उपवास काळातील 


पहिला रविवार  

 

२१ फेब्रुवारी  २०२१






प्रभु येशू ख्रिस्ताने आपल्या तारण कार्याची सुरुवात करण्याआधी चाळीस दिवस अरण्यामध्ये उपवास केला आणि देवपित्याबरोबर ऐक्य साधले. ह्या प्रायश्चित्त काळात आपण आपल्या पापांबद्दल पश्चात्ताप करुन देवाबरोबर दुरावलेले संबंध नव्याने प्रस्थापित करणार आहोत . पश्चात्ताप म्हणजे केवळ पापांचा त्याग नसून पापांबद्दल भरपाई करणे सुद्धा महत्त्वाचे आहे.  त्याचबरोबर देवाशी व मानवाशी समेट घडवून ऐक्य साधायचे आहे.   देवाबरोबरचे संबंध दृढबनविण्यासाठी देवाच्या सुवार्तेवर म्हणजेच देवाच्या  वचनांवर आणि देवाच्या आज्ञांवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे, म्हणूनच प्रभू  येशू सुवार्तेवर विश्वास ठेवण्यासाठी आवाहन करीत आहे.
आज देवाच्या जवळ जाऊ या. आत्मत्याग, सेवा, दानधर्म, उपवास व प्रार्थना ह्याद्वारे देवाबरोबर असलेले आपले नाते मजबूत बनवू या. देवाच्या आपल्यावरील प्रेमाबद्दल त्याचे आभार मानू या व त्याची सुवार्ता इतरांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील बनवू या.

✝️

"देवाचे राज्य जवळ आले आहे. पश्चात्ताप करा व

 सुवार्ता वर विश्वास ठेवा."

✝️

पहिले वाचन : उत्पत्ती ९:८-१५

वाचक :उत्पत्ती या पुस्तकातून घेतलेले वाचन 

"जलप्रलयामधून वाचलेल्या नोहाबरोबर परमेश्वराने करार केला."

देव नोहाला व त्याच्याबरोबर त्याच्या पुत्रांना म्हणाला, “पाहा, मी तुम्हांशी व तुमच्यामागे तुमच्या संततीशी करार करून ठेवतो त्याप्रमाणेच तुम्हांबरोबर असलेले सर्व जिवंत प्राणी, म्हणजे तुम्हांबरोबर तारवातून बाहेर आलेले पशू, पक्षी व पृथ्वीवरील इतर सर्व प्राणी यांच्याबरोबरही मी करार करून ठेवतो. पुन्हा जलप्रलयाने प्राणीमात्र नष्ट होणार नाहीत आणि पृथ्वीनाश करणारा जलप्रलय पुन्हा कधी व्हावयाचा नाही." आणि देव म्हणाला, "पाहा माझ्यामध्ये व तुम्हांमध्ये त्याप्रमाणेच तुम्हांबरोबर असणाऱ्या सर्व सजीव प्राण्यामध्ये पिढ्यान्पिढ्या, युगानुयुगे राहणारे जो करार मी करत आहे त्याचे चिन्ह हे : मी मेघात धनुष्य ठेवले आहे, ते पृथ्वीच्या व माझ्यामधल्या कराराचे चिन्ह समजावे. मी पृथ्वीवर मेघ पसरीन व त्यात धनुष्य दिसेल, तेव्हा माझ्यामध्ये आणि तुम्ही व सर्व देहधारी सजीव प्राणी यांच्यामध्ये झालेला करार मी स्मरेन आणि यापुढे सर्व देहधाऱ्यांचा नाश करील असा जलप्रलय होणार नाही."

हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद :स्तोत्र २५:४-९

प्रतिसाद :प्रभो, तुझे मार्ग वात्सल्यमय व सत्यपूर्ण आहेत.

१) हे परमेश्वरा, तुझ्या वाटा मला दाखव, तुझे मार्ग मला प्रकट कर. तू आपल्या सत्पथाने मला ने, मला शिक्षण दे. कारण तू माझा उद्धारक देव आहेस.

२) हे परमेश्वरा, तू आपला कळवळा व वात्सल्य ही आठव. ती पुरातन काळापासून आहेत. तू आपल्या वात्सल्यानुसार, हे प्रभो, माझे स्मरण कर.

३) परमेश्वर श्रेष्ठ व सरळ आहे. म्हणून तो पाप्यांना सन्मार्ग दाखवतो. तो नम्र जनांना न्यायपथाला लावतो. तो दीनांना आपला मार्ग शिकवतो.


दुसरे वाचनपेत्र ३:१८-२२

वाचक : पेत्रचे पहिले पत्र यातून घेतलेले वाचन 

"बाप्तिस्मा तुमचे तारण करीत आहे."

            बंधुजनहो, आम्हांला देवाजवळ नेण्यासाठी ख्रिस्तानेही पापांबद्दल, म्हणजे नीतिमान पुरुषाने अनीतिमान लोकांकरिता, एकदा मरण सोसले. तो देहरूपात जिवे मारला गेला आणि आत्म्यात जिवंत केला गेला. त्या आत्म्याच्याद्वारे त्याने जाऊन तुरुंगातील आत्म्यांना घोषणा केली. हे आत्मे म्हणजे पूर्वी नोहाच्या दिवसांत तारू तयार होत असता देव सहनशीलतेने वाट पाहात होता, त्यावेळी ज्यांनी त्याची आज्ञा अवमानली तेच ते होत. त्या तारवात केवळ आठ जण पाण्यातून वाचवण्यात आले.

