Marathi Bible Reading |Wednesday 17th May 2023 | 6th Week of the Easter |

 पुनरुत्थान ६वा  सप्ताह 

 बुधवार दि.१७ मे २०२३ 

तो सत्याचा आत्मा येईल, तेव्हा तो तुम्हाला मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल;  
✝️



 संत पास्काल बेलॉन
-वर्तनसाक्षी (१५४०-१५९२)
स्पेनमध्ये पेन्टेकॉस्ट या दिवसाला पवित्र आत्म्याचा “पास्का " असे म्हणतात. त्याच दिवशी जन्म झाल्यामुळे एका शेतकऱ्याच्या मुलाला पास्काल असे नाव देण्यात आले. त्याला अगदी बालपणापासून पवित्र मिस्साविषयी विलक्षण आदर वाटत असे..
वयाच्या २२ व्या वर्षी तो अल्कान्ताराच्या सुधारणावादी परंतु अत्यंत शिस्तप्रिय संस्थेमध्ये प्रापंचिक धर्मबंधू म्हणून शिक्षण घेऊ लागला. या संस्थेच्या स्पेनमधील विविध शाखांमध्ये त्याने नम्रपणे द्वारपालक म्हणून काम केले. गोरगरीब व अभागी बंधुभगिनी ह्यांच्याविषयी त्याच्या मनात कमालीची कळकळ होती.
अतिपवित्र साक्रामेंतासमोर तो बऱ्याचदा तासन्तास बसलेला आढळत असे. कधीकधी तो साक्षात्कारी अवस्थेत दंग असलेला दिसून येई. अशाच अवस्थेमध्ये त्याला धर्माविषयीच्या चिरंतन सत्याचे अगाध ज्ञान प्राप्त होई. त्याचे शिक्षण अल्प असले तरी आध्यात्मिकतेमध्ये तो पुरेपूर मुरलेला होता. त्यामुळे त्याच्या समकालीन तज्ज्ञांबरोबर तो सारख्याच पातळीवर आध्यात्मिक गोष्टींची चर्चा करीत असे. त्याचे मार्गदर्शन मिळविण्यासाठी सर्व थरांतील लोक त्याच्याकडे येत.
जीवनात येणारी संकटे, दु:खे, आजार, अपयश, निराशा आणि गोंधळात टाकणारी स्थिती ह्यामुळे माणसे अस्वस्थ बनतात. बाह्य जगात  चाललेला भ्रष्टाचार, दहशत, अन्याय व अत्याचार ह्यांमुळे माणसे भयभीत  झालेली आपण पाहतो. जीवनातील अशी अस्वस्थता, भीती अनिश्चितता  ह्यांमुळे आपण चिंताग्रस्त बनतो.

पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने संत पौलाने अरीपगातील अनेक दैवतांची पूजा  करणाऱ्या अथेनैकरांना खऱ्या देवाची ओळख करुन दिली. त्यांच्या दैवतापैकी 'अज्ञात देवाची वेदी' म्हणजेच खरा निर्माणकर्ता प्रभू परमेश्वर असल्याची खात्री  संत पौलाने त्यांना पटवून दिली. पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने संत पौलाने केलेल्या  मार्गदर्शनपर भाषणावर आज चिंतन करणे महत्वाचे आहे. संत पौल म्हणतो की, ‘अज्ञात देव म्हणजेच पृथ्वीचा निर्माता आहे. तोच जीवन देतो, तो आपल्या पैकी कोणापासूनहि दूर नाही.' आपण त्याच्या ठायी जगतो, वागतो व आहो. आपण  वास्तविक त्याचा वंश आहोत. सर्वानी पश्चाताप करावा अशी तो माणसांना आज्ञा  करितो. तो आपण नेमलेल्या मनुष्याच्याद्वारे जगाचा न्यायनिवाडा नीतिमत्वाने करणार आहे.

पहिले वाचन प्रेषितांचे कृत्ये १७:१५,२२-१८:१
वाचक : प्रेषितांचे कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन

