Marathi Bible Reading | 10th January 2021

      रविवार  प्रभूच्या  स्नानसंस्काराचा सण 

पवित्र मिस्साबलिदान

 रविवार   

१० जानेवारी २०२१

प्रभू येशूच्या बाप्तिस्म्याचा सोहळा
बाप्तिस्म्यामुळेच प्रभू येशूने आपली सर्वांची पापे क्रुसावरील बलिदानात समर्पित केली. पुनरुत्थाना नंतर त्याची सहभागिता आपल्या सर्वांना प्राप्त व्हावी म्हणून प्रभू येशूने त्याचा कैवारी पवित्र  आत्मा आपल्या सर्वांकरिता पाठविला. आपल्या सर्वांचा बाप्तिस्मा परमेश्वर  ! पिता, प्रभू येशू ख्रिस्त व पवित्र आत्मा ह्यांच्या नावाने झालेला आहे. पवित्र  त्रैक्याद्वारेच आपल्या सर्वांचे तारण केले आहे. आपल्या सर्वांना नवजीवनाचा पवित्र आत्मा मिळाला आहे. आपणसुद्धा देवपित्याची प्रिय मुले बनलो आहोत. 

प्रभू येशूच्या बाप्तिस्म्याचा सोहळा आपल्या सर्वांना आपल्या बाप्तिस्म्याची आठवण करुन देत आहे.ख्रिस्तात मुळावलेले असे पवित्र व  परोपकारी जीवन जगण्यास प्रेरणा लाभावी म्हणून आज अंतर्मूख बनून आपल्या जीवनावर चिंतन करुया.
✝️

"तू माझा प्रिय पुत्र आहेस. तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे."

✝️

पहिले वाचन : यशया  ५५:१-११

वाचक :  यशया पुस्तकातून घेतलेले वाचनपहिले वाचन

    अहो तान्हेल्यांनो, तुम्ही सर्व जलाशया कडे या, जवळ पैका नसलेले तुम्ही या; सौदा करा, खा; या, पैक्यावांचून व मोला वांचून द्राक्षारसाचा व दुधाचा सौदा करा !  जे अन्न नव्हे त्याकरितां दाम कां देतां? ज्याने तृप्ति होत नाही त्यासाठी श्रम का करिता ? माझें लक्षपूर्वक ऐका. आणि उत्तम ते खा, तुमचा जीव पौष्टिक पदार्थाचे सेवन करून संतुष्ट होवो.  कान द्या, मजकडे या; ऐका, म्हणजे तुमचा जीव वाचेल; आणि मी तुम्हांबरोबर सर्वकाळचा करार करीन, म्हणजे दावीदाला देऊ केलेले अढळ प्रसाद तुम्हांस देईन.  पाहा, मीं त्यास राष्ट्रांचा साक्षी, राष्ट्रांचा नेता व शास्ता नेमिलें आहे पाहा, तूं ओळखीत नाहीस अशा राष्ट्रांस तूं बोलाविशील; ज्या राष्ट्राला तुझी ओळख नाहीं ते तुजकडे धाव घेईल; ज्याने तुला वैभवयुक्त केलें तो परमेश्वर तुझा देव, इस्राएलाचा पवित्र प्रभु याच्यामुळे असं होईल.

 परमेश्वरप्राप्तीचा काळ आहे तोंवर त्याला शोधा; तो जवळ आहे तोच त्याचा धावा करा;  दुर्जन आपला मार्ग सोडो, अधर्मी आपल्या कल्पनांचा त्याग करो आणि परमेश्वराकडे वळो म्हणजे तो त्याजवर दया करील; तों आमच्या देवाकडे वळो, कारण तो त्याला भरपूर क्षमा करील.  कारण माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नव्हत; माझे मार्ग तुमचे मार्ग नव्हत, असें परमेश्वर म्हणतो.  कारण आकाश जसे पृथ्वीहून उंच आहे तसे माझे मार्ग तुमच्या मार्गाहून आणि माझ्या कल्पना तुमच्या कल्पनांहून उंच आहेत.  पाहा, पाऊस व बर्फ ही आकाशातून पडतात, आणि पृथ्वी भिजवून, तिला सफळ व हिरवी गार केल्यावांचून, पेरणाऱ्यास बीज, खाणाऱ्यास भाकरी दिल्यावांचून ती परत वर जात नाहींत; ११ त्याप्रमाणें माझ्या मुखांतून निघणारे वचन होईल; तें माझी इच्छा पूर्ण केल्या वाचून व ज्या कार्याकरितां मीं ते पाठविलें तें केल्यावांचून मजकडे विफल होऊन परत येणार नाही.

हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद यशया  १२:२ -६

प्रतिसाद :   तुम्ही तारणकूपांतून उल्लासानें पाणी काढाल.

१) पाहा, देव माझे तारण आहे; मी भाव धरितों, भीत नाहीं; कारण प्रभु परमेश्वर माझें बल व गीत आहे; तो मला तारण झाला आहे.  तेव्हां तुम्ही तारणकूपांतून उल्लासानें पाणी काढाल. 

२) त्या दिवशीं तुम्हीं म्हणाल, परमेश्वराचा धन्यवाद करा, त्याच्या नामाचा जय घोष करा, राष्ट्रांमध्ये त्याची कृत्ये विदित करा, त्याचें नाम थोर आहे अशी वाखाणणी करा. 

३) परमेश्वरापुढें गायन करा कारण त्याची करणी प्रतापमय आहे; हे सर्व पृथ्वीवर विदित होवो. अगे सीयोननिवासिनी, जयघोष कर, गजर कर; कारण इस्राएलाचा पवित्र प्रभु तुझ्याठायीं थोर आहे.


दुसरे वाचन : योहानचे पहिले पत्र ५:१-९

वाचक :  योहानचे पहिले पत्र यातून घेतलेले वाचनपहिले वाचन

    येशू हा ख्रिस्त आहे, असा विश्वास जो कोणी धरितो तो देवापासून जन्मलेला आहे, आणि जो कोणी जन्मदात्यावर प्रीति करितो, तो त्याच्यापासून जन्मलेल्यावरहि प्रीति करितो.  आपण देवावर प्रीति करितों व त्याच्या आज्ञा पाळतो तेव्हां त्यावरून आपल्याला कळून येते की, आपण देवाच्या मुलांवर प्रीति करितों.  देवावर प्रीति करणे म्हणजे त्याच्या आज्ञा पाळणे होय; आणि त्याच्या आज्ञा कठीण नाहींत. कारण जें कांहीं देवापासून जन्मलेले आहे तें जगावर जय मिळवितें; आणि ज्याने जगावर जय मिळविला तो म्हणजे आपला विश्वास.

     येशू देवाचा पुत्र आहे असा विश्वास जो धरतो त्याच्यावांचून जगावर जय मिळविणारा कोण आहे ? जो पाण्याच्या द्वारें व रक्ताच्या द्वारें आला तो हाच, म्हणजे येशू ख्रिस्त; पाण्याने केवळ नव्हे, तर पाण्याने व रक्तानेंहि आला.  आत्मा हा साक्ष देणारा आहे, कारण आत्मा सत्य आहे.  साक्ष देणारे तिघे आहेत: आत्मा, पाणी व रक्त; ह्या तिघांची साक्ष एकच आहे.  आपण माणसांची साक्ष स्वीकारतों पण तिच्यापेक्षां देवाची साक्ष मोठी आहे, जी साक्ष देवाने आपल्या पुत्राविषयी दिली; तीच ही त्याची साक्ष आहे.

हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद.


जयघोष                                                                      

आलेलूया,आलेलूया !

मेघातून अशी वाणी झाली की, 

 "हा माझा प्रिय पुत्र आहे, ह्याचे तुम्ही ऐका."

आलेलूया !

