सामान्य काळातील
एकतिसावा सप्ताह
सर्व मृत भाविकांचा स्मृति दिन
सोमवार
२ नोव्हेंबर २०२०
"जो कोणी पुत्राला पाहून त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला मी शेवटच्या दिवशी उठवीन"
"शुद्धीस्थानातील आत्मे परस्परांना मदत करण्यास असमर्थ असतात त्यामुळे ते सर्वस्वी संतांच्या मध्यस्थीवर आणि आपल्या विश्वासू जनतेच्या प्रार्थना दानधर्मावर विशेषत: पवित्र मिस्साच्या कृपेवर अवलंबून असतात"
पहिले वाचन : प्रज्ञा-ग्रन्थ ३:१-९
वाचक : प्रज्ञा-ग्रन्थ यातून घेतलेले वाचन.
नीतिमानांचे आत्मे देवाच्या हाती आहेत आणि कोणतीही पीडा त्यांना स्पर्श करणार नाही. मूर्खाच्या दॄष्टीने ते मरण पावले. त्यांचे जाणे पीडा म्हणून समजले गेले. आमच्यापासून त्यांचे जाणे म्हणजे त्यांचा संपूर्ण विनाश असे मानले गेले. पण ते मात्र शांतीमध्ये आहेत. कारण जरी माणसांच्या दॄष्टीने त्यांना शिक्षा झाली, तरी त्यांना शाश्वत जीवनाची पूर्ण आशा आहे. थोडीशी शिस्त अंगी बाणल्यामुळे त्यांचा मोठा लाभ होईल. देवाने त्यांची कसोटी घेतली आणि त्याच्या दॄष्टीने ते त्याच्या सहवासाला पात्र ठरले. सोन्याची पारख भट्टीत करावी तशी त्यांची पारख त्याने केली. होमार्पणाप्रमाणे त्याने त्यांचा स्वीकार केला. न्यायाच्या दिवशी ते झळकतीळ. संकटातून ठिणग्या उडाव्या तसे चमकतील. ते राष्ट्रांचा कारभार पाहतील आणि लोकांवर राज्य करतील. प्रभू त्यांच्यावर सर्वकाळ राज्य करील.त्याच्यावर श्रद्धा ठेवणाऱ्यांना सत्याची जाणीव होईल. श्रद्धावंत जन त्याच्याबरोबर प्रेमामध्ये राहतील, कारण कॄपा आणि दया त्याच्या निवडलेल्या
लोकांवर आहे आणि तो आपल्या पवित्र जनांवर लक्ष ठेवतो.
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
स्तोत्र ४१:२,३,५, ४२:३-५
प्रतिसाद : परमेश्वर माझा मेंढपाल आहे, मला काही उणे पडणार नाही.
१)परमेश्वर माझा मेंढपाळ आहे,
मला काही उणे पडणार नाही.
तो मला हिरव्यागार कुरणात बसवतो.
तो मला संथ पाण्यावर नेतो,
तो माझा जीव ताजातवाना करतो.
२)तो आपल्या नामासाठी मला नीतिमार्गाने चालवतो.
मॄत्यूच्छायेच्या दरीतूनही मी जात असलो.
तरी कसल्याही अरिष्टाला भिणार नाही.
कारण तू माझ्याबरोबर आहेस,
तुझी आकडी आणि तुझी काठी मला धीर देतात.
३)तू माझ्या शत्रूंच्या देखत माझ्यापुढे ताट वाढतोस,
तू माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करतोस,
माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहे.
४)खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस
मला कल्याण आणि दया ही लाभतील,
आणि परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहीन.
दुसरे वाचन : रोमकरांस ६:३-९
वाचक : पौलाचे रोमकरांस पत्र यातून घेतलेले वाचन :
ख्रिस्त येशूमध्ये स्नानसंस्कार घेतलेल्या आपणा सर्वांनी त्याच्या मरणात स्नानसंस्कार घेतला आहे, ह्माविषयी तुम्ही अजाण आहात काय? आपण त्या मरणातील स्नानसंस्काराने त्याच्याबरोबर पुरले गेलो, ह्मासाठी की, ज्याप्रमाणे ख्रिस्त पित्याच्या गौरवी सामर्थ्याने मेलेल्यातून उठवला गेला त्याचप्रमाणे आपणही नवजीवन जगावे, कारण जर आपण त्याच्या मरणाच्या प्रतिरूपाने त्याच्याशी संयुक्त झालो आहोत, तर त्याच्या उठण्याच्याही प्रतिरूपाने त्याच्याशी संयुक्त होऊ. हे आपल्याला ठाऊक आहे की पापाच्या अधीन असलेले शरीर नष्ट होऊन आपण ह्मापुढे पापाचे दास्य करू नये, म्हणून आपल्यातील जुना मनुष्य त्याच्याबरोबर वधस्तंभावर खिळला गेला. कारण जो कोणी मेला तो पापाच्या दोषापासून मुक्त होऊन नीतिमान ठरला आहे. आपण ख्रिस्ताबरोबर मरण पावलो असल्यास त्याच्याबरोबर जिवंतही राहू अशी आपली श्रद्धा आहे. आपणास ठाऊक आहे की, मेलेल्यातून उठलेला ख्रिस्त ह्मापुढे मरण पावत नाही, त्याच्यावर यापुढे मरणाची सत्ता चालत नाही
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
जयगोष
आलेलूया,आलेलूया !
प्रभू म्हणतो, ज्याने मला पाठविले
त्याची इच्छा हीच आहे की,
त्याने जे मला दिले आहे
त्यातून मी काहीही हरवू नये.
आलेलूया !
शुभवर्तमान
योहान ६: ३७-४०
वाचक :योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन .
येशू लोकसमुदायास म्हणाला, “पिता जे मला देतो ते सर्व माझ्याकडे येईल आणि जो माझ्याकडे येतो त्याला मी मुळीच घालवून देणार नाही. कारण मी स्वत:च्या इच्छेप्रमाणे नव्हे, तर ज्याने मला पाठवले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे म्हणून स्वर्गातून उतरलो आहे आणि ज्याने मला पाठवले त्याची इच्छा हीच आहे की, त्याने जे सर्व मला दिले आहे त्यातून मी काहीही हरवू नये, तर शेवटल्या दिवशी मी ते उठवावे. माझ्या पित्याची इच्छा हीच आहे की, जो कोणी पुत्राला पाहून त्याच्यावर विश्वास ठेवतो, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होते, त्याला मीच शेवटल्या दिवशी उठवीन.”

0 टिप्पण्या