“ज्याचे तुम्ही अज्ञानाने भजन करता त्या देवाला मी

तुम्हांला जाहीर करतो." पौलला पोहोचविणाऱ्यांनी त्याला अथेन्सपर्यंत नेले आणि सीला आणि तीमथी ह्यांनी आपणाकडे होईल तितके लवकर यावे अशी त्याची आज्ञा घेऊन ते निघाले.
पौल अरीयपगाच्या मध्यभागी उभा राहून म्हणाला : "अहो अथेन्सकरांनो, तुम्ही सर्व बाबतीत देवदेवतांना फार मान देणारे आहा असे मला दिसते. कारण मी फिरता फिरता तुमच्या पूज्य वस्तू पाहताना, अज्ञात देवाला, ही अक्षरे लिहिलेली वेदी मला आढळली. ज्याचे तुम्ही अज्ञानाने भजन करता ते मी तुम्हाला जाहीर करतो. ज्या देवाने जग आणि त्यातले अवघे निर्माण केले तो स्वर्गाचा आणि पृथ्वीचा प्रभू असून हातांनी बांधलेल्या मंदिरात राहत नाही आणि त्याला काही उणे आहे म्हणून माणसांच्या हातून त्याची सेवा घडावी असेही नाही. कारण जीवन, प्राण आणि सर्व काही तो स्वतः सर्वांना देतो आणि त्याने एकापासून माणसांची सर्व राष्ट्र निर्माण करून त्यांनी पृथ्वीच्या सबंध पाठीवर राहावे असे केले आहे. त्यांचे नेमलेले समय आणि त्यांच्या वस्तीच्या सीमा त्याने ठरवल्या आहेत; त्यांनी देवाचा शोध करावा, म्हणजे चाचपडत चाचपडत त्याला कसे तरी प्राप्त करून घ्यावे. तो आपल्यापैकी कोणापासूनही दूर नाही, कारण आपण त्याच्या ठायी जगतो, वागतो आणि आहो. तसेच तुमच्या कवींपैकीही कित्येकांनी म्हटले आहे,
"आपण वास्तविक त्याचा वंश आहो."
तर मग आपण देवाचे वंशज असताना मनुष्याच्या चातुर्याने आणि कल्पनेने कोरलेले सोने, रुपे किंवा पाषाण, ह्यांच्या आकृतीसारखा देव आहे असे आपल्याला वाटता कामा नये. अज्ञानाच्या काळाकडे देवाने डोळेझाक केली, परंतु आता सर्वांनी सर्वत्र पश्चात्ताप करावा अशी तो माणसांना आज्ञा करतो. त्याने असा एक दिवस नेमला आहे की, ज्या दिवशी तो आपण नेमलेल्या मनुष्याच्या द्वारे जगाचा न्यायनिवाडा नीतिमत्त्वाने करणार आहे, त्याने त्याला मेलेल्यांमधून उठवून ह्याविषयीचे प्रमाण सर्वांना पटवले आहे."
तेव्हा मृताच्या पुनरुत्थानाविषयी ऐकून कित्येक थट्टा करू लागले. कित्येक म्हणाले, “ह्याविषयी आम्ही तुमचे पुन्हा आणखी ऐकू." इतके झाल्यावर पौल त्यांच्यामधून निघून गेला. तरी काही माणसांनी त्याला चिकटून राहून विश्वास ठेवला, त्यात दिओनुस्य अरीयपगकर, दामारी नावाची कोणी स्त्री आणि त्यांच्याबरोबर इतर कित्येक होते. त्यानंतर तो अथेन्स सोडून करिंथ येथे गेला.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र १४८:१-२,११-१४
प्रतिसाद : तुझ्या ऐवयनि आकाश आणि पृथ्वी भरली आहे. 

१) परमे बराचे स्तवन करा!
आकाशातून परमेश्वराचे स्तवन करा, 
उद्धवलोकी त्याचे स्तवन करा.
अहो त्याच्या सर्व दूतांनो, त्याचे स्तवन करा. 
त्याच्या सर्व सैन्यांनो, त्याचे स्तवन करा.

२) पृथ्वीवरील राजे आणि सर्व प्रजा, अधिपती 
आणि पृथ्वीवरील सर्व न्यायाधीश, कुमार आणि कुमारी,
वृद्ध आणि तरूण त्याचे स्तवन करा,

३) ही सगळी परमेश्वराच्या नामाचे स्तवन करोत 
कारण केवळ त्याचेच नाम उच्च आहे. 
त्याचे ऐश्वर्य पृथ्वीच्या आणि आकाशाच्या वर आहे.

 ४) त्याने आपल्या लोकांचा उत्कर्ष केला आहे. 
हे त्याच्या सर्व भक्तांना त्याच्याजवळ असलेल्या लोकांना
म्हणजे इसाएलच्या संततीला स्तुतिपात्र झाले आहे. 
परमेसराचे स्तवन करा.


जयघोष
आलेलुया, आलेलुया !
सर्व वस्तूंचा मस्तक असलेला ख्रिस्त मेलेल्यातून उठला त्याने सर्व मानवजातीवर दया केली आहे.
आलेलुया !

शुभवर्तमान योहान १६:१२-१५

वाचक :
  
योहानलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"सत्याचा आत्मा तुम्हाला मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल."
येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, "मला अद्यापि तुम्हांला पुष्कळ गोष्टी सांगावयाच्या आहेत, परंतु आताच तुमच्याने त्या सोसवणार नाहीत. तरी तो सत्याचा आत्मा येईल, तेव्हा तो तुम्हाला मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल; तो आपल्या स्वतः चे सांगणार नाही, तर जे काही ऐकेल, तेच सांगेल आणिहोणाऱ्या गोष्टी तुम्हांला कळवील. तो माझा गौरव करील, जे माझे आहे त्यातून घेऊन ते तुम्हांला कळवील. जे काही पित्याचे आहे ते सर्व माझे आहे. म्हणून मी म्हणालो की, जे माझे आहे त्यातून घेऊन ते तुम्हांला कळवीन,
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. 

चिंतन: ग्रीसमध्ये अथेन्स हे प्रमुख सांस्कृतिक शहर होते. प्रेषित पॉलने शहराच्या वेशीवर “अज्ञात देवाला” अशी अक्षरे कोरलेली वेदी पाहिली. त्या शब्दांचा आधार देऊन पॉल अथेन्स नगरच्या लोकांना ख्रिस्ताविषयीचे शुभवर्तमान चातुर्याने सांगतो. ख्रिस्त हाच मानवतेचा तारणहार आहे. त्याला देवपित्यानेच पाठवले व मरणातून पुन्हा उठविले. तोच जगाचा न्यायनिवाडा करील असे देवानेच प्रकट केले आहे. पवित्र आत्म्याच्या प्रेरणेनेच पॉल अतिशय कुशलतेने अथेन्सच्या ग्रीक तत्वज्ञानी लोकांना शुभवर्तमान घोषित करतो. आम्हा विश्वासूंच्या जीवनात पवित्र आत्मा सदोदीत प्रेरणा देत असतो. ख्रिस्ताठायी आम्हाला लाभलेल्या नवजीवनाबद्दल जागृती निर्माण करतो.

प्रार्थना : हे पवित्र आत्म्या, ये आणि तुझ्या अगाथ शहाणपणाने व ज्ञानाने आम्हाला भरुन टाक, आमेन.


सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️      




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या