Marathi Bible Reading | St. Adrian | 9th January 2021

    प्रकटीकरणानंतरचा शनिवार   

पवित्र मिस्साबलिदान

 शनिवार  

९ जानेवारी २०२१

संत एड्रीयनचा सण
(मठाधिकारी, वर्तनसाक्षी) 

'मनुष्याला स्वर्गातून दिल्यावाचून काहीच मिळू शकत नाही.' ह्याचा अर्थ आपली बुध्दीमत्ता, शहाणपण, आपल्याला लाभलेले वैभव, सत्ता, सन्मानाचे पद हे सर्व देवापासून आहे. आपल्या सर्वस्वावर देवाचीच अधिसत्ता आहे. कर्ता करविता तोच प्रभू परमेश्वर आहे. म्हणूनच त्याग, समर्पण, दया आणि परोपकाराची भावना  मनात बाळगून आपण देवाच्या वचनाप्रमाणे जीवन आचरण करण्यास शिकले पाहिजे. देवासमोर सर्वजण समान आहोत.
आपल्यातील खोटा अभिमान तसेच अहंकार व स्वार्थ बाजूला सारुन  आपण प्रभू येशूला आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू बनवून खरे ख्रिस्ती जीवन  जगण्यासाठी  वचनाद्वारे प्रेरणा मागू या.

✝️

"मनुष्याला स्वर्गातून दिल्यावाचून काहीच मिळू शकत नाही"

✝️

पहिले वाचन : योहानचे पहिले पत्र ५:१४-२१

वाचक :  योहानचे पहिले पत्र यातून घेतलेले वाचनपहिले वाचन


त्याच्यासमोर येण्यास आपल्याला जे धैर्य आहे ते ह्यावरून की, आपण त्याच्या इच्छेप्रमाणे काही मागितले तर तो आपले ऐकेल आणि आपण जे काही मागतो ते तो ऐकतो, हे आपल्याला ठाऊक आहे, म्हणून ज्या मागण्या आपण त्याच्याजवळ केल्या आहेत त्या आपल्याला मिळाल्या आहेत हेही आपल्याला ठाऊक आहे. 

ज्याचा परिणाम मरण नाही असे पाप करताना आपल्या बंधूला कोणी पाहिले तर त्याने त्याच्याकरिता देवाजवळ मागावे म्हणजे तो त्याला जीवन देईल, अर्थात ज्याचा परिणाम मरण नाही असे पाप करणाऱ्यांना ते देईल. ज्याचा परिणाम मरण आहे असेही पाप आहे आणि ह्याविषयी मागावे असे मी म्हणत नाही. सर्व प्रकारची अनीती पापच आहे, तरीपण ज्याचा परिणाम मरण नाही असेही पाप आहे.

जो कोणी देवापासून जन्मलेला आहे तो पाप करीत नाही, हे आपल्याला ठाऊक आहे . जो देवापासून जन्मला तो (ख्रिस्त) त्याला सुरक्षित ठेवतो आणि त्या दुष्टाचा संपर्क त्याला होत नाही. आपण देवापासून आहो हे आपल्याला ठाऊक आहे. सगळे जग त्या दुष्टाला वश झाले आहे. आपल्याला ठाऊक आहे की, देवाचा पुत्र आला आहे आणि तो सत्य आहे. त्याला ओळखण्याची बुद्धी त्याने आपल्याला दिली आहे. जो सत्य आहे त्याच्या ठायी, म्हणजे त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्या ठायी, आपण आहो हाच खरा देव आणि सार्वकालिक जीवन आहे. मुलांनो, तुम्ही स्वत:ला मूर्तीपासून दूर ठेवा.

हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र १४९:१-२ ,३-४,५-६.९

प्रतिसाद :   प्रभू आपल्या लोकांवर प्रसन्न आहे.

१) एखादे नवीन गीत गाऊन गुणगान करा. त्याच्या भक्तजनांच्या मेळाव्यात त्याचे स्तवन करा. इस्राएलला त्याचा निर्माणकर्ता आनंदित करो. सियोनच्या नागरिकांना त्यांच्या राजामुळे आनंद देवो.

