Marathi Bible Reading | The Epiphany of the Lord | 3rd Januay 2021

प्रकटीकरणाचा सोहळा

पवित्र मिस्साबलिदान –  (प्रवचनकार - आर्चबिशप फेलिक्स मच्याडो, वसई धर्मप्रांत)

रविवार   

३ जानेवारी २०२१

 येशूच्या  प्रकटीकरणाचा  सण

आज ख्रिस्तसभा प्रभू येशूच्या  प्रकटीकरणाचा म्हणजेच तीन ज्ञानीराजे येशू बाळाला भेटण्यास येतात त्यांचा  सण पाळत आहे.
प्रभू येशू जगाचा प्रकाश आहे. त्या प्रकाशाचे रहस्य आज प्रकट करण्यात आले. निसर्गातील तारा, सामान्यजनता आणि पवित्र शास्त्र अशा तीन माध्यमाने प्रकाशाचा उलगडा झाला व तारणाऱ्याचे प्रकटीकरण झाले. आपण सुद्धा तारणाऱ्याचा खऱ्या अर्थाने शोध घेऊ व त्याला आपले सर्वस्व समर्पण करु या.   

✝️

"आम्ही त्याचा तारा पाहून त्याला नमन करायला आलो आहोत."

✝️

पहिले वाचन : यशया ६०:१-६

वाचक :   यशयाच्या पुस्तकातून घेतलेले वाचन

ऊठ, प्रकाशमान हो, कारण प्रकाश तुझ्याकडे आला आहे. परमेश्वराचे तेज तुझ्यावर उदय पावले आहे. पाहा, अंधकार पृथ्वीला झाकत आहे. निबिड काळोख राष्ट्राना झाकत आहे, पण तुझ्यावर परमेश्वर उदय पावत आहे. त्याचे तेज तुझ्यावर दिसत आहे. राष्ट्रे तुझ्या प्रकाशाकडे येतील. राजे तुझ्या उदयप्रभेकडे येतील. तू आपले डोळे वर करून चोहोकडे पाहा. ते सर्व एकत्र होत आहेत. तुझ्याकडे येत आहेत. तुझे पुत्र दुरून येत आहेत. तुझ्या कन्यांना कडेवर बसवून आणत आहेत. हे पाहशील तेव्हा तुझ्या मुखावर आनंद चमकेल तुझ्या हृदयाला स्फुरण येऊन ते विकास पावेल, कारण समुद्राकडून विपुल धन तुझ्याकडे लोटेल. राष्ट्राची संपत्ती तुझ्याकडे येईल. उंटांच्या झुंडी, मिद्यान व एफ्रा येथील तरुण उंट तुला व्यापून टाकतील. सर्व लोक सोने व ऊद घेऊन शबा येथून येतील. परमेश्वराचा आनंदभराने गुणानुवाद करतील.

हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र ७२:१-२,७-८,१०-१३

प्रतिसाद :  प्रभो, सर्व राष्ट्रे, तुला दंडवत घालतील.

१) हे देवा, तू आपले न्यायानुशासन राजाला दे. राजपुत्राला आपली धर्मनीती शिकव. तो नीतीने तुझ्या लोकांचा न्याय करील, तुझ्या दीनांचा निवाडा न्यायबुद्धीने करील .

२) त्याच्या काळी धार्मिक उत्कर्ष पावतील आणि चंद्र नाहीसा होईपर्यंत विपुल शांती असेल. समुद्रापासून महासागर आणि नदीपासून पृथ्वीच्या दिगंतापर्यंत तो प्रभुत्व चालवील.

३) तार्शीश व द्वीपे यांचे राजे नजराणे आणतील. शबा व सबा यांचे राजे खंडणी देतील. सर्व राजे त्याला दंडवत घालतील. सर्व राष्ट्रे त्याची सेवा करतील.

४) कारण धावा करणाऱ्या दरिद्री, दीन व अनाथ यांना तो सोडवील. दुबळ्यांवर तो दया करील, दरिद्र्यांचे जीव तो तारील.