    या घटनेशी जुळणारा असा बाप्तिस्मा आता येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्याद्वारे तुमचे तारण करीत आहे. त्याचा अर्थ केवळ देहाचा मळ धुवून टाकणे नव्हे, तर शुद्ध भावाने परमेश्वराचे ऐकणे, असा आहे. तो येशू ख्रिस्त स्वर्गात गेला आणि आता देवाच्या उजवीकडे आहे आणि त्याच्या स्वाधीन देवदूत, अधिकारी व सत्ताधीश हे ठेवले आहेत.

हा प्रभूचा शब्द आहे

सर्व : देवाला धन्यवाद.

जयघोष   

मनुष्य केवळ भाकरीने नव्हे, तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगत असतो.


शुभवर्तमान   मार्क १:१२-१५
वाचक : मार्कलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

"सैतानाने येशूची परीक्षा पाहिली आणि देवदूतांनी त्याची सेवा केली."

आत्म्याने येशूला लागलीच अरण्यात नेले आणि सैतान त्याची परीक्षा पाहात असता तो अरण्यात चाळीस दिवस राहिला. तो वनपशूमध्ये राहात होता आणि देवदूत त्याची सेवा करीत होते. योहानला अटक झाल्यानंतर येशू देवाची सुवार्ता गाजवीत गालिलात आला व म्हणाला, "काळाची पूर्णता झाली आहे व देवाचे राज्य जवळ आले आहे. पश्चात्ताप करा व सुवार्ता वर विश्वास ठेवा."

प्रभूचे हे शुभवर्तमान...

सर्व :  हे ख्रिस्त तुझी स्तुती असो.  


चिंतन : माणूस परमेश्वरापासून टप्प्या-टप्प्याने दूर जात असतो. त्यातील पहिला टप्पा असतो मोह. माणसाची पंचेद्रिये (डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा), विचार, स्मरणशक्ती, कल्पनाशक्ती व भावना अशा विविध मार्गांनी मोह माणसाच्या इच्छाशक्तीचा ताबा घेतो व त्यातून पाप घडते ह्या मोहावर विजय मिळविण्यासाठी ख्रिस्तसभा आज येशूचा आदर्श आपल्यासमोर उभा करत अरण्यात येशूला जे तीन मोह झाले त्याचा सविस्तर वृत्तांत संत मत्तय व लूक ह्यांच्या शुभवर्तमानात देण्यात आलेला आहे. प्रत्येक मोहात सैतान येशूला कसले तरी आमिष दाखविताना दिसतो. येशू मात्र त्या आमिषापेक्षा आपले तत्व व निष्ठा ह्यांना महत्व देताना आढळतो. 
१) दोन प्रकारची भूक : चाळीस दिवस आणि चाळीस रात्री उपवास केल्यानंतर येशूची पहिली गरज होतीः अन्न किंवा भाकर! स्वतःची शारीरिक भूक भागविण्यासाठी येशूने आपले दैवी सामर्थ्य पणाला लावावे असे सैतान सुचवितो. मात्र शारीरिक भुकेपेक्षा आपली आध्यात्मिक भूक अधिक महत्वाची आहे असे येशू ठणकावून सांगतो.  
२) दोन प्रकारचे स्वामित्व : ह्या जगातील वैभव मिळविण्यासाठी येशूने आपल्या पाया पडून आपले स्वामित्व पत्करावे असे सैतान सुचवितो. येशू मात्र परमेश्वर आपला देव ह्याची सेवा व उपासना करण्यावर ठाम राहातो. 
) बायबलचा अर्थ लावण्याच्या दोन पद्धतीः येशूने उंच कड्यावरून खाली उडी मारावी म्हणून सैतानाने त्याला स्तोत्र ९१ मधील ११-१२ ही वचने बोलून दाखविली. सैतान स्वतःच्या सोयीनुसार बायबलचा अर्थ लावीत होता. येशू मात्र परमेश्वराची योजना स्पष्ट करीत बायबलचा आधार घेतो आणि परमेश्वराची परीक्षा घेणे टाळतो.
आत्मपरीक्षण : माझ्या जीवनात मला कोणकोणत्या बाबतीत मोहाच्या प्रसंगांना सामोरे जावे लागते ? मी मोहाचे प्रसंग आत्मविश्वासाने हाताळतो का? मी मोहाला सहज बळी पडतो की त्यावर विजयी होतो ? 
मननासाठी शास्त्रवाचन : 'मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्रराच्या मुखातून पडणाऱ्या प्रत्येक वचनावर जगेल.'

प्रार्थना :हे प्रभू परमेश्वरा, आम्ही सर्वदा समेट साधून तुझ्या कृपाछत्राखाली असावे म्हणून आम्हाला प्रेरणा व कृपा दे, आमेन.