Marathi Bible Reading | St. Raymond of Penyafort | 7th December 2021

  प्रकटीकरणानंतरचा गुरुवार 

पवित्र मिस्साबलिदान


 गुरुवार 

७ जानेवारी २०२१

पेनफोर्टचा संत रेमंडचा सण 

ख्रिस्तामध्ये   बाप्तिस्मा व दृढीकरण साक्रामेंत स्वीकारलेली प्रत्येक व्यक्ती पवित्र आत्म्याठायी अभिषिक्त बनलेली आहे. ख्रिस्ती व्यक्तिने ख्रिस्ताचे अनुकरण करुन देवाची सुवार्ती पसरविणे हे त्याचे आद्य आध्यात्मिक कर्तव्य आहे. प्रत्येक ख्रिस्ती माणसाला अभिषिक्त करुन देवराज्याची सुवार्ती पसरविण्याचे आवाहन ख्रिस्ताने केलेले आहे. आपल्याला मिळालेल्या पवित्र आत्म्याच्या दानांचा योग्य तो उपयोग करुन दीनांना सुवार्ता सांगण्यास आपण पुढाकार घ्यावयास हवा. प्रभू ख्रिस्ताने दीन, दुबळे, बंदिवान, अन्यायग्रस्त व आजारी माणसांना आपल्या वचनाद्वारे नव्याने जीवन जगण्याची प्रेरणा दिली. त्याने त्याच्या शब्दाने व स्पर्शाने अनेकांच्या जीवनात चैतन्य निर्माण केले.
आपल्या सर्वांच्या ठायी प्रभूच्या वचनाचे सामर्थ्य आहे व पवित्र आत्म्याद्वारे आपणसुध्दा इतरांच्या जावनात बदलघडवून आणू शकतो.

✝️

"परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे"

✝️

पहिले वाचन : योहानचे पहिले पत्र ४:१९-५ :४

वाचक :  योहानचे पहिले पत्र यातून घेतलेले वाचन

"जो प्रभूवर प्रीती करतो त्याने आपल्या बंधूवरपण तशीच प्रीती करावी."

पहिल्याने त्याने आपणावर प्रीती केली, म्हणून आपण प्रीती करतो. "मी देवावर प्रीती करतो," असे म्हणून जर कोणी आपल्या बंधूचा द्वेष करील तर तो लबाड आहे, कारण डोळ्यापुढे असलेल्या आपल्या बंधूवर जो प्रीती करीत नाही त्याला न पाहिलेल्या देवावर प्रीती करता येणे शक्य नाही. जो देवावर प्रीती करतो त्याने आपल्या बंधूवरही प्रीती करावी ही त्याची आपल्याला आज्ञा आहे. येशू हा ख्रिस्त आहे असा विश्वास जो कोणी धरतो तो देवापासून जन्मलेला आहे आणि जो कोणी जन्मदात्यावर प्रीती करतो, तो त्याच्यापासून जन्मलेल्यावरही प्रीती करतो. आपण देवावर प्रीती करतो व त्याच्या आज्ञा पाळतो तेव्हा त्यावरून आपल्याला कळून येते की, आपण देवाच्या मुलांवर प्रीती करतो. देवावर प्रीती करणे म्हणजे त्याच्या आज्ञा पाळणे होय आणि त्याच्या आज्ञा कठीण नाहीत. कारण जे काही देवापासून जन्मलेले आहे ते जगावर जय मिळवते आणि ज्याने जगावर जय मिळवला तो म्हणजे आपला विश्वास.

हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र ७२:१-२,१४-१५,१७

प्रतिसाद : हे प्रभो, सगळे राजे तुझ्यासमोर लोटांगण घालतील.

१) राजाला आपल्या न्यायनीतीचे दान दे, हे देवा. या राजपुत्राला आपली न्यायपरायणता दे; म्हणजे तो तुझ्या प्रजेचा योग्य रीतीने न्यायनिवाडा करील. तुझ्या गरिबांना न्याय देईल.

२) छळ व हिंसाचार यांपासून तो त्यांचा प्राण वाचवील. त्याच्या दृष्टीने त्यांचे प्राण बहुमोल ठरतील. त्यांच्यासाठी ते सतत प्रार्थना करतील आणि सदैव त्याला आशीर्वाद देतील.