शुभवर्तमान 

मार्क १: ७-११

वाचक :   मार्कलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन १:७-११

    योहान बाप्तिस्ता घोषणा करून म्हणत असे, माझ्यापेक्षा समर्थ असा कोणी एक माझ्यामागून येत आहे. त्याच्या पायतणांचा बंद लवून सोडण्याचीदेखील माझी पात्रता नाही. मी तुमचा बाप्तिस्मा पाण्याने केला आहे, तो तर तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने करणार आहे. त्या दिवसांत असे झाले की, येशू गालिलातील नाझरेथहून आला आणि लगेच पाण्यातून वर येताना, आकाश दुभंगले आहे, असे त्याला दिसले. तेव्हा आकाशातून अशी वाणी ऐकू आली की, "तू माझा पुत्र, मला परमप्रिय आहेस, तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे."

प्रभूचे हे शुभवर्तमान...

सर्व :  हे ख्रिस्त तुझी स्तुती असो.  


चिंतन : 
येशूच्या बाप्तिस्म्याचा सण ज्या रविवारी साजरा केला जातो तो सामान्यकाळातील पहिला रविवार मानला जातो. याचाच अर्थ येशूच्या बाप्तिस्म्याने नाताळ हंगाम समाप्त होतो व उपासनेतील सामान्यकाळाला सुरुवात होते. थोडक्यात, येशूचा बाप्तिस्मा हा त्याच्या सुवार्ता प्रसारकार्याचा पाया मानला जातो. म्हणूनच संत अगस्तीन म्हणतात, 'माझ्या बाप्तिस्म्याचा दिवस. हा माझ्या गुरूदीक्षेच्या दिवसापेक्षा श्रेष्ठ आहे. कारण बाप्तिस्म्याद्वारे मी देवाचे लेकरू बनलो तर, गुरूदीक्षेद्वारे मी लोकांचा सेवक बनलो.' येशूच्या बाप्तिस्म्याच्या वेळी तीन गोष्टी घडल्या. अ) आकाश विदारले / उघडलेः इथे आकाश विदारण्यासाठी जो ग्रीक शब्द वापरण्यात आलेला आहे (स्कीत्झो) तोच येशूच्या मृत्युसमयी जेरुसलेम मंदिरातील पडदा वरपासून खालपर्यंत दुभंगला या घटनेसाठी वापरण्यात आलेला आहे. याचाच अर्थ येशूद्वारे आता मानवाला देवपित्याकडे जाण्याचा मार्ग मोकळा झाला. 
ब) आत्मा कबुतरासारखा येशूवर उतरलाः कबुतर हे पावित्र्याचे, शुद्धतेचे, शांतीचे व एकनिष्ठेचे प्रतीक मानले जाते. येशूच्या बाप्तिस्म्याद्वारे येशूचे कार्य सुरू झाले. त्यामुळेच तो पुढे म्हणणार आहे, परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे, कारण दीनांस शुभवार्ता देण्यासाठी त्याने मला अभिषेक केला आहे.' 
क) आकाशातून वाणी झाली : 'तू माझा परमप्रिय पुत्र आहेस...' ह्या शब्दांत स्तोत्र २:५ चा प्रतिध्वनी ऐकू येतो. ते स्तोत्र राजाच्या राज्याभिषेक समयी म्हटले जायचे. ख्रिस्ती व्यक्तीच्या बाप्तिस्म्यासमयी तिच्या कपाळावर पवित्र क्रुसाची खूण काढली जाते, छातीला व टाळूला पवित्र तेल लावले जाते. तिला पावित्र्याची वस्त्रे नेसविली जातात. तिच्या वतीने श्रद्धेची ज्योत आईबाप वधर्मआईबाप ह्यांच्या हाती दिली जाते.

आत्मपरीक्षण : माझ्या बाप्तिस्म्यामुळे माझ्या जीवनात नक्की कोणता बदल घडून आलेला आहे? मी इतर धर्मीयांपेक्षा कोणकोणत्या बाबतीत वेगळा आहे ? माझ्या जीवनात पवित्र आत्म्याचे कार्य कुठे व कसे सुरू आहे ?


प्रार्थना :  हे प्रभू येशू ख्रिस्ता, देवाची प्रिय मुले बनण्यास आम्हाला प्रेरणा व कृपा दे, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या