Marathi Bible Reading | Feast of St. Bless | Wednesday 3rd February 2021

सामान्य काळ 

बुधवार 

३ फेब्रुवारी  २०२१


संत ब्लेसचा  सण 

एकदा एका मुलाच्या घशात मासळीचा काटा अडकला होता. त्यामुळे तो मुलगा तडफडून मरण्याची शक्यता होती. त्या मुलाला बिशप ब्लेस ह्यांनी वाचवले. त्यावेळेपासून घशाच्या विकारांपासून मुक्ती मिळावी म्हणून संत ब्लेस ह्यांचा धावा केला जातो. दोन मेणबत्त्यांचा क्रूस करून तो भाविकांच्या गळ्यावर ठेवत धर्मगुरू त्यांना संत ब्लेसचा आशीर्वाद देतात.

मध्ययुगीन काळात तो इतका प्रसिद्धीस आलेला होता की एकट्या रोम शहरात ३० ख्रिस्तमंदिरांना संत ब्लेसचे नाव देण्यात आलेले आहे. लोकर कमावणारे, मेण गोळा करणारे, बांधकाम करणारे आणि वैद्य इत्यादींच्या १४ पवित्र सहाय्यक व आश्रयदात्या संतांपैकी तो एक मानला जातो.

तारणाच्या इतिहासात अनेकदा संदेष्ट्यांचा सन्मान त्यांच्या स्वकीयांत झाला नाही.  प्रभू येशू इतर गावांमध्ये शिक्षण देत व अद्भूत कृत्ये करीत राहिला. प्रभू येशूला स्वत:च्या गावात आणि नातेवाईकांत देवाचे कार्य करताना नकारात्मक अनुभव आला. तसाच अनुभव आपल्याला सुध्दा येऊ शकतो. आजच्या शुभवर्तमानावर आपण चिंतन करु या. ख्रिस्ताची सुवार्ता पसरविताना आपल्याला सुद्धा अशा लोकांच्या नकारात्मक व संदेहात्मक प्रतिक्रियांना सामोरे जावे लागते. मात्र  देवावरील एकनिष्ठा आणि श्रद्धेची ती कसोटी आहे. त्यासाठी सर्वदा सकारात्मक बनून देवावरील श्रद्धेत दृढबनण्याचा आपण प्रयत्न करुया.   

✝️

"संदेष्ट्याचा सन्मान त्याच्या देशात मात्र होत नसतो."

✝️

पहिले वाचन :इब्री लोकांस पत्र  १२:४-७.११-१५ 

वाचकइब्री लोकांस पत्र यातून घेतलेले वाचन 
 
तुम्ही पापाशी झगडत असता रक्त निघेपर्यंत अजून प्रतिकार केला नाही हा तुम्हांला पुत्राप्रमाणे केलेला बोध तुम्ही विसरून गेला आहा काय?

"माझ्या मुला, परमेश्वराच्या शिक्षेचा अनादर करू नको आणि त्याच्याकडून दोष पदरी पडला असता खचू नको. कारण ज्याच्यावर परमेश्वर प्रीती करतो, त्याला तो शिक्षा करतो आणि ज्या पुत्रांना तो स्वीकारतो त्या प्रत्येकाला तो शिक्षा करतो."
शिक्षणासाठी तुम्ही शिक्षा सहन करीत आहा. देव तुम्हाला पुत्रांप्रमाणे वागवतो आणि ज्याला बाप शिक्षा करीत नाही असा कोण पुत्र आहे ? कोणतीही शिक्षा तत्काली आनंदाची वाटत नाही, उलट खेदाची वाटते, तरी ज्यांना तिच्यापासून वळण लागले आहे त्यांना ती पुढे नीतिमत्त्व शांतिदायक फळ देते.
म्हणून लोंबकळणारे हात आणि लटपटणारे गुडघे सरळ करा आणि आपल्या पायांसाठी सरळ वाटा करा. ह्यासाठी की लंगड्याचा सांधा उखळू नये, तर उलट तो बरा व्हावा. सर्वांबरोबर शांततेने राहण्याचा आणि ज्यावाचून कोणालाही प्रभूला पाहता येत नाही ते पवित्रीकरण मिळवण्याचा झटून प्रयत्न करा. देवाच्या कृपेला कोणी उणे पडू नये; ज्यामुळे पुष्कळजण बिघडून जातील असे कोणतेही “कडूपणाचे मूळ" अंकुरित होऊन ऊपद्रव देणारे होऊ नये. कोणी जारकर्मी होऊ नये, ह्याकडे लक्ष द्या.

हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद : स्तोत्र  १०३:१-२,१३-१४,१७-१८अ

प्रतिसाद :  परमेश्वराची दया त्याचे भय करणाऱ्यांवर युगानुयुगे असते.

१)  हे माझ्या जिवा, परमेश्वराला धन्यवाद दे, हे माझ्या सर्व अंतर्यामा, त्याच्या पवित्र नावाला धन्यवाद दे. हे माझ्या जिवा, परमेश्वराला धन्यवाद दे, त्याचे सर्व उपकार विसरू नको. 

२) जसा बाप आपल्या मुलांवर ममता करतो. तसा परमेश्वर आपले भय धरणाऱ्यांवर ममता करतो; तो आमची प्रकृती जाणतो, आम्ही केवळ माती आहो हे तो आठवतो.

३ ) परमेश्वराची दया त्याचे भय धरणाऱ्यांवर युगानुयुगे असते आणि त्याच्या न्यायीपणाचा अनुभव जे त्याचा करार पाळतात त्या पुत्रपौत्रांना घडतो.

जयघोष

आलेलूया, आलेलूया !

तुम्ही आपली मने आज कठोर करू नका. तर परमेश्वराच्या वाणीकडे लक्ष द्या.

आलेलूया !


शुभवर्तमान : मार्क ६:१-६

वाचक :    मार्कलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

 येशू आपल्या गावी आला. त्याचे शिष्य त्याच्यामागे आले. मग शब्बाथ दिवशी तो सभास्थानात शिकवू लागला आणि पुष्कळ लोक त्याचे भाषण ऐकून थक्क झाले आणि म्हणाले, “ह्याला हे सर्व कोठून प्राप्त झाले ? काय हे ज्ञान ह्याला देण्यात आले आहे आणि ह्याच्या हातून केवढी ही महत्कृत्ये होतात! जो सुतार, जो मरियेचा मुलगा आणि याकोब, योसे, यहुदा आणि शिमोन ह्यांचा जो भाऊ तो हाच आहे ना? आणि ह्याच्या बहिणी येथे आपल्याबरोबर आहेत ना?" असे ते त्याच्याविषयी दबकत बोलू लागले. तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “संदेष्ट्याचा सन्मान होत नाही असे नाही; मात्र त्याच्या देशात, त्याच्या आप्तेष्टांत अथवा त्याच्या घरच्या मंडळीत त्याचा सन्मान होत नसतो." थोड्याशाच रोग्यांवर हात ठेवून त्याने त्यांना बरे केले, ह्याशिवाय दुसरे कोणतेही महत्कृत्य त्याला तेथे करता आले नाही. त्यांच्या अविश्वासामुळे येशूला आश्चर्य वाटले.

प्रभूचे हे शुभवर्तमान...

सर्व :  हे ख्रिस्त तुझी स्तुती असो.  

चिंतन : जवळ जवळ तीस वर्षे शांतपणे जीवन जगल्यावर, येशू अचानक स्वतःच्या गावी येऊन सभास्थानात प्रवचन देऊ लागला. त्याचा उत्साह, प्रभाव व आवेशपूर्ण शिकवणूक यामुळे गावातील लोक आश्चर्यचकीत झाले. कारण ते त्याला चांगलेच ओळखत होते. त्यांनी त्याची चेष्टा केली. 
त्यांच्या मनांतील पूर्वग्रहामुळे ते येशूच्या शिकवणुकीला पारखे झालेः आम्ही प्रभूची शिकवण सतत एकत आहोत. त्याचे शब्द आमच्या जीवनाचा प्रकाश म्हणून आम्ही स्वीकारले आहेत का ?

प्रार्थना : हे प्रभू येशू, धैर्याने व विश्वासाने तुला अनुसरण्यास व तुझी सुवार्ता पसरविण्यास कृपा दे, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या