहिला. "मी आपल्या पुत्राला इजिप्त देशातून बोलावले आहे" हे जे प्रभूने संदेष्टयाच्या द्वारे सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले.
तेव्हा ज्ञानी लोकांनी आपणाला फसवले हे पाहून हेरोद अतिशय संतापला आणि जी वेळ त्याने ज्ञानी लोकांपासून नीट विचारून घेतली होती तिच्याप्रमाणे त्याने बेथलेहेमात व आसपासच्या सर्व प्रदेशात जे दोन वर्षाचे आणि त्याहून कमी वयाचे बाळक होते त्या सर्वांना त्याने माणसे पाठवून ठार केले. यिर्मया संदेष्टयाच्या द्वारे जे सांगितले होते, ते त्यासमयी पूर्ण झाले. ते असे “रामा येथे रडणे आणि मोठा आकांत ह्यांचा शब्द ऐकण्यात आला, राहेल आपल्या मुलांकरिता रडत आहे आणि ती नाहीत म्हणून तिचे सांत्वन होत नाही."
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन: ख्रिस्तसभा आज पवित्र निष्पाप बालकांचा स्मृतिदिन साजरा करीत आहे. प्रभू येशूच्या जन्माने 'यहूद्यांचा राजा जन्माला आल्याची' वार्ता हेरोदाला मागी लोकांकडून समजली. त्याने येशूला ठार करण्याच्या हेतूने बेथलेहेम व आसपासच्या परिसरातील दोन वर्षे व त्याहून कमी वय असलेल्या बालकांची कत्तल घडवून आणली. आपल्या मिटलेल्या ओठांनी व सांडलेल्या रक्ताद्वारे ह्या निष्पाप बालकांनी येशू जन्माची सुवार्ता पसरविली. प्रभू येशूने पुढे क्रुसावर सांडलेल्या रक्ताच्या प्रकाशात निष्पाप बालकांच्या रक्ताचे मोल समजून घ्यायला हवे. ही छोटी बालके मारली जात असताना जगाचा तारणारा बेथलेहेमला पळून गेला का ? नाही. तर तरवारीला उत्तर करूणेने देण्याची त्याची वेळ तोपर्यंत आली नव्हती. त्यामुळेच त्याने आपली हतबलता स्वीकारली.
प्रार्थना :- : हे प्रभू येशू, बालकांप्रमाणे नम्र व आज्ञाधारक बनण्यास आणि
परस्परावर प्रीति करण्यास आम्हाला प्रेरणा दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
0 टिप्पण्या