Marathi Bible Reading | 1st Week of Lent Tuesday 23rd February 2021

  उपवास काळातील 

पहिला सप्ताह 

मंगळवार

२३ फेब्रुवरी  २०२१

संत पॉलीकार्पचा सण




कानाच्या आजारासाठी संत पॉलीकार्प ह्यांचा धावा केला जातो.
 आपल्या हौतात्म्यावेळी बिशप पॉलीकार्प ह्यांनी पुढीलप्रमाणे प्रार्थना केली : हे प्रभो, ह्या दिवसाच्या आणि क्षणाच्या भेटीबद्दल रक्तंसाक्ष्यांच्या संगतीत मी ख्रिस्ताच्या एकाच प्याल्यात सहभागी व्हावे, तुझा अभिषिक्त म्हणून गौरविले जावे, आत्म्याने व शरीराने पुन्हा उठविले जावे आणि पवित्र आत्म्याद्वारे अमरत्वाचे शाश्वतजीवन जगावे यासाठी मला पात्र बनव. तुझ्या संतांच्या सहवासात एक समृद्ध व प्रसन्न यज्ञ म्हणून माझ्या जीवनाचा स्वीकार होवो, आमेन.


परमेश्वराच्या मुखातून निघालेली वाणी फलद्रूप होत असते, कारण स्वर्गातील  पिता परमेश्वर सर्वांवर दया करून सर्वांची काळजी वाहणारा परमेश्वर आहे.  प्रभू येशू आपल्याला  ह्या प्रार्थनेत देवपित्याचा सन्मान करुन  त्याचे राज्य पृथ्वीतलावर यावे म्हणून विनवितो.आपले आपल्या बंधु- भगिनींबरोबरचे संबंध सलोख्याचे व समतेचे असावे, म्हणून क्षमादान मिळविण्यासाठी विनंती करण्यात येते. ह्या प्रार्थनेत आपली शारीरिक तसेच आध्यात्मिक भूक परमेश्वराने पूर्ण करावी म्हणून विनवणी केली जाते. सर्व अनिष्टांपासून व मोहापासून केवळ परमेश्वरच आपल्याला वाचवू शकतो ह्याची जाणीव ह्या प्रार्थनेत करुन दिली जाते. विशेषत: परमेश्वराचे प्रेमाचे, शांतीचे आणि| वैभव राज्य पृथ्वीवर यावे ह्यासाठीच तर प्रभू येशू जगात आला होता. 

✝️

जर तुम्ही लोकांना त्यांच्या

अपराधांची क्षमा केली

 तर तुमचा स्वर्गीय पिता तुम्हालाही

क्षमा करील ."

✝️


पहिले वाचन :यशया ५५:१०-११
वाचक :यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन

"माझा शब्द माझ्या इच्छा पूर्ण करील."
प्रभू म्हणतो, "पाहा, पाऊस व बर्फ ही आकाशातून पडतात आणि पृथ्वी भिजवून, तिला सफळ व हिरवीगार केल्यावाचून, पेरणाऱ्याला बीज, खाणाऱ्याला भाकरी दिल्यावाचून ती परत वर जात नाहीत. त्याचप्रमाणे माझ्या मुखातून निघणारे वचन होईल, ते माझी इच्छा पूर्ण केल्यावाचून व ज्या कार्याकरिता मी ते पाठवले ते केल्यावाचून माझ्याकडे विफल होऊन परत येणार नाही."

हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद :स्तोत्र   ३४:४-७,१६-१९

प्रतिसाद :सात्त्विकांचा धावा प्रभू ऐकतो.

१) माझ्याबरोबर प्रभूची थोरवी गा. त्याच्या नामाचा महिमा आपण एकमुखाने गाऊ या. मी प्रभूला शरण गेलो. त्याने माझे ऐकले. त्याने माझी सगळी भीती घालविली.

२) त्याच्याकडे पाहणाऱ्यांची मुद्रा तेजस्वी होते. त्यांचा चेहरा निराशेने पडणार नाही. मी पामराने धावा केला, प्रभूने तो ऐकला आणि माझी संकटे हरण केली.

३) वाईट करणारांची आठवणदेखील पृथ्वीवरून बुजवून टाकावी म्हणून प्रभू त्यांना विमुख होतो. प्रभूची दृष्टी सात्त्विकांकडे लागलेली असते. त्यांची हाक ऐकायला त्याचे कान उघडे असतात. 

