ख्रिस्त जन्मोत्सव - नाताळ
नाताळ सप्ताहातील
गुरुवार ३० डिसेंबर २०२१
✝️
"तो बाळक वाढत बलवान होत गेला व ज्ञानाने पूर्ण होत गेला.'
संत सॅबिनस
महागुरू रक्तसाक्षी (३७३)
तिसऱ्या शतकाच्या शेवटी शेवटी संत सॅबिनस हे इटलीमधील असिसी ह्या धर्मप्रांताचे बिशप होते. डायक्लोशिअन राजाच्या काळात जेव्हा ख्रिस्ती धर्मियांचा छळ सुरू झाला, तेव्हा इतुरियाच्या राज्यपालाने सॅबिनस ह्यांच्या हाती ज्युपिटर ह्या ग्रीक देवताची मूर्ती दिली व तिची पूजा करण्याचा आदेश त्यांना दिला. बिशप व सॅबिनस ह्यांनी सात्त्विक संतापाने ती मूर्ती जमिनीवर फेकून दिली त्यामुळे ती मूर्ती फुटली. राज्यपालाने तात्काळ बिशप सॅबिनस ह्यांचे हात तोडण्याचा हुकूम सोडला. राज्यपालांचा हुकूम तो! ताबडतोब अंमलात आणण्यात आला.
काही काळानंतर हात नसलेल्या केवळ बाहूने बिशप सॅबिनस ह्यांनी एका आंधळ्याला आशीर्वाद दिला, म्हणून त्याला दृष्टी प्राप्त झाल्याचा चमत्कार घडल्याचे राज्यपालाच्या कानावर आले. लागलीच राज्यपालाने बिशपांना बोलावून घेतले व स्वतःच्या दृष्टीमध्ये असलेला दोष काढून टाकण्याकरिता प्रार्थना करण्याची विनंती केली. बिशपांच्या प्रार्थनेमुळे राज्यपालाला नवीन दृष्टी प्राप्त झाली, त्यामुळे राज्यपाल आणि त्याचे कुटुंब आणि संपूर्ण घराणे ख्रिस्ती झाले.
परंतु ह्या दोन्ही अद्भूत कृत्यांचा डायक्लोशियन राजावर काहीही परिणाम झाला नाही. उलट त्याने रागाने संत सॅबिनस, राज्यपाल आणि त्याच्या कुटुंबियांना मरेपर्यंत बदडून काढले.
श्रद्धेत वाढत राहणारे सर्वजण परमेश्वर पित्याच्या आज्ञेप्रमाणे जीवन जगत असतात. श्रद्धावंताच्या ठायी देवाचे वचन कार्यरत असते, म्हणूनच जगातील प्रलोभनांपासून दूर राहून श्रद्धावंत परमेश्वराच्या कृपेत बलवान बनत जातो.
आजच्या शुभवर्तमानात परमेश्वर पित्याच्या आज्ञेत वाढणारा येशू बाळ बलवान आणि ज्ञानाने पूर्ण होत गेल्याचा वृतांत दिला आहे. नियमशास्त्राप्रमाणे सर्व काही पूर्ण झाल्यावर बाळ येशू आपल्या आई वडिलांबरोबर गालीलातील नासरेथ ह्या आपल्या गावी गेला. नासरेथातील प्रभू येशूचे बालपण सामान्य मुलांप्रमाणेच असेल. बालके जशी शरीराने वाढतात तशीच विचाराने, ज्ञानाने आणि शहाणपणाने पण वाढत जातात. निर्मळ अंतःकरणाची माता मरिया आणि प्रेमळ व भक्तिमान पिता योसेफ ह्यांच्या सहवासात बाळ येशूचे खऱ्या अर्थाने संगोपन झाले. देवावरील निः सिम प्रेम, समर्पणाची परिपूर्ती आणि अढळ श्रद्धा ह्याचा परिणाम बाळ येशूवर निश्चितच झाला व तो परमेश्वराच्या कृपेने ज्ञानाने व शहणपणाने वाढत गेला. आपली मुले कशा प्रकारे वाढत आहेत? आपल्या कुटुंबात कशा प्रकारचे संस्कार केले ! जातात? कोणते धार्मिक संस्कार आपण मुलांना देतो? आपली मुले देवाच्या ज्ञानात, शहाणपणात, आध्यात्मिकतेत व कृपेत वाढत आहेत का? आपण जर देवाच्या कृपेत वाढत असलो तर प्रत्येक क्षणाला देवाचा सहवास अनुभवण्यास मिळेल.
✝️
पहिले वाचन १योहान २:१२-१७
वाचक :योहानचे पहिले पत्र यातून घेतलेले वाचन
"देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्वकाळ राहतो."
