Ticker

6/recent/ticker-posts

Marathi Bible Reading | Feast of St. Gonsalo Garcia & Paul Miki & Companions | Saturday 6th February 2021

सामान्य काळ 

शनिवार  

६ फेब्रुवारी  २०२१


संत पॉल मिकी व सहकारी  सण 
(रक्तसाक्षी)

इ. स. १८६२ साली पोप पायस नववे ह्यांनी ३ येशूसंघीय, ६ फ्रान्सिस्कन्स, आणि १७ प्रापंचिक लोकांचा मिळून बनलेल्या २६ जणांना रक्तसाक्षीत्वाचा मुकूट प्रदान केला. वसईचा सुपुत्र   संत गोन्सालो गार्सिया हा त्यापैकी एक होय.

त्याच्या जीवनाचा शेवटचा टप्पा फार काळ टिकला नाही. जेव्हा जपानमध्ये ख्रिस्ती धर्मियांचा व मिशनऱ्यांच्या  छळ सुरू झाला तेव्हा गोन्सालो गार्सिया ह्याच्यासह पाच फ्रान्सिस्कन, तीन येशूसंघीय आणि सतरा जपानी प्रापंचिक (धर्मशिक्षक) ह्यांना नागासकीच्या टेकडीवर ५ फेब्रुवारी १५९७ रोजी क्रुसावर खिळण्यात आले. पोप पायस नववे ह्यांनी १८६२ रोजी त्यांना संतपदाचा मुकूट बहाल केला.

चिंतन : रक्तसाक्षींच्या रक्तावरच आजची ख्रिस्तसभा उभी आहे. आजच्या रक्तसाक्षींवर उद्याची ख्रिस्तसभा उभी राहील.


आपल्याला विरंगुळा किंवा विश्रांतीची म्हणजेच विसाव्याची गरज असते. विसावा घेतल्या शिवाय पुढीलकामे करण्यासाठी आपल्याला उर्जा मिळणार नाही. आपले काम,  प्रवास,  नाते संबंध जपणे वगैरे होत असते.  दिवस कधी मावळतो ते समजत नाही. आजच्या शुभवर्तमानात प्रभूयेशू आपल्या शिष्यांना विसावा घेण्याचे  आवाहन करीत आहे.

सर्व कामे बाजूला सारुन आपल्या जीवनावर चिंतन करण्याची व सिंहावलोकन करण्याची गरज आहे. मात्र एकांतात आणि शांत ठिकाणी गेल्याशिवाय परमेश्वराबरोबर संवाद आणि जवळिक साधता येत नाही.  चांगल्या  गोष्टीबद्धल देवाचे आभार मानणे आणि चुकांबद्धल पश्चाताप करणे ह्यासाठी  एकांतात जाण्याची गरज आहे.
आपले जीवन आनंदाने आणि कृपेने भरलेले असावे म्हणून परमेश्वराची प्रेरणादायी उर्जा मिळविण्यासाठी थोडावेळ बाजूला सारुन ध्यान-साधना किंवा तप (रिट्रिट) करण्यासाठी तयारी करु  या. 

✝️

 "ते तर मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे होते, म्हणून त्याला त्यांचा कळवळा आला"

✝️

पहिले वाचन :इब्री लोकांस पत्र १३:१५-१७, २०-२१ 

वाचक : इब्री लोकांस पत्र यातून घेतलेले वाचन 

        येशूचे नाव पत्करणाऱ्या ओठांचे फळ असा स्तुतीचा यज्ञ आपण येशूद्वारे देवाला नित्य अर्पण करावा. चांगले करण्यास आणि दान करण्यास विसरू नका; कारण अशा यज्ञांनी देव संतुष्ट होतो.

आपल्या अधिकाऱ्यांच्या आज्ञेत राहा आणि त्यांच्या अधीन असा, कारण आपणास हिशेब द्यावयाचा आहे हे समजून ते तुमच्या जिवांची राखण करतात. ते त्यांना आनंदाने करता यावे. कण्हत नव्हे, तसे झाल्यास ते तुमच्या हिताचे होणार नाही.

