एकतिसावा सप्ताह
संत मार्टिन डी पोरेस ह्यांचा सण (वर्तन साक्षी)
मंगळवार
३ नोव्हेंबर २०२०
"समाजाने बहिष्कृत केलेल्या गरीब व निराधार लोकांना संत मार्टिनने दिलेली मदत निश्चित उल्लेखनीय होती" - पोप जॉन २३वे
"परमेश्वर त्याच्या अंनादात सहभागी होण्यासाठी आम्हाला आमंत्रण देत आहे. परंतू जागतिक सुखसंपत्ती मुळे बऱ्याच वेळी देवाचे आमंत्रण स्वीकार करण्यास मागेपुढे करतो त्याची कृपा, त्याचे प्रेम, दया, व सामर्थ्य आम्हाला स्वर्गीय सुखाकडे नेणारे आहे. आम्ही सर्व आनंदी रहावे हीच त्याची इच्छा आहे. आपण तयार होऊन त्याच्या हाकेला प्रतिसाद देऊ या."
पहिले वाचन : फिलिप्पीकरांस पत्र २:५-११
वाचक : पौलाचे फिलिप्पीकरांस पत्र यातून घेतलेले वाचन.
जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठायी होती ती तुमच्या ठायीही असो. तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही, तर त्याने स्वत:ला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले आणि मनुष्यप्रकॄतीचे असे प्रकट होऊन त्याने मरण आणि तेही क्रुसावरचे मरण सोसले, येथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वत:ला लीन केले. ह्यामुळे देवाने त्याला अत्युच्च केले आणि सर्व नावांपेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले, ह्मात हेतू हा की, स्वर्गात, पॄथ्वीवर आणि पॄथ्वीखाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा आणि देवपित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल करावे.
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
स्तोत्र २२:२६-३२
प्रतिसाद : हे प्रभो, तूच माझा स्तवनविषय आहेस.
१)प्रभूच्या भक्तांसमक्ष मी आपले नवस फेडीन.
दीनजन अन्न सेवन करून तॄप्त होतील.
परमेश्वराला शरण जाणारे त्याची स्तुती करतील.
तुम्ही चिरंजीव असा.
२)दिगंतरीचे सर्व जन परमेश्वराला स्मरून
त्याच्याकडे वळतील,
सगळी राष्ट्रकुले तुला दंडवत घालतील,
कारण राज्य परमेश्वराचे आहे, तोच राष्ट्रांचा शास्ता आहे,
पॄथ्वीवरील सर्व थोर लोक त्यास भजतील.
३)मी त्याच्यासाठी जगेन.
माझे वंशजही त्याची सेवा करतील.
पुढच्या पिढीच्या लोकांना प्रभूविषयी कथन करतील.
तेही येऊन भावी पिढीला त्याचे न्याय्यत्व कळवतील.
त्यानेच हे सिद्धीस नेले असे म्हणतील.
जयगोष
आलेलूया,आलेलूया !
देवाचे वचन स्वीकारा, ते माणसांचे म्हणून नव्हे
तर देवाचे वचन म्हणून स्वीकारा आणि
वास्तविक ते असेच आहे.
आलेलूया !
शुभवर्तमान
लूक १४: १५-२४
वाचक :लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन .
येशूबरोबर भोजनास बसलेल्यापैकी कोणाएकाने त्याला म्हटले, “जो कोणी देवाच्या राज्यात भाकर खाईल तो धन्य.” त्याने त्याला म्हटले, “कोणा एका मनुष्याने संध्याकाळी मोठी जेवणावळ केली, तेव्हा पुष्कळांना आमंत्रण केले आणि जेवणाच्या वेळेस, आता या, तयारी झाली आहे, असे आमंत्रितांस सांगावयाला त्याने आपल्या एका नोकराला पाठवले. तेव्हा ते सगळे वेगवेगळे निमित्त सांगू लागले. पहिला त्याला म्हणाला, मी शेत विकत घेतले आहे, ते मला जाऊन पाहिले पाहिजे. मी तुला विनंती करतो, मला क्षमा असावी. दुसरा म्हणाला, मी बैलांच्या पाच जोडया विकत घेतल्या आहेत, त्या मी तपासावयाला जातो. मी तुला विनंती करतो, मला क्षमा असावी. आणखी एक जण म्हणाला, मी लग्न केले आहे, म्हणून मी येऊ शकत नाही. मग त्या नोकराने येऊन आपल्या धन्याला हे वर्तमान सांगितले. तेव्हा घरधन्याला राग आला आणि तो आपल्या नोकराला म्हणाला, नगराच्या रस्त्यांत आणि गल्लीबोळात लवकर जा आणि गोरगरीब, अपंग, आंधळे व लंगडे ह्मांस इकडे घेऊन ये. नोकर म्हणाला, महाराज, आपण आज्ञा केल्याप्रमाणे झाले आहे, तरी अद्यापि जागा आहे. धनी नोकराला म्हणाला, माझे घर भरून यावे म्हणून रस्त्यावर आणि कुंपणापलिकडे जाऊन अशा लोकांना आग्रह करून घेऊन ये, कारण मी तुम्हास सांगतो की, त्या आमंत्रित माणसांपैकी एकालाही माझ्या जेवणातले काही चाखावयास मिळणार नाही.”

0 टिप्पण्या