सामान्यकाळातील ५वा सप्ताह
शुक्रवार दि ९ फेब्रुवारी २०२४
✝️
Receive with meekness the implanted word, which is able to save your souls.
शुभवर्तमान मार्क ७:३१-३७
वाचक :मार्कलिखितपवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"तो बहिऱ्यांना ऐकण्याची आणि मुक्यांना बोलण्याची शक्ती देतो."
येशू सोर प्रांतातून निघाला आणि सिदोनवरून दकापलीस प्रांतामधून गालील समुद्राकडे परत आला. तेव्हा लोकांनी एका बहिऱ्या-तोतऱ्या माणसाला त्याच्याकडे आणून आपण ह्याच्यावर हात ठेवावा अशी त्याला विनंती केली. तेव्हा त्याने त्याला लोकांपासून एकीकडे नेऊन त्याच्या कानात बोटे घातली आणि थुकून त्याच्या जिभेला स्पर्श केला आणि वर स्वर्गाकडे पाहून त्याने नि:श्वास सोडला आणि म्हटले, "इफ्फाथा," म्हणजे "मोकळा हो." तेव्हा त्याचे कान मोकळे झाले आणि त्याच्या जिभेचा बंद लागलीच सुटून तो स्पष्ट बोलू लागला. तेव्हा हे कोणाला कळवू नका असे त्याने त्यांना निक्षून सांगितले, परंतु तो त्यांना जसेजसे सांगत गेला तसेतसे ते अधिकच जाहीर करीत गेले आणि ते अतिशय थक्क होऊन म्हणाले, "त्याने सर्वकाही चांगले केले आहे, हा बहिऱ्यांना ऐकण्याची आणि मुक्यांना बोलण्याची शक्ती देतो."
प्रभूचे हे शुभवर्तमान