दुसरे वाचन :  पौलचे इफिसकरांस पत्र ३:२-३.५-६

वाचक :   पौलचे इफिसकरांस पत्र यातून घेतलेले वाचन

"परराष्ट्रीय त्याच अभिवचनाचे वाटेकरी आहेत असे प्रकट झाले आहे." देवाची जी कृपा तुम्हांसाठी मला प्राप्त झाली तिच्या व्यवस्थेविषयी तुम्ही ऐकले असेल, म्हणजे प्रकटीकरणाच्याद्वारे मला रहस्य कळविले गेले. त्याप्रमाणे मी जे थोडक्यात वर लिहिले आहे ते रहस्य जसे आता आत्म्याच्याद्वारे त्याच्या पवित्र प्रेषितांना व संदेष्ट्याना प्रकट करून दाखवलेले आहे तसे ते इतर पिढ्यांच्या मनुष्य संतानांना कळविण्यात आले नव्हते. ते रहस्य हे की, परराष्ट्रीय लोक ख्रिस्त येशूच्या ठायी सुवार्तेच्या योगाने आम्हांबरोबर वतनबंधू, आम्हांबरोबर एकशरीर व आम्हांबरोबर अभिवचनाचे वाटेकरी आहत.

हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद.


जयघोष                                                                      

आलेलूया,आलेलूया !

आम्ही पूर्व दिशेस त्याचा तारा पाहून

त्याला नमन करायला आलो आहोत.

आलेलूया !

शुभवर्तमान 

मत्तय  २:१-१२

वाचक :   मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 


राजा हेरोदच्या अमदानीत, यहूदिया प्रांतातल्या बेथलेहेम येथे येशूचा जन्म झाला. त्याच्या जन्मानंतर काही मागी लोक पूर्वेकडून यरुशलेम येथे आले आणि विचारपूस करू लागले. "यहुद्यांचा राजा जन्माला आला आहे. तो कुठे आहे ? आम्ही त्याचा तारा उगवलेला पाहिला म्हणून त्याला मुजरा  करायला आम्ही आलोत."

हे ऐकताच राजा हेरोद आणि त्याबरोबर सारे यरुशलेम घाबरून गेले. त्याने यहुद्यांचे प्रमुख पुरोहित व शास्त्री जमवले आणि त्यांना विचारले, "ख्रिस्ताचा जन्म कुठे व्हायचा आहे?" "यहुदियातल्या बेथलेहेम" येथे ते म्हणाले; कारण संदेष्ट्यांने लिहिले आहे. "यहुदा प्रांतातल्या बेथलेहेमा, यहुदाच्या सत्ताधीशापेक्षा तू मुळीच कनिष्ठ नाहीस; कारण तुझ्यातूनच एक नेता उदयाला येईल. आणि तो माझ्या इस्राएल लोकांचा प्रतिपालक होईल."

मग हेरोदाने त्या पूर्वेकडल्या मागी लोकांना गुपचूप बोलावून घेतले आणि तारा नक्की केव्हा दिसू लागला याची वेळ विचारून घेतली. नंतर त्यांना बेथलेहेमला जाण्यास सांगून तो म्हणाला, "तुम्ही जा आणि त्या बाळाचा बारकाईने शोध करा. त्याचा पत्ता लागला की मला खबर द्या, म्हणजे मीपण येऊन त्याला मुजरा करीन."

राजाच्या सांगण्याप्रमाणे ते निघाले. जाता जाता त्यांना पूर्वी जो तारा पूर्वेस उगवलेला दिसला होता तो पुन्हा दिसू लागला. तो त्यांच्या पुढे पुढे जात होता. मग जेथे ते बाळ होते तेथे तो वर थांबला. तारा पाहून त्यांना खूपच आनंद झाला होता. ते घरात गेले तेव्हा ते बाळ आपली आई मरिया हिच्याजवळ असलेले त्यांना आढळले. बाळाच्या पायावर डोके ठेवून त्यांनी त्याला नमन केले. आपल्या थैल्या सोडून त्याला सोने ,ऊद व गंधरस यांचे नजराणे दिले. मग 'हेरोदाकडे परत जाऊ नका,' अशी स्वप्नात सूचना मिळाल्यामुळे ते दुसऱ्या वाटेने आपल्या देशाला निघून गेले.