२) नृत्य करीत ते त्याच्या नामाचा महिमा वर्णोत. डफ व वीणा वाजवून त्याची स्तुती गावोत. कारण प्रभू आपल्या लोकांवर प्रसन्न आहे; नम्र जनांना तो विजयाने भूषवितो.

३) भक्तजनांना विजयाचा उन्माद चढो. अंथरूणांवर त्यांना आनंदाने गजर करू द्या. त्यांना मुक्तकंठाने देवाचे स्तवन करू द्या. हे साऱ्या भक्तजनांचे भूषण आहे.


जयघोष                                                                      

आलेलूया,आलेलूया !

यहुदियांना प्रकट झालेल्या ख्रिस्ताचा गौरव असो, जगात ज्यावर विश्वास ठेवला गेला त्या ख्रिस्ताचा गौरव असो.

आलेलूया !

शुभवर्तमान 

योहान ३:२२-३०

वाचक :  योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन  

    येशू आणि त्याचे शिष्य यहुदा प्रांतात आले आणि तेथे त्यांच्याबरोबर राहून तो बाप्तिस्मा करीत होता. योहानही शालिमाजवळचे एनोन येथे बाप्तिस्मा करीत होता, कारण तेथे पाणी मुबलक होते. आणि लोक येऊन बाप्तिस्मा घेत असत, कारण योहान तोपर्यंत कैदेत पडला नव्हता.

मग योहानच्या शिष्यांचा एका यहुद्याबरोबर शुद्धीकरणाविषयी वादविवाद झाला. ते योहानकडे येऊन त्याला म्हणाले, "गुरुजी, पाहा, यार्देनच्या पलीकडे जो आपल्याबरोबर होता, ज्याच्याविषयी आपण साक्ष दिली आहे तो बाप्तिस्मा करतो आणि सर्व लोक त्याच्याकडे जातात." योहानने उत्तर दिले, "मनुष्याला स्वर्गातून दिल्यावाचून काहीच मिळू शकत नाही. मी ख्रिस्त नव्हे तर त्याच्यापुढे पाठवलेला आहे असे मी म्हणालो होतो, ह्याविषयी तुम्हीच माझे साक्षी आहा. वधू ज्याची आहे तोच वर आहे आणि उभा राहून त्याचे बोलणे जो ऐकतो तो वराचा मित्र आहे. त्याला वराच्या वाणीने अत्यानंद होतो. तसा हा माझा आनंद पूर्ण झाला आहे. त्याची वृद्धी व्हावी व माझा ऱ्हास  व्हावा हे अवश्य आहे."

प्रभूचे हे शुभवर्तमान...

सर्व :  हे ख्रिस्त तुझी स्तुती असो.  


चिंतन : 
योहान बाप्तिस्ताचा दृष्टिकोन आपल्याला शिकवत आहे की, आपण स्वकेंद्रित नसावे किंवा जग केंद्रित नसावे पण आपण देव केंद्रित असावे. माझ्यामध्ये जे काही चांगले आहे ते स्वर्गातील देवाकडून मला प्राप्त झाले आहे. आपल्याला लाभलेल्या सर्व दानांचा आणि कला कौशल्यांचा आपल्याला अहंकार नसावा. पण त्याबद्दल देवाचे आभार मानायला आपण संकोच करू नये. येशू हा वर आहे आणि ख्रिस्तसभा त्याची वधू आहे. आपण ख्रिस्तसभेचे सभासद आहोत, म्हणून येशूचे आपण ऐकू या आणि देवाच्या गौरवासाठी कार्य करू या. त्याद्वारे त्याची वृध्दी व्हावी आणि माझा ऱ्हास  व्हावा, ही प्रवृत्ती अंगिकारूया.


प्रार्थना : प्रभो, परमेश्वरा, मला लाभलेल्या सर्व कृपादानाबद्दल तुझे मनापासून आभारगीत गाण्यास मला प्रेरणा दे, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या