गुरुवार
१ नोव्हेंबर २०२०
"आनंद करा उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे. "
"संतांचे अनुकरण केल्याने व त्यांच्या मध्यस्थीने परमेश्वरापर्यंत पोहोचण्यास आपल्याला प्रेरणा मिळते, खरे पाहता स्नान संस्कार स्वीकारलेल्या प्रत्येक व्यक्तीला संत बनण्यास पाचारण करण्यात आलेले आहे. आपण संतांची जीवनचरित्र वाचावीत आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन ख्रिस्ताला अभिप्रेत असे पवित्र व परोपकारी जीवन जगण्यासाठी कृपा मागावी."
पहिले वाचन : प्रकटीकरण ७:२-४,९-१४
वाचक : प्रकटीकरण या पुस्तकातून घेतलेले वाचन.
सर्व राष्ट्रे, वंश, लोक आणि निरनिराळ्या भाषा
बोलणारे ह्मांच्यापैकी कोणाला मोजता आला नाही
असा, मोठा लोकसमुदाय माझ्या दॄष्टीस पडला.”
मी योहान ह्माने एक देवदूत सूर्योदयाच्या दिशेने वर चढताना पाहिला, त्याच्याजवळ जिवंत देवाचा शिक्का होता. ज्या चार देवदुतांकडे पॄथ्वीला आणि समुद्राला उपद्रव करण्याचे काम सोपवले होते त्यांना तो उच्च स्वराने म्हणाला, “आमच्या देवाचे जे दास आहेत त्यांच्या कपाळावर आम्ही शिक्का मारीपर्यंत पॄथ्वीला, समुद्राला आणि झाडांना उपद्रव करू नका.” ज्यांच्यावर शिक्का मारण्यात आला त्यांची संख्या मी ऐकली, इसरायल लोकांच्या सर्व वंशापैकी एक लक्ष चव्वेचाळीस हजारांवर शिक्का मारण्यात आला| ह्मानंतर मी पाहिले तो सर्व राष्ट्रे, वंश, लोक आणि निरनिराळ्या भाषा बोलणारे ह्मांच्यापैकी कोणाला मोजता आला नाही असा शुभ्र झगे परिधान केलेला आणि हाती झावळ्या घेतलेला मोठा शुभ्र लोकसमुदाय राजासनासमोर आणि कोकराच्या पुढे उभा राहिलेला माझ्या दॄय्टीस पडला. ते उच्च स्वराने म्हणत होते : “राजासनावर बसलेल्या आमच्या देवाकडून आणि कोकराकडून, तारण आहे.” तेव्हा राजासन, वडीलमंडळ आणि चार प्राणी ह्मांच्याभोवती सर्व देवदूत उभे होते, ते राजासनासमोर उपडे पडून देवाला नमन करून म्हणाले : “आमेन. धन्यवाद, गौरव, ज्ञान, उपकारस्तुती, सन्मान, सामर्थ्य, आणि बळ ही युगानुयुग आमच्या देवाची आहेत. आमेन.” तेव्हा वडीलमंडळीपैकी एकाने मला म्हटले, “शुभ्र झगे परिधान केलेले हे कोण आहेत आणि कोठून आले.” मी त्याला म्हटले, “प्रभो, हे तुला ठाऊक आहे.” तो मला म्हणाला, “मोठया संकटांतून येतात ते हे आहेत, ह्मांनी आपले झगे कोकराच्या रक्तात धुऊन शुभ्र केले आहेत.”
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
स्तोत्र २३:१-६
प्रतिसाद : हे देवा तुझ्या दर्शनासाठी आतूर असलेले हेच
लोक होत.
१)पॄथ्वी आणि तिच्यावरील सर्वकाही परमेश्वराचे आहे,
जग आणि त्यात राहणारे परमेश्वराचे आहेत.
कारण त्यानेच सागरांवर तिचा पाया घातला,
त्यानेच जलप्रवाहांवर तिला स्थिर केले.
२)परमेश्वराच्या पर्वतावर कोण चढेल?
त्याच्या पवित्र स्थानात कोण उभा राहील?
ज्याचे हात स्वच्छ आहेत आणि ज्याचे मन शुद्ध आहे,
जो आपले चित्त असत्याकडे लावत नाही तो.
३)त्याला परमेश्वरापासून आशीर्वाद मिळेल,
आपल्या उद्धारक देवाच्या हातून तो नीतिमान ठरेल.
त्याला शरण जाणारे हेच लोक होत,
हे याकोबाच्या देवा,
तुझ्या दर्शनासाठी आतूर असलेल हेच लोक होत.
दुसरे वाचन : १ योहान ३:१-३
वाचक : योहानाचे पहिले पत्र यातून घेतलेले वाचन.
आपल्याला देवाची मुले हे नाव मिळाले ह्मात पित्याने आपल्याला केवढे प्रीतीदान दिले आहे पाहा आणि आपण तसे आहोच. ह्यामुळे जग आपल्याला ओळखत नाही, कारण त्याने त्याला ओळखले नाही. प्रियजनहो, आपण आता देवाची मुले आहोत आणि पुढे आपण काय होऊ हे अजून प्रकट झालेले नाही, तरी तो प्रकट होईलल तेव्हा आपण त्याच्यासारखे होऊ हे आपल्याला माहीत आहे, कारण जसा तो आहे तसाच तो आपल्याला दिसेल. जो कोणी त्यासंबंधाने ही आशा बाळगतो तो, जसा शुद्ध आहे, तसे आपणाला शुद्ध करतो.
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
जयगोष
आलेलूया,आलेलूया !
देप्रभू म्हणतो, अहो कष्टी आणि भाराक्रांत जनहो,
तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी
तुम्हाला विसावा देईन.
आलेलूया !
शुभवर्तमान
मत्तय ५: १ - १२
वाचक :मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन .
लोकसमुदायाला पाहून येशू डोंगरावर चढला आणि तो खाली बसला.
तेव्हा त्याचे शिष्य त्याच्याजवल आले. मग तो तोंड उघडून त्यांना शिकवू लागला:
“जे आत्माने दीन ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे.”
“जे शोक करत आहेत ते धन्य, कारण त्यांचे सांत्वन करण्यात येईल.”
“जे सौम्य ते धन्य, कारण ते पॄथ्वीचे वतन भोगतील.”
“जे नीतिमत्वाचे भुकेले आणि तहानलेले ते धन्य, कारण ते तॄप्त होतील.”
“जे दयाळू ते धन्य, कारण त्यांच्यावर दया केली होईल.”
“जे अंत:करणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील.”
“जे शांती करणारे ते धन्य, कारण त्यांना देवाची मुले म्हणतील.”
“नीतिमत्वाकरिता ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे.”
“माझ्यामुळे जेव्हा लोक तुमची निंदा आणि छळ करतील आणि तुमच्याविरूद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील तेव्हा तुम्ही धन्य, आनंद करा, उल्हास करा कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे.”

0 टिप्पण्या