आपल्या प्रेषितीय कार्यासाठी त्याने सर्वात गरीब, भ्रष्टाचारी आणि पाखंडवादाने पोखरलेले माटेनकोर्ट नावाचे खेडे निवडले. त्याने थोड्याच वर्षात आपल्या पावित्र्यपूर्ण जीवनाने, प्रेमळ मार्गदर्शनाने आणि नित्याच्या प्रार्थनेद्वारे तिथे संपूर्ण आध्यात्मिक क्रांती घडवून आणली. आपल्या प्रजेच्या ऐहिक जीवनातील वादविवाद मिटविण्यासाठी त्याने समझोता मंडळांची स्थापना केली.
आपल्या धर्मग्रामातील गरीब मुलांकडे मात्र त्याचे विशेष लक्ष होते. तो त्यांना अतिशय प्रेमाने वागवित असे. आपल्या धर्मग्रामातील मुलींसाठी त्याने १५९८ साली पहिली शाळा उघडली. धन्यवादित आलिक्स ले क्लर्क ह्यांच्या समर्थ नेतृत्वाखाली धर्मभगिनींनी ही शाळा चालविली. पुढे ही शाळा नॉट्रे डॅमचे काँग्रीगेशन या नावाने प्रसिद्धीस आली. तेथील पटसंख्या दिवसेंदिवस वाढत गेली. त्याचे रूपांतर लवकरच एका कॉन्व्हेंटमध्ये झाले. फ्रेंच राजक्रांतीच्या वेळी तिथे ४,००० धर्मभगिनी कार्यरत होत्या. इतकं विलक्षण यश फा. पीटरच्या कार्याला आले. कालांतराने धन्यवादित मार्केट बॉर्जीयुस हिने ह्या संस्थेचे कार्य कॅनडातील मॉडियल शहरापर्यंत नेऊन पसरविले.
पुरुषांसाठी फा. पीटर ह्यांनी संत सेबेस्टीयन (सण २० जाने.) ह्यांच्या नावाने सोड्यालिटी स्थापन केली आणि स्त्रियांसाठी पवित्र जपमाळेची सोड्यालिटी तर मुलींसाठी निष्कलंक गर्भसंभवाची सोड्यालिटी स्थापन केली. मुलांना चांगले धार्मिक वळण लागावे म्हणून माटेनकोर्टच्या ह्या चांगल्या धर्मगुरूंनी ख्रिस्ती सद्गुणांवर आधारित छोट्या छोट्या नाटिकांची एक मालिकाच प्रसिद्ध केली. ती इतकी लोकप्रिय झाली की, मुलांना त्या नाटिकांतील अनेक संवाद तोंडपाठ येत असत.
इ.स. १६२१ साली शैलच्या बिशपांनी फा. पीटर ह्यांना संत अगस्तीनच्या कॅनन रेग्युलर (म्हणजे आचारसंहिता) ची सुधारित आवृत्ती करण्यास पाचारण केले. त्याचाच परिणाम म्हणजे आपल्या उद्धारकाच्या नावाने सुरू झालेली "कांग्रीगेशन ऑफ अवर सेव्हियर" अशा प्रकारच्या आचार संहिता सिस्टरांच्या कॉन्व्हेंटमधून जरी मोठ्या प्रमाणात यशस्वी झालेली आढळून आली तरी तरूण मुलांमध्ये मात्र ती अपयशी ठरली.
कैलव्हीनच्या विचारसरणीमुळे झालेली ख्रिस्ती श्रद्धेची हानी संत पीटर फोरिअरच्या उल्लेखनीय समर्पित वृत्तीमुळे भरून निघाली. या विचारसरणीचे समर्थन करणारे कैल्थीनचे अनुयायी (प्रॉटेस्टंट पंथीय दोरी तुटलेल्या पतंगाप्रमाणे - भटकलेले खिस्ती) पुन्हा खिस्तसभेत आले. संत पीटर ९ जानेवारी १६४० या दिवशी मरण पावले आणि १८९७ साली संत म्हणून प्रकाशात आले.
"तुझ्या विनवणीमुळे प्रभू तुझ्यावर कृपा करील."
इस्राएलचा प्रभू परमेश्वर म्हणतो:
“सियोनात, येरुशलेमात, लोकांची वस्ती राहील. तू यापुढे कधी शोक करणार नाहीस. तुझ्या विनवणीच्या शब्दांबरोबर तुझ्यावर अवश्य कृपा करील. ती ऐकताच तो तुला पावेल. प्रभू भाकरीची टंचाई आणि पाण्याचे दुर्भिक्ष्य करील, ती यापुढे तुझे शिक्षक दृष्टिआड राहणार नाहीत. तुझ्या डोळ्यांना तुझे शिक्षक दिसतील. हाच मार्ग आहे, या मार्गाने चला, अशी वाणी तुमच्या मागून कानी पडेल. मग तुम्हांला उजवीकडे जावयाचे असो किंवा डावीकडे जावयाचे असो. तू आपले बी पेरशील त्यावर तो पाऊस पाडील. भूमी पीक देईल. ते अन्न रसभरित आणि सत्त्वपूर्ण असेल. त्या काळी तुझी गुरेढोरे विस्तीर्ण कुरणात चरतील. शेतात राबणारे बैल आणि जवान गाढव यांना दाताळ्याने उफणलेल्या आणि सुपाने पाखडलेल्या धन्याचे आंबवण खायला मिळेल. मोठ्या कत्तलीच्या दिवशी बुरुज पडतील तेव्हा उंच डोंगरावर आणि प्रत्येक उंच टेकडीवर झरे व ओहोळ होतील. त्या दिवशी परमेश्वर आपल्या लोकांच्या जखमा बांधील, त्याच्या प्रहाराच्या जखमा बऱ्या करील, त्या दिवशी चंद्रप्रकाश सूर्यप्रकाशासारखा आणि सूर्यप्रकाश सात दिवसांच्या प्रकाशासारखा मोठा होईल'