Ticker

6/recent/ticker-posts

30th September 2020

 वाचन १, ईयोब ९ : १-१२


मग ईयोब उत्तरा दाखल म्हणाला:
“तू जे काही म्हणत आहेस ते खरे असल्याची जाणीव मला आहे, परंतु देवापुढे माणूस कसा बरोबर ठरेल?
मनुष्य देवाशी वाद घालू शकत नाही. देव हजार प्रश्र्न विचारु शकतो आणि माणसाला त्याच्या एकाही प्रश्र्नाचे उत्तर देता येत नाही.
देव खूप विद्वान आहे आणि त्याची शक्ती अमर्याद आहे. देवाशी युध्द करु शकणारा माणूस जखमी झाल्याशिवाय कसा राहील?
देव क्रोधित झाला की पर्वत हलवतो आणि लोकांना ते कळत देखील नाही.
पृथ्वीचा थरकाप करण्यासाठी देव भूकंप पाठवतो. देव पृथ्वीचा पायाच हलवून टाकतो.
देव सूर्याशी बोलू शकतो आणि त्याला उगवू देत नाही. ताऱ्यांनी चमकू नये म्हणून देव त्यांना लपवू शकतो.
देवाने एकट्याने आकाश निर्माण केले. तो सागराच्या लाटांवर चालतो.
देवाने सप्तर्षि, मृगशील व कृत्तिका यांना निर्माण केले. दक्षिणेकडचे आकाशओलांडणारे ग्रहही त्यानेच निर्माण केले.
लोकांना न कळणाऱ्या आश्र्चर्यकारक गोष्टीही देवानेच निर्मिल्या. देवाच्या अद्भुत कृत्यांची सीमा नाही.
देव जेव्हा माझ्या जवळून जातो तेव्हा मी त्याला बघू शकत नाही. तो जातो तरी त्याची महानता माझ्या लक्षात येत नाही.
देवाने जरी काही घेतले तरी त्याला कोणीही अडवू शकत नाही. ‘तू काय करीत आहेस?’ असे त्याला कुणी विचारु शकत नाही.
म्हणून मी देवाशी वाद घालू शकत नाही. त्याच्याशी काय बोलावे ते मला सुचणार नाही.
मी निष्याप आहे, पण मी त्याला उत्तर देऊ शकणार नाही. मी केवळ माझ्या देवाची कृपादृष्टी मिळावी म्हणून याचना करु शकतो.
मी हाक मारल्यानंतर त्याने ओ दिली तरी तो माझे ऐकतो यावर मी विश्वास ठेवणार नाही.
हा प्रभूचा शब्द आहे


स्तोत्रे ८८:१०-१५

प्रतिसाद : प्रभो माझी प्रार्थना तुझ्यापुढे सादर होवो. 


१)परमेश्वरा, तू मृतांसाठी चमत्कार करतोस का? भुते उठून तुझी स्तुती करतात का? नाही.थडग्यातले मृत लोक तुझ्या प्रेमाबद्दल बोलू शकत नाहीत. 

२)मृत्युलोकातील मृतलोक तुझ्या इमानीपणाविषयी बोलू शकत नाहीत.
अंधारात पडलेले मृतलोक तुझी अद्भुत कृत्ये पाहू शकत नाहीत. विस्मृतीच्या जगातले मृतलोक तुझ्या चांगुलपणाविषयी बोलू शकत नाहीत.

३)परमेश्वरा, मी तुला मदत करण्याविषयी विचारत आहे. प्रत्येक दिवशी पहाटे मी तुझी प्रार्थना करतो.परमेश्वरा, तू माझा त्याग का केलास? तू माझे ऐकायला नकार का देतोस?

शुभवर्तमान, लूक  ९: ५७-६२

ते रस्त्याने चातल जात असता कोणी तरी त्याला म्हणाले, “तू जेथे कोठे जाशील तेथे मी तुझ्यामागे येईन.”
तेव्हा येशू त्याला म्हणाला, “कोल्ह्यांना बिळे आहेत, आणि आकाशातील पक्ष्यांना घरटी आहेत, पण मनुष्याच्या पुत्राला डोकेसुध्दा टेकावयास जागा नाही.”
तो दुसऱ्या एकाला म्हणाला, “माझ्यामागे ये.” पण तो मनुष्य म्हणाला, “पहिल्यांदा मला जाऊ दे आणि माझ्या वडिलांना पुरु दे.”
पण येशू त्याला म्हणाला, “मेलेल्यांना त्यांच्या मेलेल्यांना पुरु दे. तू जा आणि देवाच्या राज्याची घोषणा कर.”
दुसरा म्हणाला, “मी तुला अनुसरेन, प्रभु पण अगोदर मला माझ्या घरातील लोकांचा निरोप घेऊ दे.”
पण येशू त्यांस म्हणाला, “जोे कोणी नांगराला हात घालतो व मागे पाहतो तो देवाच्या राज्यासाठी योग्य नाही.”      

प्रभूचे हे शुभवर्तमान