Marathi Bible Reading | 26th December 2022 |Saint Stephen |

 ख्रिस्त जन्मोत्सव - नाताळ सप्ताह 

सोमवार २६ डिसेंबर २०२२

"बोलणारे तुम्ही नाही, तर तुमच्या पित्याचा आत्मा हाच तुमच्या ठायी बोलणारा आहे."

पहिल्या रक्त साक्षी संत स्टीफनचा सण
ख्रिस्तसभा आज संत स्टीफन ह्या पहिल्या रक्त साक्षी संताचा सण साजरा करीत आहे. पहिला दीक्षित उपधर्मगुरु म्हणून स्टीफनने ख्रिस्ताची सुवार्ता पसरविण्याचे महान कार्य केले आहे. त्याची ख्रिस्तावरील अढळ श्रध्दा आणि त्याला लाभलेली कृपा व सामर्थ्य म्हणजेच पवित्र आत्म्याची प्रेरणा यामुळे त्याने धैर्याने सुवार्ता प्रचाराचे कार्य केले. मात्र त्याला ख्रिस्तासाठी आपला प्राण द्यावा लागला.
त्याला त्याकाळाच्या धार्मिक पुढाऱ्यांसमोर ख्रिस्ताची साक्ष देण्यासाठी पवित्र आत्म्याची प्रेरणा मिळाली,  त्याला धैर्याचा आत्मा मिळाला आणि देवाच्या गौरवासाठी सर्व क्लेश सहन  करण्याची कृपा मिळाली. प्रभू येशूची कृपा आणि सामर्थ्य लाभलेल्या स्टीफनला सर्व प्रकारची संकटे व आव्हानांना समर्थपणे सामोरे जाण्यासाठी  प्रेरणा व शक्ती प्राप्त झाली. आपण आपल्या जीवनातील सर्व प्रकारचे अडथळे, संकटे, आजार, चिंता, आव्हाने ह्यांना कशा प्रकारे सामोरे जाऊ शकतो?
प्रभूचा पवित्र आत्मा आणि त्याची कृपादाने आपल्याला लाभावित  म्हणून प्रार्थना करु या.

✝️

पहिले वाचन : प्रे.कृ. ६ : ८-१०, ७ : ५४-८:१

वाचक :  प्रेषितांची कृत्ये ह्या पुस्तकातून घेतलेले वाचन

    स्तेफान कृपा आणि सामर्थ्य ह्यांनी पूर्ण होऊन लोकात मोठी अद्भुते आणि चिन्हे करत असे. तेव्हा लिबिर्तिन नामक लोकांच्या सभास्थानातील काहीजण तसेच कुरेनेकर आलेक्सांद्रियेकर आणि किलिकिया व आशिया ह्यातील लोकांपैकी कित्येक उठले आणि स्तेफानबरोबर वितंडवाद घालू लागले. पण तो ज्या ज्ञानाने आणि ज्या आत्म्याने बोलत होता त्याला त्यांच्याने तोंड देववेना. त्याचे हे भाषण ऐकणाऱ्यांच्या अंत:करणाला इतके झोंबले की ते त्याचे दातओठ खाऊ लागले परंतु पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन त्याने आकाशाकडे निरखून पाहिले तेव्हा देवाचे तेज आणि देवाच्या उजवीकडे येशु उभा असलेला त्याच्या दृष्टीस पडला आणि त्याने म्हटले, "पाहा, आकाश उघडलेले आणि मनुष्याचा पुत्र देवाच्या उजवीकडे उभा असलेला मला दिसत आहे." तेव्हा ते मोठयाने ओरडून आणि कान बंद करून एकजुटीने त्याच्या अंगावर धावून गेले. मग ते त्याला शहराबाहेर घालवून दगडमार करू लागले आणि साक्षीदारांनी आपली वस्त्रे शौल नावाच्या एका तरुणाच्या पायांजवळ ठेवली. ते दगडमार करत असता स्तेफान धावा करत म्हणाला, “हे प्रभू येशू, माझ्या आत्म्याचा स्वीकार कर.” मग गुडघे टेकून तो मोठयाने ओरडला, "हे प्रभू, हे पाप त्यांच्याकडे मोजू नकोस." असे बोलून तो झोपी गेला. शौलला तर त्याचा वध मान्य होता.

हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र ३१:३बक-४,६.८ अब, १७.२१अब

प्रतिसाद :  प्रभो, मी माझा आत्मा तुझ्या स्वाधीन करतो.

