Marathi Bible Reading | The Chair of St. Peter 22nd February 2021

 उपवास काळातील 

पहिला सप्ताह 

सोमवार

२२ फेब्रुवारी  २०२१

(संत पेत्राचे आसन)  पेत्राचा पदाधिकार, प्रेषित





पेत्राला येशू म्हणाला,  तुला स्वर्गराज्याच्या किल्ल्या देईन. जे काही तू पृथ्वीवर बांधशील ते स्वर्गात बांधले जाईल आणि जे काही तू पृथ्वीवर मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे  केले जाईल.' संत पेत्राने ज्या आसनावर बसून सुवार्तिकांना मार्गदर्शन केले त्या विशेष आसनाचा आपण आज सन्मान करीत आहोत. त्या आसनाला कॅथेड्रा पेट्रीय असे संबोधले जाते. व्हॅटिकनच्या प्राचीन महामंदिरात (संत पीटर  महामंदिर) सदर पेत्राचे आसन जतन करुन ठेवण्यात आले आहे. हे आसन ओकच्या वृक्षापासून तयार केलेले आहे व सद्या त्यावर हस्तीदंती मुलामा चढविण्यात आला आहे. संत पेत्रांच्या आसनाचा सन्मान हा ख्रिस्तसभेतील परमगुरुस्वामींच्या स्थानाचा सन्मान आहे. परमगुरुस्वामींसाठी दररोजच्या मिस्साबलिदानामध्ये प्रार्थना करुन विश्वव्यापी ख्रिस्तसभेचे ऐक्य व्यक्त केले जाते. परमगुरुस्वामींचा  व त्यांच्या शिकवणुकीचा योग्य तो सन्मान करुन आज्ञाधारकपणे आपण आपले ख्रिस्ती जीवन जगावे. 


✝️

"तू पेत्र आहेस आणि मी तुला 

स्वर्गराज्याच्या किल्ल्या देईन."

✝️

पहिले वाचन : १ प्रेत्र ५ : १-४
वाचक :प्रेत्रचे पहिले पत्र यातून घेतलेले वाचन

    तुम्हातील वडिलांना, मी तुमच्याप्रमाणेच वडील, ख्रिस्ताच्या दुःखांचा साक्षी आणि प्रकट होणाऱ्या गौरवाचा वाटेकरी तो मी असा बोध करतो. तुम्हामधील देवाच्या कळपाचे पालन करा, करावे लागते म्हणून नव्हे, तर देवाच्या इच्छेप्रमाणे संतोषाने त्याची देखरेख करा. द्रव्यलोभाने नव्हे तर उत्सुकतेने करा. सोपवलेल्या लोकांवर धनीपण करणारे असे नव्हे, तर तुमच्या हाती कळपाला आदर्श व्हा. मग जेव्हा मुख्य मेंढपाळ प्रकट होईल तेव्हा तुम्हास गौरवाचा न कोमेजणारा हार प्राप्त होईल.

हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद :स्तोत्र  २३:१- ६

प्रतिसाद : परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही.

१) परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. तो मला हिरव्यागार कुरणात बसवतो. तो मला संथ पाण्यावर नेतो, तो माझा जीवन ताजातवाना करतो.

२) तो आपल्या नामासाठी मला नीतिमार्गाने चालवतो. मृत्युछायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी कसल्याही अरिष्टाला भिणार नाही. कारण तू माझ्याबरोबर आहेस, तुझी आकडी आणि तुझी काठी मला धीर देतात.

३.) तू माझ्या शत्रूंच्या देखत माझ्यापुढे ताट वाढतोस. तू माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करतोस, माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहे.

४.) खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण आणि दया ही लाभतील. परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहीन..

जयघोष   

तू पेत्र आहेस आणि ह्या खडकावर मी आपली मंडळी स्थापीन व तिच्यापुढे अधोलोकाच्या द्वारांचे काहीच चालणार नाही.


शुभवर्तमान  मत्तय १६ : १३-१९
वाचक : मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

    फिलिप्पाच्या कैसरीयाकडल्या भागात गेल्यावर येशूने आपल्या शिष्यांना विचारले, "मनुष्याच्या पुत्राला लोक काय म्हणून म्हणतात?" ते म्हणाले, "कोणी स्नान संस्कार करणारा योहान, कोणी एलीया, कोणी यिर्मया, किंवा संदेष्टयातील कोणी एक, असे म्हणतात." तो त्यांना म्हणाला, "पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता?" शिमोन पेत्रने उत्तर दिले, "आपण ख्रिस्त, जिवंत देवाचे पुत्र आहा." येशूने त्याला म्हटले, “शिमोन बार्योना, धन्य तुझी! कारण मांस आणि रक्त यांनी नव्हे तर माझ्या  स्वर्गातील पित्याने हे तुला प्रकट केले आहे. आणखी मी तुला सांगतो, तू पेत्र आहेस आणि ह्या खडकावर मी आपली मंडळी स्थापीन आणि तिच्यापुढे अधोलोकाच्या द्वारांचे काहीच चालणार नाही. मी तुला स्वर्गराज्याच्या किल्ल्या देईन आणि पृथ्वीवर जे काही तू बांधशील ते स्वर्गात बांधले जाईल आणि पृथ्वीवर जे काही तू मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल."

प्रभूचे हे शुभवर्तमान...

सर्व :  हे ख्रिस्त तुझी स्तुती असो.  


चिंतन : आज आपण प्रेषित पेत्राच्या सर्वोच्च पदाचा सण साजरा करतो. पेत्राने समर्थपणे ख्रिस्तसभेला मार्गदर्शन करावे या उद्देश्याने येशूने त्याला खडकाची उपमा दिली. तू ख्रिस्त म्हणजे जिवंत देवाचा पुत्र आहेस हे सत्य पेत्राला पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने समजले. पेत्राने आपले कार्य करताना पवित्र आत्म्याचे सामर्थ्य आपल्याला लाभले आहे याची जाणीव ठेवली. आमच्या कुटुंबात व ख्रिस्तसभेत जबाबदारीने कार्य करण्यासाठी पवित्र आत्म्याचे सहाय्य मागूया.

प्रार्थना : हे प्रभू येशू, तुला जीवनाचा स्वामी म्हणून स्वीकारण्यास आणि परमगुरुस्वामींचा सन्मान करण्यास आम्हाला प्रेरणा लाभो ही प्रार्थना, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या