Ticker

6/recent/ticker-posts

Marathi Bible Reading | John of the Cross | 14th December 2020

 

सोमवार  
 
१४ डिसेंबर २०२०

आगमन काळातील 
तिसरा साप्ताह 

क्रूसभक्त संत जॉन ह्यांचा सणं
(वर्तनसाक्षी, धर्मपंडित) 

संत जॉनने  लिहिलेल्या साक्षात्कारी पुस्तकांमुळे त्याला सर्व साक्षात्कारी संतांचा प्रमुख म्हणून सन्मानीत करण्यात आलेले आहे.

क्रूसभक्त संत जॉन ह्याने माऊंट कार्मेलवरील आरोहण, एका आत्म्याची काळरात्र, आध्यात्मिक स्तोत्र, प्रेमाची जिवंत ज्वाला, अशी अनेक पुस्तके लिहिली. त्यात त्याने आध्यात्मिक जीवनाचा मूलमंत्र, तंत्र पद्धती गरज आणि गहनता ह्याचा सांगोपांग विचार सुव्यवस्थितपणे मांडलेला आहे. ह्या जगातील ऐहिक सुखापासून जो दूर आहे, जे अधिक कठीण आहे, अधिक अप्रिय आहे आणि अधिक दुःखदायक आहे त्याला मिठी मारण्यास जो तयार आहे त्यांच्यासाठी सदर पुस्तके निश्चितच कल्याणकारी आहेत.

संत जॉनची आध्यात्मिकताही खूप प्रगल्भ होती. "आपल्याला सार्वकालिक जीवन हवे असेल तर ह्या जगातील कोणत्याही गोष्टीची आसक्ती आपण बाळगू नये. केवळ श्रद्धेच्या माध्यमातूनच आपला आत्मा देवाशी तादात्म्य पावू शकतो. एकरूप होऊ शकतो" असे परखड विचार त्याने ध्यात्मसंदर्भात लिहून ठेवलेले आहेत. अध्यात्म्याच्या क्षेत्रात त्याने केलेल्या ह्या अजोड कामगिरीबद्दल पोप पायस अकरावे ह्यांनी त्याला २४ नोव्हेंबर १९२६ रोजी ख्रिस्तसभेचा विद्वान धर्मपंडित हा किताब बहाल केला.

जो आत्मा दैवी ज्ञानासाठी आसुसलेला असतो त्याला पहिल्या प्रथम क्रुसाला वेंगेत घेण्याची तयारी ठेवावी लागते.- क्रूसभक्त संत जॉन

"बाप्तिस्मा करायचा अधिकार योहानला कुणी दिला ?"


पहिले वाचन : गणना  २४:२-७,१५-१७अ

वाचक :  गणना  या पुस्तकातून घेतलेले वाचन

बलामने दृष्टी वर करून पाहिले तो इस्राएल लोक आपआपल्या वंशाप्रमाणे वस्ती करून राहात आहेत असे त्याला दिसले आणि देवाचा आत्मा त्याच्यावर उतरला. तो काव्यरूपाने आपला संदेश देऊ लागला :

“बौरचा पुत्र बलाम बोलत आहे. ज्याला खरोखर दिसते तो बोलत आहे, जो देवाची वचने श्रवण करतो, ज्याला सर्वसमर्थाचे दर्शन घडते, जो दंडवत घालतो आणि ज्याचे डोळे उघडे आहेत, त्याची ही वाणी आहे. हे याकोब, तुझे डेरे, जे इस्राएल, तुझे निवासमंडप किती रमणीय आहेत. खजुरीच्या विस्तृत बनासारखे नदीतीरीच्या बागांसारखे, परमेश्वराने लावलेल्या अगरू वृक्षांसारखे, पाण्याजवळच्या गंधसरूंसारखे ते आहेत. त्याच्या मोटांतून पाणी वाहेल. त्याच्या बीजाला भरपूर पाणी मिळेल. त्याचा राजा अगाग राजापेक्षा थोर होईल आणि त्याच्या राज्याचा उत्कर्ष होईल."

मग तो आपला काव्यरूपी संदेश पुढे देऊ लागला: "बौरचा पुत्र बलाम बोलत आहे. ज्याला खरोखर दिसते तो बोलत आहे. जो देवाची वचने श्रवण करतो आणि ज्याला परात्पराचे ज्ञान आहे, ज्याला सर्वसमर्थाचे दर्शन घडते, जो दंडवत घालतो आणि ज्याचे डोळे उघडे आहेत, त्याची ही वाणी आहे. मी त्याला पाहीन, पण तो आता दिसत नाही. मी त्याला न्याहाळीन, पण तो जवळ नाही. याकोबमधून एक तारा उदय पावेल आणि इस्राएल मध्ये एक राजदंड निघेल."

हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र २५:४-९

प्रतिसाद : प्रभो, तुझा मार्ग मला दाखव.

१) तुझी वाट मला प्रकट कर. तुझ्या सत्याला अनुसरून वागायला मला शिकव. मला वळण लाव. कारण तूच माझा मुक्तिदाता देव आहेस.

२)  हे प्रभो, तुझे वात्सल्य, तुझे अढळ प्रेम, यांचे स्मरण कर. ती पूर्वापार चालत आली आहेत. प्रभो तुझे अढळ प्रेम, तुझे चांगुलपण लक्षात घेऊन, माझी आठवण ठेव.

३) प्रभो किती चांगला आणि सरळ आहे. तो पापीजनांना सन्मार्गाने जायला शिकवतो. नम्रजनांना न्यायपरायणता दाखवतो. आपला मार्ग दीनांना प्रकट करतो.


जयगोष                                                                       

आलेलूया,आलेलूया !

आपला प्रभू येईल, आपण त्याला भेटायला जाऊ या. त्याचा आरंभ महान आहे आणि त्याच्या राज्याचा शेवट होणार नाही.

आलेलूया !

शुभवर्तमान 

मत्तय  २१:२३-२७

वाचक :मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

 येशू मंदिरात जाऊन शिक्षण देत होता, तेव्हा प्रमुख पुरोहित आणि लोकांचे वडीलजन त्याच्याकडे आले आणि म्हणाले, "या गोष्टी करायचा तुम्हांला काय हक्क आहे ? हा अधिकार तुम्हांला कुणी दिला?" 

येशूने त्यांना उत्तर दिले, “मीदेखील तुम्हांला एक प्रश्न विचारतो, त्याचे जर तुम्ही उत्तर दिलेत तर या गोष्टी करायचा  मला काय अधिकार आहे हे तुम्हांला सांगेन." बाप्तिस्मा करायचा अधिकार योहानला कुणी दिला ? देवाने की माणसाने ?"

 त्यावर वादविवाद करीत ते एकमेकांना म्हणू लागले, "आपण जर म्हणालो, 'देवाने दिला' तर हा आपल्याला म्हणेल, 'मग तुम्ही योहानावर का विश्वास ठेवला नाही?' बरे 'माणसाने दिला' म्हणावे तर आपल्याला जनसमुदायाची भीती आहे, कारण योहान संदेष्टा आहे असे सगळे मानतात." तेव्हा त्यांनी येशूला उत्तर दिले, "आम्हांला माहीत नाही."  

त्यावर येशू त्यांना म्हणाला, "मग या गोष्टी करायचा  मला काय अधिकार आहे हे मीही तुम्हांला सांगत नाही."

प्रभूचे हे शुभवर्तमान...



चिंतन :
अधिकाराचा वापर आणि गैरवापर या गोष्टीवर मननचिंतन करण्यासाठी आजचे शुभवर्तमान प्रवृत्त करीत आहे. शुभवर्तमानामध्ये देव, प्रभूयेशू, योहान, प्रमुख पुरोहित, वडीलजन आणि सामान्य जनसमुदाय ह्या सर्वांच्या अधिकाराविषयी आपण ऐकतो. प्रभूयेशूला मंदिरात शिक्षण देण्याचा अधिकार कोणी दिला? असे त्याकाळीन मुख्य याजक व वडीलजन विचारत आहेत. मग योहानाला बाप्तिस्मा करण्याचा अधिकार कोणी दिला? असे येशूने विचारल्यावर.
हेच वडीलजन निरुत्तर झाले. कारण ते स्वार्थी होते. त्यांना सामान्य जनसमुदायाच्या अधिकाराची पूर्ण कल्पना होती. म्हणून माणसांनी अधिकार दिला असे ते सांगू शकले नाहीत आणि योहानावर विश्वास न ठेवल्यामुळे देवाने त्याला अधिकार दिला असेही ते सांगू शकले नाहीत. प्रत्येकाला अधिकार हे देवाकडूनच प्राप्त होत असतात. देवाच्या ह्या देणगीचा आदरपूर्वक वापर करायला हवा. आपल्या अधिकाराद्वारे दूसऱ्यावर अन्याय होत असेल तर तो दैवी देणगीचा अपमान आहे.

प्रार्थना - हे प्रभू येशू, धैर्याने आणि निष्ठेने तुझ्या वचनाप्रमाणे जीवन जगण्यास आम्हाला कृपा दे, आमेन.