Marathi Bible Reading | Wednesday 4thJanuary 2023| Christmas weekday

हे नवीन वर्ष आपल्या सर्वाना प्रभूच्या  सहवासात 

सुखाचे व  भरभराटीचे जावो  . 

बुधवार  दि. ४ जानेवारी  २०२३

तेव्हा तो त्याला म्हणाला, “मसिहा (म्हणजे ख्रिस्त) आम्हाला सापडला आहे." त्याने त्याला येशूकडे आणले. 

✝️





संत एलिझाबेथ ॲन बॅले

व्रतस्थ (१७७४-१८२१)

 ✝️

  
न्यूयॉर्क शहरातील एका सुप्रसिद्ध प्रॉटेस्टंट कुटुंबात २८ ऑगस्ट १७७४ रोजी एलिझाबेथ ॲन बॅले सेतन हिचा जन्म झाला. तिचे वडील एक विख्यात 'डॉक्टर होते आणि किंग्ज कॉलेजमध्ये शरीरशास्त्राचे प्राध्यापक होते. तर तिची आई कॅथरीन बॅले एपिस्कोपेलियन पंथाच्या प्रमुखाची कन्या होती.

एलिझाबेथ यौवनावस्थेत असताना तिची आई मरण पावली आणि तिच्या वडिलांनी तिला लहानाचे मोठे केले. त्यांनी तिला उत्तम शिक्षण दिले आणि चांगले शिष्टाचारही शिकविले. बालपणापासूनच तिला गरीब आणि आजाऱ्यांविषयी विशेष कळकळ वाटत असे. ती त्यांना इतक्या हळूवारपणे हाताळीत असे की ते तिला प्रेमाने "प्रॉटेस्टंट सिस्टर ऑफ चॅरिटी" ह्या नावाने संबोधित. लहानपणीच तिने केलेल्या लिखाणावरून तिची आध्यात्मिक प्रवृत्ती आणि धार्मिकता दिसून येते.

किशोरावस्थेतच तिच्या एपिस्कोपेलियन पंथाशी काहीही सोयरसुतक नसलेल्या प्रथा परंपरा ती इमाने इतबारे पाळीत होती. ती गळ्यात क्रूस घाली. रोज आपल्या सद्सद्विवेकबुद्धीची झडती घेई आणि बायबल व्यतिरिक्त 'ख्रिस्तानुवर्तन' ह्या पुस्तकाची पारामणे करी.

 ४ मार्च १८०५ रोजी तिने कॅथोलिक ख्रिस्तसभेमध्ये प्रवेश केला. त्यामुळे तिच्या प्रॉटेस्टंट नातेवाईकांनी व मित्रपरिवाराने तिला वाळीत टाकले. तिला जीवनावश्यक वस्तूंपासूनही त्यांनी वंचित ठेवले. हा सर्व विरोध सहन करून ती कॅनडा येथे गेली. तेथील बाल्टीमोरच्या सप्लीशियन संस्थेच्या प्रमुखांनी तिला बोलावणे केले होते. ह्या संस्थेचे सुपिरिअर फादर ड बॉर्ग ह्यांनी संत मेरी सेमिनरी नजीक मुलींसाठी एक शाळा सुरू केली.

ह्या शाळेची जबाबदारी तिने स्वीकारली आणि लवकरच बऱ्याच स्त्रिया तिला मदत करण्यासाठी पुढे सरसावल्या. पुढे पुष्कळशा विद्यार्थिनींनी तिच्या शाळेत प्रवेश घेतला. कित्येक विद्यार्थिनींनी ह्या शाळेचे रूपांतर कॉन्व्हेन्टमध्ये करावे अशी मागणी तिच्याजवळ केली. त्यामुळे बाल्टीमोरच्या बिशपांनी तिच्याकडे एक आचारसंहिता दिली व सिस्टर होऊ इच्छिणाऱ्या मुलींना प्रवेश देण्याची परवानगीसुद्धा दिली. त्यांनी तिच्याकडून धार्मिकतेची शपथ घेवविली. तिच्या संस्थेसाठी विशिष्ट रंगाची वस्त्रे सुचविली आणि पहिल्या कम्युनिटीची सुपिरिअर म्हणून तिची नेमणूक करण्यात आली.

इ. स. १८०९ साली ती मेरीलॅण्ड जवळच्या एमीट्सबर्ग नामक खेड्यात गेली. तिथे तिने संत विन्सेंट डी पॉलच्या आचारसंहितेवर आधारित सिस्टर्स ऑफ चॅरिटी ही संस्था स्थापन केली. अमेरिकन परोकियल शाळा पद्धतीचा पाया तिने घातला, शिक्षकांना घडविले, पाठ्यपुस्तकेही तयार केली, अनेक आध्यात्मिक शोधनिबंध लिहिले. गरीब व आजारी लोकांना मदत केली, अनेकांना कॅथलिक ख्रिस्तसभेची शिकवण दिली. फिलाडेल्फिया व न्यूयॉर्क ह्या ठिकाणी तिने अनाथालये सुरू केली..

एवढ्या सर्व परिश्रमामुळे थकून भागून गेलेल्या एलिझाबेथने म्हणजेच मदर सेटनने ४ जाने. १८२१ रोजी महानिद्रा घेतली. १४ सप्टेंबर १९७५ रोजी पोप पॉल सहावे ह्यांनी तिला संतपदाचा किताब प्रदान केला. तिच्या संतीकरणाच्या दिवशी व्हॅटिकनने ते वर्ष स्त्रियांचे पवित्र वर्ष किंवा 'महिला वर्ष' म्हणून जाहीर केले. कारण युवती, माता, विधवा आणि व्रतस्थ अशा स्त्रीत्वाच्या सर्व अवस्था तिने पार केल्या होत्या.