आता ज्या शांतीच्या देवाने सर्वकाळच्या कराराच्या रक्ताने मेंढरांचा महान मेंढपाळ आपला प्रभू येशू, ह्याला मेलेल्यातून परत आणले, तो देव आपल्या दृष्टीने जे आवडते ते आपणामध्ये ख्रिस्ताच्याद्वारे करो आणि तो आपल्या इच्छेप्रमाणे करण्यास तुम्हाला प्रत्येक चांगल्या कामात सिद्ध करो; त्या येशू ख्रिस्ताचा युगानुयुगे गौरव असो. आमेन

हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद : स्तोत्र  २२:१-,६

प्रतिसाद : परमेश्वर माझा मेंढपाळ आहे; मला काही उणे पडणार नाही.


१ परमेश्वर माझा मेंढपाळ आहे; मला काही उणे पडणार नाही. तो मला हिरव्यागार कुरणात बसवतो. तो मला संथ पाण्यावर नेतो, तो माझा जीव ताजातवाना करतो.

२ तो आपल्या नावासाठी मला नीतिमार्गांनी चालवतो. मृत्यूच्छायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी कसल्याही अरिष्टाला भिणार नाही. कारण तू माझ्याबरोबर आहेस. तुझी आकडी आणि तुझी काठी मला धीर देतात.

३ तू माझ्या शत्रूंच्यादेखत माझ्यापुढे ताट वाढतोस. तू माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करतोस; माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहे.

४ खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण आणि दया ही लाभतील. परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहीन.


जयघोष

आलेलूया, आलेलूया !

तू आपल्या वात्सल्याने मला नवजीवन दे, म्हणजे मी तुझ्या इच्छेप्रमाणे वागेन.

आलेलूया !


शुभवर्तमान :मार्क ६:३०-३४

वाचक :    मार्कलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

       प्रेषित येशूजवळ जमा झाले आणि आपण जे जे केले आणि जे जे शिकवले ते सर्व त्यांनी त्याला सांगितले. तेव्हा येशू त्यांना म्हणाला, "तुम्ही रानात एकान्ती चला आणि थोडा विसावा घ्या." तेथे पुष्कळ लोक येत जात असल्यामुळे त्यांना जेवावयास देखील सवड होईना. तेव्हा ते मचव्यातून पलीकडे रानात एकान्ती गेले. लोकांनी त्यांना निघताना पाहिले आणि पुष्कळजणांनी त्यांना ओळखले आणि तेथल्या सर्व गावातून लोक पायीच निघाले आणि धावत जाऊन त्यांच्या अगोदर तिकडे पोहचले. येशू मचव्यातून उतरला तेव्हा त्याने लोकांचा मोठा समुदाय पाहिला; ते तर मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे होते, म्हणून त्याला त्यांचा कळवळा आला आणि तो त्यांना बऱ्याच गोष्टींविषयी शिक्षण देऊ लागला. 

प्रभूचे हे शुभवर्तमान...

सर्व :  हे ख्रिस्त तुझी स्तुती असो.  


चिंतन : येशू शुभवर्तमान घोषित करण्यासाठी शिष्यांना गावात पाठवितो. ते परत आल्यावर एकत्र बसून मिशनकार्यातील आपले अनुभव येशूसमोर सादर करतात. अनुभव कथन व प्रार्थना याद्वारे येशू शिष्यांना योग्य अशाप्रकारे मिशन कार्य करण्यास शिकवण देतो. केवळ बुद्धीचे कौशल्य वापरून नव्हे तर पवित्र आत्म्याची प्रेरणा घेऊन आपण ख्रिस्ती संदेशाचा प्रसार करावा हा बोध आज आम्हाला मिळत आहे. हे प्रभू येशू, पवित्र आत्म्याची प्रेरणा घेऊन प्रार्थनेच्या वातावरणात शुभवर्तमान घोषविण्याचे कार्य करावयास आम्हाला सहाय्य कर .

प्रार्थना : -हे प्रभ येशू, तुझ्याठायी विसावा घेण्यास व सार्वकालिक जीवनाचे वतनदार बनण्यास पात्र ठरावेत म्हणून आम्हाला प्रेरणा दे, आमेन.