३) त्याचे नाव चिरंजीव होवो. ते सूर्यासारखे अनंत टिको. त्याच्यासारखाच आपल्यालाही . आशीर्वाद मिळावा म्हणून लोक प्रार्थना करोत. राष्ट्रे त्याचा धन्यवाद गावोत.

जयघोष                                                                      

आलेलूया,आलेलूया !

आम्हांमध्ये मोठा संदेष्टा उदयास आला आहे आणि देवाने आपल्या लोकांची भेट घेतली आहे.

आलेलूया !

शुभवर्तमान 

लूक  ४:१४-२२

वाचक : लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

"आज हा शास्त्रलेख पूर्ण झाला आहे."

येशू आत्म्याच्या सामर्थ्याने गालिलात परत आला व त्याची कीर्ती चहूकडील प्रदेशात पसरली. तो त्याच्या सभास्थानांमध्ये शिक्षण देई आणि सर्वजण त्याचा महिमा वर्णीत.

मग ज्या नाझरेथात तो लहानाचा मोठा झाला होता तेथे तो आला आणि आपल्या परिपाठाप्रमाणे शब्बाथ दिवशी सभास्थानात जाऊन वाचायला उभा राहिला. तेव्हा यशया संदेष्ट्याचा ग्रंथपट त्याला देण्यात आला. त्याने तो उलगडून जे स्थळ काढले त्यात असे लिहिले आहे :

"परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे, कारण गरिबांना सुवार्ता सांगण्यासाठी त्याने मला अभिषेक केला. त्याने मला पाठविले आहे, ते अशासाठी की, धरून नेलेल्यांची सुटका व आंधळ्याना पुन्हा दृष्टीचा लाभ ह्यांची घोषणा करावी. ठेचले जात आहेत त्यांना सोडवून पाठवावे. परमेश्वराच्या प्रसादाच्या वर्षाची घोषणा करावी."

मग ग्रंथपट गुंडाळून व तो सेवकाकडे परत देऊन तो खाली बसला आणि सभास्थानातील सर्व लोकांची दृष्टी त्याच्यावर खिळली मग तो त्यांना म्हणू लागला की, "हा शास्त्रलेख आज तुम्ही ऐकत असताना पूर्ण झाला आहे." तेव्हा सर्व त्याची वाहवा करू लागले आणि जी कृपावचने त्याच्या मुखातून निघत होती त्याविषयी आश्चर्य करू लागले.

प्रभूचे हे शुभवर्तमान...

सर्व :  हे ख्रिस्त तुझी स्तुती असो.  

चिंतन : आजच्या पहिल्या वाचनात देवाचे आणि माणसाचे प्रेम हे निर्विवादपणे जोडलेले आहे. हे आपल्याला आढळते. जर देव आपल्यावर प्रेम करतो तर  आपणही एकमेकांवर प्रेम करणे बंधनकारक आहे. दैवी जीवनाची नवनिर्मिती करणे आणि सार्वकालिक जीवनाचा अनुभव घेणे हे आपले साध्य आहे. संत योहान म्हणतो, 'जर कोणी म्हणतो मी देवावर प्रेम करतो पण आपल्या भावाचा द्वेष करतो तर तो लबाड आहे.' देव ज्यांच्यावर प्रेम करतो, त्यांच्यावर प्रेम करून आपण आपले देवावरील प्रेम प्रकट करतो. आपल्या हृदयात देवाविषयी प्रेम आहे हे दाखवायचे असेल तर मग इतर माणसांवर प्रेम करा. मनुष्य देवाच्या प्रतिमेत निर्माण केलेला आहे. (उत्पत्ती १:२६), देव प्रेम आहे, म्हणून देवासारखे होण्यासाठी आपणही प्रेम करणे आवश्यक आहे. जशी मी तुम्हांवर प्रीती केली तशी तुम्ही एकमेकांवर प्रीती करा. (योहान १३:३४). एकमेकांचे पाय धुवा ही परमेश्वराची इच्छा आहे.


प्रार्थना :   हे प्रभू येशू , तुझे अनुकरण करण्यास आणि देवराज्याची सुवार्ता पसरविण्यास आम्हाला कृपा दे, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या