प्रकटीकरणानंतरचा बुधवार
पवित्र मिस्साबलिदान
"येशूला पाण्यावर चालताना त्यांनी पाहिले."
✝️
पहिले वाचन : योहानचे पहिले पत्र ४:११-१८
वाचक : योहानचे पहिले पत्र यातून घेतलेले वाचन ४:११-१८
आपण जर एकमेकांवर प्रीती केली तर प्रभू आपल्या ठायी पूर्णत्व पावतो."
प्रियजनहो, देवाने जर आपल्यावर अशा प्रकारे प्रीती केली तर आपणही एकमेकांवर प्रीती केली पाहिजे. देवाला कोणीही कधीही पाहिले नाही. आपण एकमेकांवर प्रीती करीत असलो तर देव आपल्या ठायी राहतो आणि त्याची प्रीती आपल्या ठायी पूर्णत्व पावली आहे.
आपण त्याच्यामध्ये व तो आपल्यामध्ये राहतो, हे आपण ह्यावरून ओळखतो की, त्याने स्वत:च्या आत्म्यातून आपल्याला दिले आहे. आम्ही पाहिले आहे व आम्ही साक्ष देतो की पित्याने पुत्राला जगाचा तारणारा म्हणून पाठविले आहे. येशू हा देवाचा पुत्र आहे, असे जो कोणी कबूल करतो त्याच्या ठायी देव राहतो व तो देवाच्या ठायी राहतो. देवाची आपल्यावर जी प्रीती आहे ती आपल्याला कळून आली आहे व आपण तिच्यावर विश्वास ठेवला आहे. देव प्रीती आहे. जो प्रीतीमध्ये राहतो तो देवामध्ये राहतो व देव त्याच्यांमध्ये राहतो.
न्यायाच्या दिवसासंबंधाने आपल्याठायी धैर्य असावे. त्याची प्रीती आपल्यामध्ये अशा प्रकारे पूर्णत्व पावली आहे, कारण जसा तो आहे तसे ह्या जगात आपणही आहो, प्रीतीच्या ठायी भीती नसते. इतकेच नव्हे तर पूर्ण प्रीती भीती घालवून देते. भीतीमध्ये शासन आहे आणि भीती बाळगणारा प्रीतीमध्ये पूर्ण झालेला नाही.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र ७२:१-२,१०-१३
प्रतिसाद : प्रभो, सगळे राजे तुझ्यासमोर लोटांगण घालतील.
१) राजाला आपल्या न्यायनीतीचे दान दे. हे देवा, या राजपुत्राला आपली न्यायपरायणता दे; म्हणजे तो तुझ्या प्रजेचा योग्य रीतीने न्यायनिवाडा करील. तुझ्या गरिबांना न्याय देईल.
२) स्पेनचे व द्विपाचे राजे खंडणी देतील, अरबस्थान व हबसाण यांचे राजे नजराणे आणतील.
३) त्याचा धावा करणाऱ्या गरिबाला, तसेच गरजवंत व असहाय्य यांनादेखील तो सोडवील. गरीब व गरजवंत यांच्यावर तो दया करील. गरजवंताच्या जिवांचे रक्षण करील.
जयघोष
आलेलूया,आलेलूया !
परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे, कारण गरिबांना सुवार्ता सांगण्यासाठी त्याने मला अभिषेक केला. धरून नेलेल्यांची सुटका करण्यासाठी त्याने मला पाठवले आहे.
शुभवर्तमान
मार्क ६:४५-५२
वाचक : मार्कलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन ६:४५-५२
"येशूला पाण्यावर चालताना त्यांनी पाहिले."
येशूने आपल्या शिष्यांना मचव्यात बसून पुढे सरोवरापलीकडे बेथसेयदा येथे पाठविले आणि स्वतः जमावाचा निरोप घेतला. त्यांना पाठवून दिल्यानंतर तो एका डोंगरावर प्रार्थना करायला गेला. संध्याकाळ झाली तेव्हा मचवा सरोवराच्या मध्यावर आला होता. येशू एकटाच जमिनीवर होता. वारा तोंडचा असल्यामुळे शिष्य वल्ही मारून हैराण झाले आहेत असे त्याला दिसले. तेव्हा पहाटे तीन ते सहाच्या दरम्यान येशू पाण्यावरून चालत त्यांच्या बाजूला आला. त्यांना बाजूला टाकून येशू पुढे जाणार होता. पण त्याला पाण्यावर चालताना शिष्यांनी पाहिले तेव्हा भूत समजून ते ओरडले. सर्वांनी त्याला पाहिले होते व ते घाबरले होते. येशु लगेच त्यांना म्हणाला, "हिंमत बाळगा. मी आहे, भिऊ नका." मग तो त्यांच्याबरोबर मचव्यात आला, तेव्हा वारा पडला. शिष्यांची तर मती गुंग झाली होती. कारण भाकरीचे इंगित त्यांना समजले नव्हते. त्यांच्या मनात ते बिंबले नव्हते.
प्रभूचे हे शुभवर्तमान...
0 टिप्पण्या