४) सात्त्विक धावा करतात, प्रभू ऐकतो. तो सर्व संकटांतून त्यांना सोडवतो. ज्यांची कंबर खचली आहे अशांच्या जवळ प्रभू असतो. ज्यांचे अवसान गळाले आहे अशांचा तो उद्धार करतो.

जयघोष   

प्रभू म्हणतो, “आता तरी मनःपूर्वक माझ्याकडे वळा कारण मी कृपाळू, कनवाळू, मेद क्रोध, दयासागर आहे."


शुभवर्तमान  मत्तय ६ :७-१५
वाचक : मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

येशूने आपल्या शिष्यांना म्हटले, "तुम्ही प्रार्थना करता तेव्हा परराष्ट्रीयांसारखी व्यर्थ बडबड करू नका, आपण पुष्कळ बोललो म्हणजे आपले मागणे मान्य होईल असे त्यांना वाटते. तुम्ही त्यांच्यासारखे होऊ नका, कारण तुमच्या गरजा काय आहेत हे तुमचा पिता, तुम्ही त्याच्यापाशी मागण्यापूर्वीच जाणून आहे. 
ह्यास्तव तुम्ही ह्या प्रकारे प्रार्थना करा : 
हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र
मानले जावो. तुझे राज्य येवो. 
जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. 
आमची रोजची भाकर आज आम्हांला दे. 
आणि जसे आम्ही आमच्या देणेकऱ्यांना देणे सोडले आहे तसे तू आमची देणी आम्हांला सोड. आमची परीक्षा पाहू नको आणि आम्हांला वाईटापासून सोडव.
कारण जर तुम्ही लोकांना त्यांच्या अपराधांची क्षमा केली तर तुमचा स्वर्गीय पिता तुम्हालाही क्षमा करील . परंतु जर तुम्ही लोकांना क्षमा केली नाही तर तुमचा पिताही तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही."

प्रभूचे हे शुभवर्तमान...

सर्व :  हे ख्रिस्त तुझी स्तुती असो.  


चिंतन : आजच्या शुभवर्तमानात येशू शिष्यांना  "आमचे बापा” ही शाश्वतकाळाची प्रार्थना शिकवितो. या प्रार्थनेद्वारे येशू शिष्यांना आणि आपणा प्रत्येकाला आठवण करून देतो की, प्रत्येक वेळी जेव्हा आपण आमचे बापा, ही प्रार्थना करतो, तेव्हा आपल्या वर्तमान, भूतकाळ आणि भविष्य काळातील गरजांसाठी प्रार्थना करतो. म्हणून आपण जेव्हा, आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, असे म्हणतो, तेव्हा आपण वर्तमान काळातील गरजांसाठी प्रार्थना करतो. जेव्हा आपण, आम्हाला आमच्या पापांची क्षमा कर असे म्हणतो तेव्हा आपण भूतकाळातील गरजांसाठी प्रार्थना करतो आणि आपण जेव्हा 'आम्हांला मोहात पडू देऊ नकोस म्हणतो, तेव्हा आपण भविष्य काळातील गरजांसाठी प्रार्थना करतो. आपण जेव्हा आमची रोजची भाकर म्हणतो, तेव्हा आपल्याला स्वर्गीय पित्याची आठवण करून देण्यात येते. तो आपला उत्पन्न कर्ता आहे. जेव्हा आपण, आमच्या पापांची क्षमा म्हणतो, आपण देवपुत्र येशूिस्ताची आठवण करतो. तो आपला तारणारा आहे. आणि आपण जेव्हा म्हणतो, आम्हाला मोहात पडू देऊ नकोस पण वाईटापासून सोडव, आपण पवित्र त्रैक्याला आठवितो. तो आपणास पवित्र करतो. म्हणूनच आपण ही प्रार्थना फक्त एक धार्मिकविधी म्हणून न करता अर्थपूर्ण पाणी आणि सखोल श्रद्धेने करावी यासाठी आपल्याला आमंत्रण केले आहे.

प्रार्थना : हे परमेश्वर बापा, तुझ्या इच्छेप्रमाणे जीवन जगण्यास व तुझ्या राज्याचे सहभागीदार बनण्यास आम्हाला प्रेरणा व कृपा दे,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या