Marathi Bible Reading | St. Charles Borromeo | 4 November 2020

  

सामान्य काळातील

एकतिसावा सप्ताह

            संत चार्ल्स बोरोमियो ह्यांचा सण (वर्तन साक्षी) 

  बुधवार    

४ नोव्हेंबर २०२०

"जो कोणी स्वत:चा क्रुस घेऊन माझ्यामागे येत नाही, त्याला माझा शिष्य होता येत नाही."

"ज्याला देवाच्या सेवेत व मनन चिंतनात प्रगती करण्याची इच्छा आहे. त्यांनी दररोज नव्या दमाने. देवाच्या सानिध्यात राहून देवाची सेवा अखंडित पणे करीत राहिले पाहिजे. आपल्या सर्व आशा आकांक्षा आणि धेय केवळ देवाच्या गौरवासाठी असावे ही तीव्र मनीषा त्याने बाळगली पाहिजे." -संत चार्ल्स बोरोमियो

पहिले वाचन : फिलिप्पीकरांस पत्र २:१२-१८

वाचक :  पौलाचे फिलिप्पीकरांस पत्र यातून घेतलेले वाचन.

माझ्या प्रियजनहो, जे तुम्ही सर्वदा आज्ञापालन करत आला आहात, ते तुम्ही, मी जवळ असता केवळ नव्हे तर विशेषकरून आता, म्हणजे मी जवळ नसताही, भीतीने आणि कापत आपले तारण साधून घ्या, कारण इच्छा करणे आणि कॄती करणे ही तुम्हामध्ये आपल्या सत्संकल्पासाठी साधून देणारा तो देव आहे. 

जे काही तुम्ही कराल ते कुरकूर आणि वादविवाद न करता करा, ह्मासाठी की ह्मा कुटिल आणि विपरीत पिढीला तुम्ही निर्दोष आणि निरूपद्रवी अशी देवाची निष्कलंक मुले असे व्हावे. त्या लोकांमध्ये तुम्ही जीवनाचे वचन पुढे करून दाखवताना ज्योतीसारखे जगात दिसता. असे झाले तर माझे धावणे व्यर्थ झाले नाही आणि माझे श्रमही व्यर्थ झाले नाहीत असा अभिमान मला ख्रिस्ताच्या ठायी बाळगण्यास कारण होईल. तुमच्या विश्वासाचा यज्ञ आणि सेवा होताना जरी मी स्वत: अर्पिला जात आहे तरी मी त्याबद्दल आनंद मानतो आणि तुम्हा सर्वांबरोबर आनंद करतो. त्याचप्रमाणे तुम्हीही आनंद माना आणि माझ्याबरोबर आनंद करा.

हा प्रभूचा शब्द आहे.

सर्व : देवाला धन्यवाद.


स्तोत्र २६:१,४,१३-१४

प्रतिसाद : परमेश्वर माझा प्रकाश आणि माझे तारण आहे. 


१)परमेश्वर माझा प्रकाश आणि माझे तारण आहे,

मी कोणाची भीती बाळगू?

परमेश्वर माझा दुर्ग आहे, मी कोणाचे भय धरू?

 

२)परमेश्वराजवL मी एक वरदान मागितले,

त्याच्या प्राप्तीसाठी मी झटेन, ते हे की,

आयुष्यभर परमेश्वराच्या घरात माझी वस्ती व्हावी,

म्हणजे मी परमेश्वराचे मनोहर रूप पाहत राहीन

आणि त्याच्या मंदिरात ध्यान करीन


३)ह्मा जिवंतांच्या भूमीवर परमेश्वर खात्रीने माझे

कल्याण करील परमेश्वराचीच प्रतीक्षा कर,

खंबीर हो, हिंमत धर, परमेश्वराचीच प्रतीक्षा कर.


जयगोष                                                                         

आलेलूया,आलेलूया !

आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा गौरव प्राप्त करून

घेण्यासाठी देवाने आपणास सुवार्तेच्या द्वारे

पाचारण केले आहे.

आलेलूया !


शुभवर्तमान 

लूक १४: २५-३३

वाचक :लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन .


येशूबरोबर मोठा लोकसमुदाय चालला होता, तेव्हा तो त्यांच्याकडे वळून म्हणाला, “जर कोणी माझ्याकडे येईल पण आपला बाप, आई, बायको, मुले, भाऊ आणि बहिणी ह्मांचा आणि आपल्या जिवाचाही त्याग करणार नाही तर त्याला माझा शिष्य होता येणार नाही. जो कोणी स्वत:चा क्रुस घेऊन माझ्यामागे येत नाही, त्याला माझा शिष्य होता येत नाही. तुमच्यामध्ये असा कोण आहे की, त्याला बुरूज बांधावयाची इच्छा असता तो अगोदर बसून आणि खर्चाचा अंदाज करून आपल्याजवळ तो पुरा करण्याइतकी ऐपत आहे की नाही हे पाहत नाही? नाहीतर कदाचित पाया घातल्यावर त्याला जर तो पुरा करता आला नाही तर पाहणारे सर्व लोक त्याचा उपहास करून म्हणतील, “हा मनुष्य बांधू लागला खरा, परंतु ह्माला तो पुरा करता आला नाही.” अथवा असा कोण राजा आहे की तो दुसऱ्या राजाबरोबर लढाईत सामना करण्यास निघाला असता अगोदर बसून विचार करत नाही की, जो वीस हजार घेऊन माझ्यावर येतो त्याच्यावर मला दहा हजारांनिशी जाता येईल काय? जर जाता येत नसेल तर तो दूर आहे तोच तो वकिलास पाठवून सलोख्याचे बोलणे सुरू करील? म्हणून त्याचप्रमाणे तुम्हापैकी जो कोणी आपल्या सर्वस्वाचा त्याग करत नाही त्याला माझा शिष्य होता येत नाही.”

प्रभूचे हे शुभवर्तमान... 

चिंतन :
आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू आपला खरा शिष्य कोण असू शकतो ह्माचे स्पष्टीकरण देत आहे. काही तरी उच्च साधण्यासाठी क्षणभंगूर गोष्टींचा त्याग करणे उचित आहे. जो आईवडिलांचाच नव्हे तर स्वत:च्या जिवाचा त्याग करून आपला क्रूस उचलत नाही, तो ख्रिस्ताचा अनुयायी बनू शकत नाही. म्हणूनच आजच्या शुभवर्त मानात प्रभू येशूख्रिस्त आपणाला त्याचा मागे येण्यासाठी आव्हान करतो. परंतु ते स्वीकारण्याआधी स्वत:च्या जीवनाचं आत्मपरीक्षण करणे महत्वाचे आहे की, मी हे आव्हान स्वीकारू शकतो का? ते आव्हान स्वीकारल्यानंतर येणाऱ्या परिस्थितीला, दु:खाला, अडचणींना मी सामोरे जाऊ शकतो का? यावर आपण मनन चिंतन करू या. प्रभू येशूच्या तारणदायी कॄपेने आपल्याला अनिष्टापासून मुक्त करण्यात आले आहे. पवित्र आत्म्याठायी आपल्याला पवित्रीकरणाची कॄपा मिळत आहे. प्रभू येशूपासून विभक्त न होता त्याचे खरे अनुयायी बनण्यास आपल्याला कॄपा व शक्ती लाभावी म्हणून आपण अंतर्मुख बनूया.

प्रार्थना -हे प्रभू येशू, तुला अनुसरण्यास व तूझी साक्ष जगाला देण्यास पात्र बनता यावे म्हणून आम्हाला कृपा व शक्ती दे, आमेन

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या