प्रकटीकरणानंतरचा मंगळवार,
पवित्र मिस्साबलिदान
"येशू भाकऱ्यांचा चमत्कार करतो."
✝️
पहिले वाचन : योहानचे पहिले पत्र ४:७-१०
वाचक : योहानचे पहिले पत्र यातून घेतलेले वाचन ४:७-१०
"देव प्रीती आहे."
प्रियजनहो, आपण एकमेकांवर प्रीती करावी, कारण प्रीती देवापासून आहे. जो कोणी प्रीती करतो तो देवापासून जन्मलेला आहे व देवाला ओळखतो. जो प्रीती करत नाही तो देवाला ओळखत नाही. कारण देव प्रीती आहे. देवाने आपल्या एकुलत्या एक पुत्राला जगात पाठवले आहे. ह्यासाठी की, त्याच्याद्वारे आपणांस जीवन प्राप्त व्हावे. यावरून देवाची आपल्यावरील प्रीती प्रकट झाली. प्रीती म्हणावी तर हीच. आपण देवावर प्रीती केली असे नाही, तर त्याने तुम्हांआम्हांवर प्रीती केली आणि तुमच्या आमच्या पापांचे प्रायश्चित्त व्हावे म्हणून स्वपुत्राला पाठवले.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र ७२:१-४,७-८
प्रतिसाद : प्रभो, सगळे राजे तुझ्यासमोर लोटांगण घालतील.
१) राजाला आपल्या न्यायनीतीचे दान दे, हे देवा, या राजपुत्राला आपली न्यायपरायणता दे; म्हणजे तो तुझ्या प्रजेचा योग्य रीतीने न्यायनिवाडा करील. तुझ्या गरिबांना न्याय देईल.
२) देशाच्या सात्त्विकतेमुळे, जनतेला सुखसमृद्धी लाभो. जनतेतल्या गरिबांना तो न्याय देवो. गरजवंतांच्या मुलाबाळांना मदत करो.
३) त्याच्या कारकिर्दीत सात्त्विक उदयास येईल. चंद्र कायमचा लोपेपर्यंत सर्वत्र सुबत्ता नांदेल. एका समुद्रापासून दुसऱ्या समुद्रापर्यंत, युफ्रेटीस नदीपासून पृथ्वीच्या सीमेपर्यंत त्याचे साम्राज्य पसरेल.
जयघोष
आलेलूया,आलेलूया !
येशू यहुदी लोकांच्या सभास्थानात सुवार्तेची घोषणा करीत व राज्याची सुवार्ता गाजवीत आणि लोकांचे सर्व प्रकारचे रोग व सर्व प्रकारची दुखणी बरी करीत गालीलभर फिरला.
शुभवर्तमान
मार्क ६:३४-४४
वाचक : मार्कलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन ६:३४-४४
येशू किनाऱ्यावर उतरला तर तेथे लोकांची बरीच गर्दी जमलेली त्याला दिसली. येशूला त्यांचा कळवळा आला. कारण मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखी त्यांची स्थिती झाली होती. तेव्हा त्याने अनेक गोष्टीविषयी त्यांना शिक्षण द्यायला सुरुवात केली.
बराच उशीर झाल्यावर शिष्य येशूकडे येऊन म्हणाले, "ही जागा निर्जन आहे आणि बराच उशीर होत आहे. यांना आता जाऊ द्या म्हणजे ते आसपासच्या खेड्यात अगर गावात जाऊन काहीतरी विकत घेऊन खातील."
पण येशू त्यांना म्हणाला, "तुम्हीच त्यांना खायला द्या. त्यावर ते येशूला म्हणाले, "आता आम्ही जाऊन दोनशे रुपयांच्या भाकऱ्या विकत आणून यांना खायला देऊ काय?"
"तुमच्याकडे किती भाकऱ्या आहेत ? जा, बघा बरे" येशूने विचारले. त्यांनी जाऊन पाहिले व म्हणाले, "पाच आणि दोन मासे."
मग तेथल्या हिरवळीवर सर्वांना गटागटाने बसण्याची येशूने आज्ञा केली. त्याप्रमाणे सारेजण शंभर शंभर व पन्नास पन्नास असे गट करून बसले. मग येशूने त्या पाच भाकऱ्या व दोन मासे घेतले आणि वर स्वर्गाकडे पाहून देवाचे आभार मानले आणि भाकऱ्या मोडून लोकांना वाढण्यासाठी त्याने त्या शिष्यांजवळ दिल्या. ते दोन मासे देखील त्या सर्वांना त्यांनी वाटून दिले. सारेजण पोटभर जेवले. नंतर उरलेसुरले भाकरीचे तुकडे व मासे त्यांनी गोळा केले. ते बारा टोपल्या भरले. जेवणखाण करणाऱ्यांत पाच हजार पुरुष होते.
प्रभूचे हे शुभवर्तमान...
0 टिप्पण्या