प्रकटीकरणानंतरचा सोमवार,
पवित्र मिस्साबलिदान
"स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे."
✝️
पहिले वाचन : योहानचे पहिले पत्र ३:२२-४:६
वाचक : योहानचे पहिले पत्र यातून घेतलेले वाचन ३:२२-४:६
आपण जे काही मागतो ते त्यांच्यापासून आपल्याला मिळते, कारण आपण त्याच्या आज्ञा पाळतो व त्याला जे आवडते ते करतो. त्याची आज्ञा ही आहे की, त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या नावावर आपण विश्वास ठेवावा आणि त्याने आपल्याला आज्ञा दिल्याप्रमाणे आपण एकमेकांवर प्रीती करावी. त्याच्या आज्ञा पाळणारा माणूस त्याच्याठायी राहातो व तो त्या माणसाच्या ठायी राहतो.
प्रियजनहो, प्रत्येक आत्म्याचा विश्वास धरू नका, तर ते आत्मे देवापासून आहेत किंवा नाहीत याविषयी त्यांची परीक्षा करा. कारण पुष्कळ खोटे संदेष्टे जगात उठले आहेत. देवाचा आत्मा तर यावरून ओळखावा देह धरून आलेल्या येशू ख्रिस्ताला जो जो आत्मा कबूल करतो तो तो देवापासून आहे. जो जो आत्मा येशूला कबूल करीत नाही, तो तो देवापासून नाही. हाच ख्रिस्तविरोधकाचा आत्मा आहे. तो येणार हे तुम्ही ऐकले आहे आणि तो जगात आताही आहे. मुलांनो, तुम्ही देवाचे आहा आणि त्यांच्यावर तुम्ही जय मिळवला आहे, कारण जगात जो आहे त्याच्यापेक्षा तुम्हांत जो आहे तो मोठा आहे. ते तर जगाचे आहेत म्हणून त्यांचे बोलणे जगाविषयी असते आणि जग त्यांचे ऐकून घेते. आपण देवाचे आहो. जो देवाला ओळखतो तो आपले ऐकतो. जो देवाचा नाही तो आपले ऐकत नाही. ह्यावरून सत्याचा आत्मा कोणता व भ्रांतीचा आत्मा कोणता हे आपण ओळखतो.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र २:७-८,१०-११
प्रतिसाद : राष्ट्राचे स्वामित्व मी तुला देईन.
१) प्रभू मला म्हणाला, तू माझा पुत्र आहेस.आज मी तुला जन्म दिला आहे. तू मागितलेस तर राष्ट्रे थेट पृथ्वीच्या सीमेपर्यंत तुझ्या स्वाधीन करीन.
२) तेव्हा अहो राजांनो, सुज्ञता बाळगा. पृथ्वीवरील सत्ताधीशांनो बोध घ्या. प्रभूची आदरयुक्त भीती बाळगा. कंपित व्हा, त्याचे प्रभुत्व मान्य करा.
जयघोष
आलेलूया,आलेलूया !
अंधकारात बसलेल्यांवर प्रकाशाचा उदय झाला आहे आणि मृत्यूच्या प्रदेशात व छायेत बसलेल्यांवर ज्योती उगवली आहे.
शुभवर्तमान
मत्तय ४:१२-१७,२३-२५
वाचक : मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
योहानला अटक झाल्याचे ऐकून येशू गालिलात गेला. पण नाझरेथ येथे न राहता तो जबुलून व नफतालीच्या प्रदेशात गालील सरोवरालगतच्या कफर्णहूम येथे जाऊन राहिला.
संदेष्टा यशया म्हणाला होता,
“जबुलून प्रांत, नफताली प्रांत, समुद्राकडली वाट, यार्देनपलीकडे परराष्ट्रीयांचा गालील, काळोखात राहणाऱ्या लोकांनी एक तेजस्वी प्रकाश पाहिला . आणि मृत्यूच्या दाट छायेच्या प्रदेशात राहणाऱ्यांवर प्रकाश उजळला" या वाणीप्रमाणे घडावे म्हणून असे झाले. येथून पुढे येशू संदेश देऊ लागला, "पापाबद्दल पश्चात्ताप करा कारण स्वर्ग राज्य जवळ आहे."
त्यानंतर येशू साऱ्या गालीलभर फिरला. तो त्यांच्या सभास्थानातून शिक्षण देत होता, देवराज्याच्या शुभसंदेशाची घोषणा करीत होता आणि लोकांना निरनिराळ्या रोगातून मुक्त करून त्यांची व्यंगे दूर करीत होता; त्यामुळे साऱ्या सिरिया देशभर त्याची कीर्ती पसरली. सगळे आजारी, निरनिराळ्या रोगांनी पछाडलेले व दुखणेकरी, भूतग्रस्त, फेपरेकरी व अर्धांगवायू झालेले अशांना येशूकडे आणण्यात आले व त्यांनी त्यांना बरे केले, गालील, दकापलीस, थेरुशलेम, यहुदिया व यार्देनेच्या पूर्वेकडला प्रदेश येथून लोकाच्या झुंडी येशूच्या मागे निघाल्या होत्या,
प्रभूचे हे शुभवर्तमान...
0 टिप्पण्या