चिंतन : अंतोनिओ फिलिची ह्यांनी एलिझाबेथविषयी पुढील उद्गार काढले आहेत: "गरीब पातक्यांविषयी तिच्या मनात एक आगळीच कणव आणि ममता भरलेली होती. कोणत्याही व्यक्तीविषयी वाईट उद्गार काढणे तिला आवडत नसे. अशावेळी ती मौन धारण करणे पसंत करीत असे.”

 

पहिले वाचन १ योहान ३:७-१०
वाचक : योहानचे पहिले पत्र यातून घेतलेले वाचन 

"जो कोणी देवापासून जन्मलेला आहे तो पाप करीत नाही."

मुलांनो, कोणी तुम्हांला बहकवू नये. जसा तो नीतिमान आहे तसा नीतीने चालणाराही नीतिमान आहे. पाप करणारा सैतानाचा आहे, कारण सैतान प्रारंभापासून पाप करीत आहे. सैतानाची कृत्ये नष्ट करण्यासाठीच देवाचा पुत्र प्रकट झाला.
जो कोणी देवापासून जन्मलेला आहे तो पाप करीत नाही. कारण त्याचे बीज त्याच्यामध्ये राहते. त्याच्याने पाप करवत नाही कारण तो देवापासून जन्मलेला आहे ह्यावरून देवाची मुले व सैतानाची मुले उघड दिसून येतात. जो कोणी नीतीने वागत नाही तो देवाचा नाही व जो आपल्या बधूंवर प्रीती करीत नाही तोही देवाचा नाही.

हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र :१,७-८,९
प्रतिसाद :   पृथ्वीच्या कानाकोपऱ्यांनी आमच्या देवाचा विजय पाहिला आहे.

१)न वीन गीत गाऊन प्रभूचे गुणगान करा, 
कारण त्याने अलौकिक कृत्ये केली आहेत. 
त्याने आपल्या हाताने व पवित्र बाहुबलाने 
विजय संपादन केला आहे.

२) सागर व त्यातले प्राणी, तसेच जग व 
त्यात राहणारे सगळे गर्जना करोत. 
नद्या टाळ्या वाजवोत. पर्वत जमून प्रभूसमोर 
आनंदाने गावोत, कारण 
तो पृथ्वीवर राज्य करायला आला आहे.

३ )तो जगाचा यथायोग्य न्याय करील. राष्ट्रांना न्यायाने वागवील.

जयघोष
आलेलुया, आलेलुया ! 
राष्ट्रांनो, या, प्रभूला नमन करा.
आमच्यावर पवित्र दिवस उजाडला आहे, 
कारण आज जगावर महातेज पसरले आहे.
 आलेलुया!

शुभवर्तमान योहान १:३५-४२

वाचक :  योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

"ख्रिस्त आम्हाला सापडला आहे. "

योहान आपल्या शिष्यांतील दोघांसह उभा असता येशूला जाताना न्याहाळून पाहून म्हणाला, “हे पाहा, देवाचे कोकरू!” त्याचे हे म्हणणे त्या दोघा शिष्यांनी ऐकले व ते येशूच्या मागोमाग निघाले. तेव्हा येशू वळून त्यांना आपल्या मागे येताना पाहून म्हणाला, “तुम्ही काय शोधता ?” ते त्याला म्हणाले, "रब्बी" (म्हणजे गुरुजी), "आपण कोठे राहता ?" तो त्यांना म्हणाला, “या म्हणजे पाहाल.” मग त्यांनी जाऊन तो कोठे राहात आहे ते पाहिले व त्या दिवशी ते त्याच्या येथे राहिले. तेव्हा सुमारे दहावा तास होता. योहानचे म्हणणे ऐकून त्याच्यामागे जे दोघेजण गेले, त्यांच्यापैकी एक शिमोन पेत्रचा भाऊ अंद्रिया हा होता. त्याला त्याचा सख्खा भाऊ शिमोन पहिल्याने भेटला, तेव्हा तो त्याला म्हणाला, “मसिहा (म्हणजे ख्रिस्त) आम्हाला सापडला आहे." त्याने त्याला येशूकडे आणले. येशूने त्याच्याकडे न्याहाळून पाहून म्हटले, “तू योहानचा मुलगा शिमोन आहेस. तुला केफा (म्हणजे पेत्र किंवा खडक) म्हणतील.”

वाचक : प्रभूचे हे शुभवर्तमान . 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. 


चिंतन : आपल्या प्रत्येकाचा बाप्तिस्मा  ख्रिस्ताच्या नावाने झाला आहे. आपल्या सर्वांना प्रभू येशूने सैतानाच्या आणि पापांच्या बंधनातून मुख्त  केले आहे. त्या तारणाऱ्या प्रभू येशूची ओळख आपण इतरांना करून देऊ या. प्रभू ख्रिस्ताठायी आपण सर्वजण देवाची मुले बनलो आहोत आपण त्याच आपल्या मशीहाला धन्यवाद देऊन व त्याची स्तुति करुन त्याची शुभवार्ता सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील बनू या.

प्रार्थना : हे प्रभू येशू, आमच्या तारणदात्या प्रभू, तुझ्या सुवार्तेची साक्ष देण्यास मला तुझी प्रेरणा व कृपा दे, आमेन.


सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 

आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️ 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या