प्रकटीकरणानंतरचा शुक्रवार
पवित्र मिस्साबलिदान
"माझी इच्छा आहे, "शुद्ध हो." आणि लागलेच त्याचे कुष्ठ गेले."
✝️
पहिले वाचन : योहानचे पहिले पत्र ५:५-१३
वाचक : योहानचे पहिले पत्र यातून घेतलेले वाचन
येशु देवाचा पुत्र आहे असा विश्वास जो धरतो त्याच्यावाचून जगावर जय मिळवणारा कोण आहे ? जो पाण्याच्याद्वारे व रक्ताच्याद्वारे आला तो हाच, म्हणजे येशू ख्रिस्त पाण्याने केवळ नव्हे तर पाण्याने व रक्तानेही आला. आत्मा हा साक्ष देणारा आहे, कारण आत्मा सत्य आहे. साक्ष देणारे तिघे आहेत. आत्मा, पाणी व रक्त ह्या तिघांची साक्ष एकच आहे. आपण माणसाची साक्ष स्वीकारतो, पण तिच्यापेक्षा देवाची साक्ष मोठी आहे. जी साक्ष देवाने आपल्या पुत्राविषयी दिली तीच ही त्याची साक्ष आहे. जो देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवतो त्याच्या ठायीच साक्ष आहे. ज्याने देवाचा विश्वास धरला नाही त्याने त्याला लबाड ठरविले आहे कारण जी साक्ष देवाने आपल्या पुत्राविषयी दिली आहे तिच्यावर त्याने विश्वास ठेवला नाही. ती साक्ष हीच आहे, देवाने आपल्याला सार्वकालिक जीवन दिले आणि हे जीवन त्याच्या पुत्राच्या ठायी आहे. ज्याला तो पुत्र लाभला आहे त्याला जीवन लाभले आहे.ज्याला देवाचा पुत्र लाभला नाही त्याला जीवन लाभले नाही.
देवाच्या पुत्राच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्या तुम्हांला सार्वकालिक जीवन लाभले आहे हे तुम्हांला कळावे म्हणून मी हे तुम्हांला लिहिले आहे.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र १४७:१२-१३,१४-१५,१९-२०
प्रतिसाद : हे येरुशलेमा, प्रभूचे गुणगान कर !
१) हे येरुशलेमा, प्रभूचे गुणगान कर ! हे सियोन, तुझ्या देवाचे स्तवन कर! तुझ्या वेशींचे अडसर त्याने मजबूत राखले आहेत. तुझ्यातल्या नागरिकांना आशीर्वाद दिला आहे.
२) तुझ्या सीमेवर तो शांतता राखतो, तुला सकस गहू पुरवतो, तो पृथ्वीवर हुकूम सोडतो. त्याचा शब्द वेगाने धावत येतो.
३) आपला संदेश त्याने याकोबला, आपले नियम व संकेत इस्राएलला जाहीर केले. कुठल्याही राष्ट्रासाठी त्याने असे केले नाही. त्याचे संकेत त्यांना माहीत नाहीत.
जयघोष
आलेलूया,आलेलूया !
आम्हांमध्ये मोठा संदेष्टा उदयास आला आहे आणि देवाने आपल्या लोकांची भेट घेतली आहे.
शुभवर्तमान
लूक ५:१२-१६
वाचक : लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
येशू एका गावी असता पाहा, तेथे कुष्ठरोगाने भरलेला असा एक माणूस होता. त्याने येशूला पाहून पालथे पडून त्याला विनंती केली की, "प्रभुजी, आपली इच्छा असली तर मला शुद्ध करायला आपण समर्थ आहा.” तेव्हा त्याने हात पुढे करून त्याला स्पर्श करून म्हटले, माझी इच्छा आहे, "शुद्ध हो." आणि लागलेच त्याचे कुष्ठ गेले. मग त्याने त्याला निक्षून सांगितले, कोणाला सांगू नकोस तर जाऊन स्वतःला याजकाला दाखव आणि त्यांना प्रमाण पटावे म्हणून मोशेने नेमून दिल्याप्रमाणे आपल्या शुद्धीकरणासाठी दान अर्पण कर. तथापि येशूविषयीचे वर्तमान अधिकच पसरत गेले आणि पुष्कळ लोकसमुदाय त्याचे ऐकायला व आपले रोग बरे करून घ्यायला जमू लागले. पण तो अरण्यात अधूनमधून एकान्ती जाऊन प्रार्थना करीत असे.
प्रभूचे हे शुभवर्तमान...
0 टिप्पण्या