मुलांनो, मी तुम्हांला लिहितो, कारण त्याच्या नावामुळे तुमच्या पापांची तुम्हांला क्षमा झाली आहे. बापांनो, मी तुम्हांला लिहितो, जो प्रारंभापासून आहे त्याला तुम्ही ओळखता. तरुणांनो, मी तुम्हांला लिहितो, कारण जो दुष्ट त्याला तुम्ही जिंकले आहे. मुलांनो, मी तुम्हांला लिहिले आहे, कारण तुम्ही पित्याला ओळखता. बापांनो, मी तुम्हांला लिहिले आहे, कारण जो प्रारंभापासून आहे त्याला तुम्ही ओळखता. तरुणांनो, मी तुम्हांला लिहिले आहे, कारण तुम्ही बलवान आहा, तुमच्या ठायी देवाचे वचन राहते आणि त्या दुष्टाला तुम्ही जिंकले आहे.
जगावर व जगातल्या गोष्टींवर प्रीती करू नका, जर कोणी जगावर प्रीती करीत असेल तर त्याच्या ठायी पित्याची प्रीती नाही. कारण जगात जे सर्व आहे ते, म्हणजे देहाची वासना, डोळ्यांची वासना व संसाराविषयीची फुशारकी, ही पित्यापासून नाहीत, तर जगापासून आहेत आणि जग व त्याची वासना ही नाहीशी होत आहेत; पण देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्वकाळ राहतो.
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र ९६:७-१४
प्रतिसाद :आकाश हर्ष करो. पृथ्वी आनंदित होवो.
१) मानवकुलांनो प्रभूचे गुणगौरव करा.
प्रभूचे गौरव व पराक्रम यांची महती वर्णन करा.
प्रभूच्या नामाचा महिमा गा.
२) अर्पण आणा आणि त्याच्या मंदिरातल्या चौकात या.
मंगलस्वरूप प्रभूची आराधना. करा.
सारी पृथ्वी त्याच्यापुढे थरथर कापो.
३) सगळ्या राष्ट्रांना जाहीर करा,
“प्रभू राजा आहे."
तो मानवजातीचा यथार्थ न्याय करील.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
आमच्यावर पवित्र दिवस उजाडला आहे. राष्ट्रांनो या, प्रभूला नमन करा. कारण आज जगावर महातेज पसरले आहे.
आलेलुया!
शुभवर्तमान लूक २:३६-४०
वाचक : लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"ते बाळ वाढत वाढत बलवान होत गेले व ज्ञानाने पूर्ण होत गेले."
एक संदेष्टी होती. ती आशेरच्या वंशातील फनुएलाची मुलगी होती. ती फार वयोवृद्ध झाली होती व कौमार्यकाल संपल्यापासून ती नवऱ्याजवळ सात वर्षे राहिली होती. आता ती चैऱ्याऐंशी वर्षाची विधवा असून मंदिर सोडून न जाता उपवास व प्रार्थना करुन रात्रंदिवस सेवा करीत असे. तिने त्याचवेळी जवळ येऊन देवाचे आभार मानले आणि जे येरुशलेमच्या मुक्ततेची वाट पाहात होते त्या सर्वांना ती येशूविषयी सांगू लागली.नंतर प्रभूच्या नियमशास्त्राप्रमाणे सर्वकाही पुरे केल्यावर योसेफ, मरिया व बाळ येशू गालिलात आपले गाव नाझरेथ येथे परत गेले. ते बाळ वाढत वाढत बलवान होत गेले व ज्ञानाने पूर्ण होत गेले. त्याच्यावर देवाची कृपा होती
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन: आजचे शुभवर्तमान आपल्याला संदेष्टी हन्ना हिचा आनंददायी प्रतिसाद आपल्या समोर सादर करते. पुरुषांसह स्त्रियांनाही परमेश्वराच्या तारण योजनेमध्ये कसे महत्वाचे स्थान आहे ते संत लूक आपल्याला दर्शवितो. संदेष्टी हन्ना हिची धार्मिकता, शुद्धाचरण आणि सेवाभाव ह्या पार्श्वभूमीवर बाळ येशूचे मंदिरातील समर्पण सादर करून ईश्वरी प्रकटीकरणाला मानवी सहकार्याची जोड कशी असावी लागते ते लूक सूचित करतो. प्रभूचे दर्शन घडल्यानंतर हन्ना शांतपणे बसून राहत नाही. ती सर्वांना त्या बाळाविषयी सांगू लागली. वैधत्व, वृद्धत्व वा वंध्यत्व असा कोणताही अडथळा सुवार्ताप्रसार करण्यापासून तिला रोखू शकला नाही.
प्रार्थना :- :हे देवा परमेश्वरा, तुझ्या पवित्र वचनांप्रमाणे व आज्ञाप्रमाणे जीवन आचरण करण्यास आम्हाला प्रेरणा व कृपा दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️
0 टिप्पण्या