“प्रारंभी शब्द होता आणि शब्द देवासह होता आणि शब्द देव होता."
✝️
शब्द रुपाने व भाकरीच्या रुपाने परिपूर्ण करण्यासाठी येणाऱ्या प्रभूला आपण अंत:करणात स्वीकारुन व कृपेने भरलेले जीवन जगण्यासाठी परमेश्वराकडे प्रेरणा मागत असताना ह्या मावळात असलेल्या २०२० ह्या वर्षाबद्दल देवाचे आभार मानू या आणि नवीन वर्षाचे स्वागत करु या.
पहिले वाचन : योहानचे पहिले पत्र २:१८-२१
वाचक : योहानचे पहिले पत्र यातून घेतलेले वाचन २:१८-२१
मुलांनो, ही शेवटची घटका आहे आणि ख्रिस्तविरोधक येणार असे तुम्ही ऐकले त्याप्रमाणे आताच पुष्कळ ख्रिस्तविरोधक उठले आहेत. ह्यावरून आपल्याला दिसून येते की, ही शेवटली घटका आहे. आपल्यावाचून ते निघाले तरी ते आपले नव्हेत. ते आपले असते तर आपल्याबरोबर राहिले असते. त्यांच्यातील कोणीही आपला नाही हे प्रकट व्हावे म्हणून ते निघाले. जो पवित्र त्याच्याकडून तुमचा अभिषेक झाला आहे आणि हे तुम्हा सर्वांना माहीतच आहे. तुम्हांला सत्य कळत नाही म्हणून मी तुम्हांला लिहिले आहे असे नाही. तुम्हांला ते कळते म्हणून आणि कोणतीही लबाडी सत्यापासून नाही म्हणून लिहिले आहे.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र ९६:१-६
प्रतिसाद : आकाश हर्ष करो. पृथ्वी आनंदित होवो.
१. एखादे नवीन गीत गाऊन प्रभूचे गुणगान करा. पृथ्वीवर समस्त जनहो, प्रभूचे गुणगान करा. प्रभूचे गुणगान करा. त्याच्या नामाला धन्यवाद द्या. त्याने केलेल्या उध्दाराची दिवसेंदिवस घोषणा करा.
२. आकाश हर्ष करो, पृथ्वी आनंदित होवो. समुद्र व त्यातले प्राणी गर्जना करोत. मळे व त्यातले सगळे काही खूष होवोत. मग वनातले सारे वृक्ष प्रभूसमोर आनंदाने गाऊ लागतील. कारण तो येणार आहे, पृथ्वीचा न्याय करायला तो येणार आहे.
३. सात्त्विकतेने जगाचा न्याय करील व मानव जातीचा यथार्थ न्याय करील .
जयघोष
आलेलूया,आलेलूया !
देव प्राचीन काळी अंशाअंशांनी प्रकाराप्रकारांनी संदेष्ट्यांच्याद्वारे आपल्या पूर्वाजांशी बोलला, तो ह्या काळाच्या शेवटी पुत्राद्वारे आपल्याशी बोलतो आहे.
शुभवर्तमान
योहान १:१-१८
वाचक :योहान लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
प्रारंभी शब्द होता आणि शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. तोच प्रारंभी देवासह होता. सर्व काही त्याच्याद्वारे झाले आणि त्याच्यावाचून झाले असे काहीच नाही. जे झाले ते त्याच्याठायी जीवन होते व ते जीवन मनुष्यमात्राचा प्रकाश होते.
तो प्रकाश अंधारात प्रकाशतो तरी अंधाराने त्याला ग्रासले नाही. देवाने पाठवलेला एक मनुष्य प्रकट झाला. त्याचे नाव योहान. तो साक्षीकरिता म्हणजे त्या प्रकाशाविषयी साक्ष देण्याकरिता आला, यासाठी की, त्याच्याद्वारे सर्वांनी श्रद्धा ठेवावी. तो प्रकाश नव्हता, तर त्या प्रकाशाविषयी साक्ष देण्याकरिता आला होता.
जो खरा प्रकाश प्रत्येक मनुष्याला प्रकाशित करतो तो जगात येणार होता. तो जगात होता व जग त्याच्याद्वारे झाले, तरी जगाने त्याला ओळखले नाही. जे त्याचे स्वत:चे होते त्याकडे तो आला तरी त्याच्या स्वकीयांनी त्याचा स्वीकार केला नाही. परंतु ज्यांनी त्याचा स्वीकार केला त्यांना म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला, त्याचा जन्म रक्त अथवा देहाची इच्छा, अथवा मनुष्याची इच्छा यापासून झाला नाही, तर देवापासून झाला.
शब्द देह झाला आणि त्याने आम्हांमध्ये वस्ती केली व आम्ही त्याचे गौरव पाहिले. ते पित्यापासून आलेल्या एकुलत्या एकाचे गौरव असावे असे अनुग्रह व सत्य त्यांनी परिपूर्ण होते. त्याच्याविषयी योहान साक्ष देतो आणि जाहीररीत्या म्हणतो: जो माझ्यामागून येतो तो माझ्यापुढे झाला आहे, कारण तो माझ्यापूर्वी होता, असे ज्याच्याविषयी मी सांगितले, तो हाच आहे. कारण नियमशास्त्र मोशेच्याद्वारे देण्यात आले होते. कृपा व सत्य ही येशू ख्रिस्ताद्वारे आली, देवाला कोणीही कधीच पाहिले नाही. जो एकुलता एक जन्मलेला देवपित्याच्या उराशी असतो त्याने त्याला प्रकट केले आहे.
प्रभूचे हे शुभवर्तमान...