प्रभूचे हे शुभवर्तमान...



चिंतन :  परमेश्वर वेगवेगळ्या प्रकारे मानवाला प्रकट होत असतो. ख्रिस्तसभा आज प्रभूच्या प्रकटीकरणाचा सोहळा साजरा करीत आहे. जगप्रसिद्ध बायबल पंडित फा. (डॉ.) ल्युसियन लेग्रांड ह्यांनी प्रभुच्या प्रकटीकरणाचे चार प्रकार असल्याचे सांगितलेले आहेत : १) निसर्ग : ज्ञानी पुरुषांना पूर्वेकडे तारा उगवलेला दिसला. त्याचा मागोवा घेत ते बेथलेहेमच्या गाईच्या गोठ्यापर्यंत जाऊन पोहोचले. तारा हे निसर्गाचे प्रतिक आहे. परमेश्वर निसर्गाच्या माध्यमातून आपल्याशी बोलत असतो. संत फ्रान्सिस असिसीकर, बाळ येशूची संत तेरेसा, अरण्यवासी संत अँथोनी  अशा अनेकांना निसर्गात परमेश्वर दिसला. 'फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका, ती सत्तेखाली आणा' अशा शब्दांत ह्या निसर्गाचे रक्षण करण्याची जबाबदारी खुद्द परमेश्वराने मानवावर सोपविलेली आहे. 
२) लोकसमुदाय : परमेश्वर माणसांच्या रुपात आपल्या अवतीभवती वावरत असतो. ज्ञानी पुरूष जेरूसलेमला पोहोचल्यावर लोकांकडे विचारपूस करू लागले, 'यहुद्यांचा राजा जन्माला आला आहे, तो कुठे आहे.' इतरांशी
सुदृढ़, प्रेमाचे व शांतीचे परस्पर संबंध जोपासले तर त्यांच्यामध्ये आपल्याला परमेश्वर दिसू शकतो. 
३) बायबलः हेरोद राजाने लोकांचे वडील व शास्त्री ह्यांना जमवून 'ख्रिस्ताचा जन्म कुठे व्हावयाचा आहे त्याची चौकशी केली. त्यांनी जुन्या करारातील मीखा ५:२ हे वचन वाचून दाखविले व म्हटले, 'यहुदियातील बेथलेहेमात.' बायबलचे पद्धतशीर व नियमित वाचन आपल्याला ईश्वरी प्रकटीकरण करीत जाते. 
४) येशू बाळ : ज्ञानी पुरुषांनी येशूबाळासमोर गुडघे टेकून तो राजा (सोने), याजक (ऊद), व संदेष्टा (गंधरस) असल्याचे दाखवून दिले. प्रामाणिकपणे, चिकाटीने देवाचा शोध घेणाऱ्याला तो अनपेक्षित ठिकाणी सापडतो. त्यानंतर माणसाच्या जीवनाची दिशा बदलून जाते. ज्ञानी लोक दुसऱ्या मार्गाने आपल्या देशास निघून गेले.

आत्मपरीक्षण : मी परमेश्वराचा शोध कुठे घेत आहे ? मानव व निसर्ग परस्पर पूरक आहेत ह्याची मला जाणीव आहे का? माझ्या जीवनात बायबल वाचनाला कोणते स्थान देतो ? देव भेटल्यास मी त्याला काय काय देईन ?

प्रार्थना :   हे जीवनाच्या प्रकाशा, प्रभू येशू ख्रिस्ता, अंत:करणापासून शोध घेऊन  तुझी सुवार्ता पसरविण्यास आम्हाला प्रेरणा दे, आमेन. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या