१) तू माझा आश्रयदाता पहाड हो, 

माझा बचाव करणारा दुर्ग हो आणि 

माझे रक्षण कर, कारण तूच माझा आश्रयदाता पहाड 

आणि दुर्ग आहेस. तुझ्या नावाच्या महिम्यासाठी 

मला मार्गदर्शन कर, माझा नेता हो.


२) मी माझा आत्मा तुझ्या स्वाधीन करतो. 

हे परमेश्वरा, सत्यस्वरूप देवा, तूच माझा उध्दार करशील. 

माझी तर प्रभूवर श्रध्दा आहे, 

तुझ्या वात्सल्यामुळे मला आनंदोत्सव होईल.


३) तू आपल्या सेवकावर आपला मुखप्रकाश पाड. 

तू आपल्या वात्सल्याने माझा बचाव कर. 

जे तुझ्यावर श्रध्दा ठेवतात त्यांना 

तू आपल्या समक्षतेच्या गुप्त स्थळी 

मनुष्यांच्या कारस्थानांपासून लपवतोस.

हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद.


जयगोष                                                        

आलेलूया,आलेलूया !

परमेश्वराच्या नामाने येणारा धन्य असो.

परमेश्वर आमचा प्रकाश आहे.

आलेलूया !


शुभवर्तमान मत्तय १०:१७-२२

वाचक : मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

येशू आपल्या प्रेषितांना म्हणाला, “माणसांच्या बाबतीत जपून राहा, कारण ते तुम्हाला न्यायसभांच्या स्वाधीन करतील, आपल्या सभास्थानात तुम्हांला फटके मारतील आणि तुम्हांला माझ्यामुळे देशाधिकारी व राजे ह्यांच्यापुढे नेण्यात येईल आणि तुम्ही त्यांना आणि परराष्ट्रीयांना साक्ष व्हाल. जेव्हा तुम्हांला त्यांच्या स्वाधीन करतील तेव्हा कसे अथवा काय बोलावे ह्याची काळजी करू नका, कारण तुम्ही काय बोलावे हे त्याच घटकेला तुम्हांला सुचवले जाईल. कारण बोलणारे तुम्ही नाही, तर तुमच्या पित्याचा आत्मा हाच तुमच्या ठायी बोलणारा आहे. भाऊ भावाला आणि बाप मुलाला जिवे मारण्यासाठी धरून देईल, मुले आईबापांवर उठून त्यांस ठार करतील आणि माझ्या नामामुळे सर्व लोक तुमचा द्वेष करतील. तथापि जो शेवटपर्यंत टिकेल त्याचेच तारण होईल.

प्रभूचे हे शुभवर्तमान...

हे ख्रिस्त तुझी स्तुती असो 

चिंतन :
आज देऊळमाता संत स्तेफान, पहिला रक्तसाक्षी ह्याचा सण साजरा करीत आहे. हा सण आपल्याला या सत्त्याची आठवण करून देतो की, आनंद आणि दुःख, मरण आणि पुनरुत्थान हा ख्रिस्ती जीवनाचा अविभाज्य घटक आहे. आजच्या पहिल्या वाचनात आपण ऐकतो की, संत स्टेफान पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यामुळे निर्भीडपणे ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाची घोषणा करतो. हे ऐकून त्याचे वैरी अतिक्रोधीत झाले आणि शौलाच्या नेतृत्वाखाली त्याला दगडमार करून ठार केले. ख्रिस्ताला अनुसरणाऱ्याला दैनंदिन जीवनात असा छळ आणि यातना अनिवार्य आहे याची ताकीद आणि पूर्वसूचना ख्रिस्त त्याच्या शिष्यांना आजच्या शुभवर्तमानात देतो. परंतु त्याचबरोबर ख्रिस्त त्याच्या शिष्यांना आश्वासन सुद्धा देतो की, अशा क्षणात पवित्र आत्मा त्यांना साहाय्य करणार आहे. ही शाश्वती आणि हमी आपल्याला संत स्टेफानच्या प्रार्थनेत आढळते. कारण तो मरतेवेळी म्हणतो, “हे प्रभू येशू, माझ्या आत्म्याचा स्वीकार कर. ख्रिस्ताने सुद्धा क्रुसावर आपला प्राण सोडताना असेच उद्गार काढले, ” हे बापा, मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो.” संत स्तेफान ने ख्रिस्तासाठी बळी दिला. आपण ख्रिस्तासाठी काय करायला तयार आहोत ?

प्रार्थना -  हे प्रभू येशु, श्रध्देने व निष्ठेने तुझी सुवार्ता पसरविण्यास आम्हाला धैर्याचा आत्मा बहाल कर,, आमेन.


सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️     

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या