हे नवीन वर्ष आपल्या सर्वाना प्रभूच्या  सहवासात 

सुखाचे व  भरभराटीचे जावो  . 

मराठी दि. ३ जानेवारी  २०२३

✝️

“हे पाहा, जगाचे पाप हरण करणारे देवाचे कोकरू.  


येशूचे महान नाम 

आपल्या सर्वांना पापापासून मुक्त करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त भूतलावर आला. आपण सर्वांनी देवाच्या प्रीतित वाढावे व देवाची मुले बनावित म्हणून प्रभू येशू आपल्यामध्ये आला.
 पापांपासून मुक्ति मिळविण्यासाठी कोकराचा बळी देण्याची प्रथा इस्त्राएलात होती व ख्रिस्ताला अखिल मानवजातीच्या मुक्ततेसाठी देवाचा कोकरा बनावे लागले. 
योहान पुढे साक्ष देऊन म्हणत आहे की, 'मी स्वतः पाहिले आहे व साक्ष दिली आहे की, हा देवाचा पुत्र आहे.' पवित्र आत्म्याची साक्ष योहानाने दिली व पवित्र आत्म्याच्या प्रेरणेनेच त्याच्यावर देवाने सोपविलेली महान जबाबदारी त्याने पार पाडली. पापांपासून व सैतानाच्या दास्यातून सोडविण्यासाठी प्रभू ख्रिस्त देवाचा कोकरा बनला. क्रुसावरील मरणाने त्याने पापाचा व सैतानांचा नायनाट केला आहे.

✝️

पहिले वाचन : योहानचे पहिले पत्र २:२९-३:६

वाचक :   योहानचे पहिले पत्र यातून घेतलेले वाचन 

 "जो कोणी प्रभूच्या ठायी राहतो तो पाप करत नाही.”

योहान म्हणतो, “तो न्यायसंपन्न आहे हे जर तुम्हांला माहीत आहे, तर जो कोणी नीतीने चालतो तो त्याच्यापासून जन्मलेला आहे हेही तुम्हांला माहीत झाले आहे.” आपल्याला देवाची मुले हे नाव मिळाले ह्यात पित्याने आपल्याला केवढे प्रीतिदान दिले आहे पाहा आणि आपण तसे आहातच. ह्यामुळे जग आपल्याला ओळखीत नाही, कारण त्याने त्याला ओळखले नाही. प्रियजनहो, आपण आता देवाची मुले आहोत आणि पुढे आपण काय होऊ, हे अजून प्रकट झालेले नाही; तरी तो प्रकट होईल तेव्हा आपण त्याच्यासारखे होऊ हे आपल्याला माहीत आहे, कारण जसा तो आहे तसाच तो आपल्याला दिसेल. जो कोणी त्यासंबंधाने ही आशा बाळगतो तो, जसा तो शुद्ध आहे, तसे आपणाला शुद्ध करतो.

जो कोणी पाप करतो तो स्वैराचार करतो, कारण पाप स्वैराचार आहे. तुम्हाला माहीत आहे की, पापे हरण करण्यासाठी तो प्रकट झाला. त्याच्याठायी पाप नाही. जो कोणी त्याच्याठायी राहतो तो पाप करीत नाही. जो कोणी पाप करतो त्याने त्याला पाहिले नाही व त्याला ओळखलेही नाही.

हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र ९८:१-३,६

प्रतिसाद :  पृथ्वीच्या कानाकोपऱ्यांनी आमच्या देवाचा विजय पाहिला आहे.

१) नवीन गीत गाऊन प्रभूचे गुणगान करा. 

कारण त्याने अलौकिक कृत्ये केली आहेत.

 त्याने आपल्या हाताने व पवित्र बाहुबलाने 

विजय संपादन केला आहे.


२) पृथ्वीच्या कानाकोपऱ्यांनी आमच्या 

देवाचा विजय पाहिला आहे. 

पृथ्वीवरील सर्व लोकहो, प्रभूचा जयजयकार करा. 

जयघोष करून आनंदाने गा.


३) प्रभूचे गुणगान वीणेवर करा. 

मंजुळ स्वराने वीणेवर गा. 

तुतारी व कर्णा यांच्या निनादात 

प्रभुरायासमोर जयघोष करा.


जयघोष                                                                      

आलेलूया,आलेलूया !

शब्द देह झाला आणि त्याने आम्हांमध्ये वस्ती केली,

 परंतु ज्यांनी त्याचा स्वीकार केला त्यांना म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला.

आलेलूया !

शुभवर्तमान योहान  १:२९-३४ 

वाचक :   योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन  

"हे पाहा, जगाचे पाप हरण करणारे देवाचे कोकरू."

येशूला आपणाकडे येताना पाहून योहान म्हणाला, “हे पाहा, जगाचे पाप हरण करणारे देवाचे कोकरू. माझ्यामागून एक पुरुष येत आहे तो माझ्यापुढे झाला आहे कारण तो माझ्यापूर्वी होता, असे ज्याच्याविषयी मी म्हणालो, तो हाच आहे. मी त्याला ओळखत नव्हतो, तरी इस्राएलला प्रकट व्हावे म्हणून पाण्याने बाप्तिस्मा करीत आलो आहे." आणि योहानने अशी साक्ष दिली की, "आत्मा कबुतरासारखा आकाशातून उतरत असताना आणि त्याच्यावर स्थिर राहिलेला मी पाहिला. मी तर त्याला ओळखत नव्हतो तरी ज्याने मला पाण्याने बाप्तिस्मा करावयास पाठवले त्याने मला सांगितले होते की, ज्या कोणावर आत्मा उतरत असताना व स्थिर राहताना पाहशील तोच पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा करणार आहे. मी स्वतः पाहिले आहे व साक्ष दिली आहे की, हा देवाचा पुत्र आहे."

वाचक : प्रभूचे हे शुभवर्तमान . 

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. 


चिंतन :   ख्रिस्तसभा आज प्रभू येशूच्या महान नामाचा सन्मान करीत आहे. संत पौल म्हणतो,‘स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा, आणि देवपित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने 'येशू ख्रिस्त हा प्रभू आहे' असे कबूल करावे.' प्रभू येशूच्या महान नावात शक्ति, सामर्थ्य व कृपा आहे.  त्याच्या नावाने सर्वांचे तारण झाले आहे. प्रभू येशूचे नाव हाच आमचा आसरा व आमचे जीवन आहे. त्या नामाला कोटीकोटी प्रणाम.

प्रार्थना : प्रभू परमेश्वरा, पापाबद्धल पश्चात्ताप करुन तुझी आज्ञाधारक मुले बनण्यास आम्हाला कृपा दे, आमेन.


सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️