सामान्यकाळातील १७ वा सप्ताह
सोमवार दिनांक २८ जुलै २०२५
संत सिस्टर अल्फोन्सा
कुमारिका (१९१०-१९४६)
केरळातल्या कुदानाळूर नावाच्या गावात १९ ऑगस्ट १९१० साली जोसेफ व मेरी ह्यांच्या संसारवेलीवर आन्ना नावाचे चौथे अपत्य उमलले, आईच्या मृत्यूनंतर तिच्या मावशीने आन्नाचे पालन पोषण केले. तिच्या बालपणी तिने वाचलेली लिझोची संत तेरेजा हिची कहाणी वाचून आपण प्रार्थना आणि प्रायश्चित्त ह्या माध्यमातून संत व्हावे असे तिला वाटू लागले.
आन्ना हिला कॉन्व्हेंटमध्ये जायचे होते, परंतु तिच्या मावशीने तिचे आधीच लग्न ठरविलेले होते. आपली सोयरिक मोडणे आता केवळ अशक्य आहे असे दिसताच तिने आपले सौंदर्य नष्ट करण्यासाठी मोठ्या अग्नी ज्वालेमध्ये आपला पाय घातला. परंतु सुदैवाने तो घसरला आणि ती स्वतः त्या ज्वालेत पडली व मोठ्या प्रमाणात भाजली. मात्र थोड्याशा औषधोपचारानंतर ती बरी झाली. त्यानंतर तिच्या मावशीने तिला व्रतस्थ जीवनात प्रवेश करण्यास परवनागी दिली.
या महत्त्वाच्या जीवनासाठी आपली तयारी करण्यासाठी ती भारानांगानाम येथील कॉन्व्हेंटमध्ये नवशिष्य म्हणून इ. स. १९२८ साली दाखल झाली. तिथे वैराग्याची वस्त्रे पांघरल्यानंतर सिस्टर अल्फोन्सा ह्यांच्या जीवनात तीन प्रसंग येऊन गेले.
इ. स. १९३५ साली कॉन्व्हेंटमध्ये प्रशिक्षण घेत असतानाच तिला एका असाध्य रोगाने पछाडले. तीन महिने ती ह्या आजाराशी झुंज देत होती. त्यावेळी तिने धन्यवादित कुरियाकोस एलायस चावरा (सण ३ जानेवारी) ह्यांचा नोव्हेना केला आणि ती ठणठणीत बरी झाली.
दुसऱ्या एका प्रसंगात एका संध्याकाळी एक चोर त्यांच्या कॉन्व्हेंटमध्ये शिरलेला पाहून तिने इतका धसका घेतला की, ती बेशुद्ध होऊन पडली. शुद्धीवर आल्यानंतर तिला तामिळ भाषेची देणगी मिळाल्याचे दिसून आले. त्याआधी तिने तामिळ ही भाषा कधी वाचली, लिहिली की बोलली नव्हती. आता ह्या नवीन दानामुळे ती तामिळी लोकांमध्ये प्रसिद्ध झाली. बरेच लोक तिच्याकडे मार्गदर्शनासाठी येऊ लागले. तिला दूरदृष्टीची विलक्षण देणगी देखील लाभलेली होती.
तिसऱ्या एका घटनेत इ. स. १९४५ साली तिला येशूच्या दुःख सहनाशी एकरूप होण्याची संधी मिळाली. सुरूवाती-सुरूवातीला हे दुःखसहन केवळ शुक्रवारी ३ तासासाठी होई. पुढे ते कधीही होऊ लागले. परंतु त्यातून बाहेर आल्यानंतर तिच्या चेहऱ्यावर थकल्याची कुठलीही खूण दिसत नसे. उलट आगळाच ताजेतवानेपणा तिच्या मुखवट्यावर विलसत असे.
हे दु:खसहन प्रसंग मर्यादित व्हावे अशी प्रार्थना तू का करीत नाहीस? असा प्रश्न विचारणाऱ्या सिस्टरांना तिने दिलेले उत्तर सामान्य माणसाला अंतर्मुख करणारे असेच आहे. ती म्हणाली मी केवळ हेच दुःखसहन नव्हे तर कोणतेही दुःख सहन करण्यास तयार आहे, आजचे आधुनिक जग केवळ सुखासीनतेच्या सागरात पार डुंबलेले आहे. नाशाच्या मार्गावर असणाऱ्या जगासाठी म्हणा किंवा धर्मगुरू व धर्मभगिनींच्या उदासीन वृत्तीबद्दल म्हणा प्रभूला मला जितक्या यातना दयावयाच्या आहेत तितक्या सोसण्यास माझी पूर्ण तयारी आहे.
२८ जुलै रोजी सिस्टर अल्फोन्सा मरण पावल्या. पुढे इ. स. १९८६ सालच्या फेब्रुवारी महिन्यात जेव्हा पोप जॉन पॉल दुसरे आपल्या भारत भेटीवर आले तेव्हा कोट्टायाम (केरळ) येथे त्यांना धन्यवादित ही पदवी पोपमहाशयांनी बहाल केली. आणि Pope Benedict XVI approved Blessed Alphonsa for canonization on June 1, 2007. The fifty-five-year process of her canonization was completed just over a year later on October 12, 2008, when she was officially named a saint. St. Alphonsa was the second person of Indian origin to be canonized a saint and the first Indian woman to be elevated to the status of sainthood.
चिंतन : मी स्वत:ला सर्वस्वी येशूचरणी वाहिलेले आहे. माझ्याशी वागताना कृपया येशूला प्रसन्न करण्याचा आपण सर्वजण एकत्र प्रयत्न करू या.केवळ देवाच्या प्रेमाखातर दुःखसहन करण्यास आनंद मानणे हीच माझी एकमेव इच्छा आहे. संत सि. अल्फोन्सा