Ticker

6/recent/ticker-posts

Marathi Bible Reading | Feast of St. John D'brito | Thursday 4th February 2021


सामान्य काळ 

गुरुवार 

४ फेब्रुवारी  २०२१


संत जॉन दिब्रिटो  सण 
(रक्तसाक्षी)
जॉन दिब्रिटो ह्यांना संत योहान बाप्तिस्तसारखेच मरण आले. एका राजाने आपल्या राजदरबारात एक रखेली ठेवली होती. जॉनने त्या स्त्रीला तिच्या पापी जीवनाची जाणीव करून दिली आणि नवजीवनाची कृपा मिळावी म्हणून प्रार्थना करण्यास सांगितले. ह्या सल्ल्यामुळे ती स्त्री भयंकर संतापली. तिने राजाचे कान फुंकले. तात्काळ जॉनला गजाआड करण्यात आले. तिथे त्याचा अमानुष छळ करण्यात आला आणि शेवटी त्याचा शिरच्छेद करण्यात आला.

देवाने दिलेल्या पाचारणाला होकार न दिल्याने आपण स्वतःहून देवाच्या क्रोधाला वाट मोकळी करून देतो. - संत जॉन दिब्रिटो


 'प्रेषित' म्हणजे निवड करुन खास कामगिरीवर  पाठविलेला निरोप्या किंवा दूत. प्रभू येशूख्रिस्ताने आपल्या प्रेषितांना वेळोवेळी प्रशिक्षण दिले. परमेश्वर आपल्या निवडलेल्या माणसांवर कृपादाने व वरदानांचा वर्षाव करीत असतो.

प्रभू येशू ख्रिस्ताने  आपल्या निवडलेल्या शिष्यांना अशुद्ध आत्म्यावरचा अधिकार दिला.  त्याचबरोबर आरोग्यदानाची कृपा दिली आणि सुर्वाता घोषविण्याची जबाबदारी  दिली.  आधारासाठी काठी आणि पायात वाहणा इतकेच फक्त गरजेचे आहे. ह्याचाच अर्थ स्वार्थ त्याग करण्याची आपली  तयारी असायला हवी.  त्यांच्याजवळ अन्न, वस्त्र, निवारा व पैसा नव्हते.  ख्रिस्ताठायी सर्वस्व समर्पण करुन प्रेषितांनी श्रद्धेने व पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने सुरुवात केली, प्रभूने त्यांच्या कार्यावर आशीर्वाद घातला आणि त्यांच्याद्वारे  अनेक अद्भूत कृत्ये घडून आली.
ख्रिस्ताच्या आज्ञेप्रमाणे आणि वचनाप्रमाणे जीवन जगणाऱ्या माणसांचा वापर परमेश्वर अद्भूत कृत्ये करण्यास करीत असतो. अशा व्यक्तींच्या प्रार्थनेमुळे व सहवासामुळे अनेकांचे परिवर्तन होत असते. ह्याचाच अर्थ अशुद्ध आत्म्यांचे शुद्धीकरण होते.
✝️

"त्याने त्यांना अशुद्ध आत्म्यांवरचा अधिकार दिला"

✝️

पहिले वाचन :इब्री लोकांस पत्र १२:१८-१९.२१-२४ 

वाचक : इब्री लोकांस पत्र यातून घेतलेले वाचन 
 
     स्पर्शनीय आणि अग्नीने पेटलेला पर्वत, घनांधकार, निबिड काळोख, वादळ, कर्ण्याचा नाद आणि शब्दध्वनी ह्यांच्याजवळ तुम्ही आला नाही; तो ध्वनी ऐकणाऱ्यांनी विनंती केली की, त्याच्यायोगे आम्हांबरोबर अधिक बोलणे होऊ नये. जे दिसले ते इतके भयंकर होते की, मोशे म्हणाला, "मी अति भयभीत आणि कंपित झालो आहे." पण तुम्ही सियोन पर्वत, जिवंत देवाचे नगर म्हणजे स्वर्गीय येरुशलेम, लाखो देवदूत, स्वर्गातील यादीतल्या ज्येष्ठांचा समाज आणि मंडळी, सर्वांचा न्यायाधीश देव, पूर्ण केलेल्या नीतिमानांचे आत्मे, नव्या कराराचा मध्यस्थ येशू आणि शिंपडण्याचे रक्त ह्यांच्याजवळ आला आहा; त्या रक्ताचे बोलणे हाबेलच्या रक्ताच्या बोलण्यापेक्षा श्रेष्ठ आहे.

हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद : स्तोत्र  ४८:२-४,९-११

प्रतिसाद : हे देवा, तुझ्या मंदिरात आम्ही तुझ्या वात्सल्याचे चितंन करतो.

१) परमेश्वर थोर आहे, आमच्या देवाच्या नगरात, त्याच्या पवित्र पर्वतावर, तो स्तुतीस अत्यंत पात्र आहे; उच्चतेमुळे सुंदर आणि सर्व पृथ्वीचा आनंद आहे.

२) उत्तर सीमेवरील सियोन पर्वत, राजाधिराजाचे नगर! देव त्याच्या प्रासादांमध्ये आश्रयदुर्ग असा प्रगट झाला आहे.

३) जे आम्ही ऐकले ते सेनाधीश परमेश्वराच्या नगरात, आमच्या देवाच्या नगरात पाहिले; ते हे की, देव सर्वकाळ ते स्थिर राखील.

४) हे देवा, तुझ्या मंदिरात आम्ही तुझ्या वात्सल्याचे चिंतन करतो. हे देवा, जसे तुझे नाव, तशी तुझी कीर्ती पृथ्वीच्या शेवटपर्यंत जात आहे. तुझा उजवा हात न्यायपूर्ण आहे.


जयघोष

आलेलूया, आलेलूया !

हे प्रभो, तू माझे नेत्र उघड म्हणजे तुझ्या धर्मशास्त्रातील अलौकिक गोष्टी माझ्या दृष्टीस पडतील.

आलेलूया !


शुभवर्तमान :मार्क ६:७-१३

वाचक :    मार्कलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

          येशूने बारा जणांस आपल्या जवळ बोलावले व तो त्यांना जोडीजोडीने बाहेर पाठवू लागला. त्याने त्यांना अशुद्ध आत्म्यांवरचा अधिकार दिला आणि त्यांना आज्ञा केली की, "वाटेसाठी काठीवाचून दुसरे काही घेऊ नका, भाकरी, झोळणा किंवा कमरकशात पैसे घेऊ नका, वहाणा घालून चाला, दोन अंगरखे घालू नका. तुम्ही कोठेही एखाद्याच्या घरी उतराल तेव्हा ते ठिकाण सोडीपर्यंत तेथेच राहा आणि ज्या ठिकाणी तुमचे स्वागत होणार नाही आणि जेथील लोक तुमचे ऐकणार नाहीत, तेथून निघताना, त्यांना साक्ष व्हावी म्हणून आपल्या तळपायांची धूळ तेथेच झाडून टाका." ते तेथून निघाले आणि लोकांनी पश्चात्ताप करावा अशी त्यांनी घोषणा केली, पुष्कळ भुते काढली आणि अनेक रोग्यांना तेल लावून बरे केले.

प्रभूचे हे शुभवर्तमान...

सर्व :  हे ख्रिस्त तुझी स्तुती असो.  


चिंतन : शुभवर्तमानाच्या प्रसारासाठी येशू शिष्यांना दोघादोघांच्या जोडीने पाठवतो. या मागचे कारण काय असावे ? मिशनकार्य पार पाडताना शिष्यांना अनेक अडचणीना तोंड दयावे लागेल. अनेक आव्हाने समोर येतील. अशावेळी त्यांनी एकमेकांना धीर दयावा. धैर्याने व चिकाटीने सतत पुढे जात राहावे. येशूचे वचन पाळताना आम्हांला देखील प्रसंगी खूप मनःस्ताप सहन करावा लागेल. निंदा व नालस्ती यांना तोड दयावे लागेल. प्रभू येशूची साथ आमच्या पाठीशी आहे. या विचाराने, अखेरपर्यंत मिशन कार्यात आम्ही टिकून राहावे याची गरज आहे.

प्रार्थना : -हे प्रभो परमेश्वरा, माझी श्रद्धा बळकट कर आणि तुझे सेवाकार्य  करण्यास व तुझी सुवार्ता घोषविण्यास कृपा दे, आमेन.