Marathi Bible Reading | 1st Week of Lent Wednesday 24th February 2021

उपवास काळातील 


पहिला सप्ताह 


बुधवार

 

२४ फेब्रुवरी  २०२१




 देवाच्या आज्ञेनुसार योनाने निनवेकरांना पश्चात्तापाचा संदेश दिला. लहानातल्या सर्वापासून निनवेच्या राजापर्यंत सर्वांनी  दुराचरण सोडले आणि पश्चात्ताप केला. देवाने त्यांच्यावर कोणतेच संकट आणू दिले नाही  अशाप्रकारे निनवेकरांसाठी योना देवाचे चिन्ह बनला.

 ह्या प्रायश्चित काळात सर्वांनी आपल्या कुमार्गापासून  वळावे व पश्चात्ताप करावा, कारण योनापेक्षा थोर म्हणजे खुद्द प्रभू येशू आपल्याला चिन्ह देऊन बोलावीत आहे. आपण आपल्या जीवनावर चिंतन करून आपले परिक्षण  करु या. आपण देवापासून बहकून  दूर गेलो आहोत  आपल्यामध्ये अहंकार, स्वार्थ आणि दुष्टता वाढली आहे.  पश्चाताप आणि प्रार्थनेचा अभाव आहे. ख्रिस्तसभेने दिलेल्या संधीचा आपण येग्य तो उपयोग करुन घेऊ. प्रायश्चित्त संस्कार घेऊन आपल्या आध्यात्मिक जीवनाचे नुतनीकरण करण्याची हीच चांगली वेळ आहे.सकारत्मकतेने देवाच्या वाणीकडे लक्ष देऊ या आणि आपले जीवन परमेश्वराच्या दयेने, प्रेमाने व कृपेने बहरावे म्हणून सन्मार्गावर चालण्यासाठी प्रेरणा मागू या.

✝️


"योनाच्या चिन्हाशिवाय ह्या पिढीला दुसरे चिन्ह दिले जाणार नाही."

✝️

पहिले वाचन : योना ३:१-१०
वाचक : योना या पुस्तकातून घेतलेले वाचन 

"निनवेच्या लोकांनी आपले दुराचरण सोडले"

योनाला दुसऱ्यांदा प्रभूचा आदेश आला. तो म्हणाला, "ऊठ, त्या मोठ्या निनवे शहरात जा आणि मी देतो तो संदेश तू तेथे जाहीर कर.” योना उठला आणि प्रभूच्या आज्ञेनुसार निनवेला गेला. निनवे तर फार मोठे शहर होते. ते सगळे फिरून येण्यास तीन दिवस लागत. योनाने शहरातून जाण्यास सुरुवात केली आणि एक दिवसाच्या वाटचालीनंतर दवंडी पिटवून तो म्हणाला, "फक्त चाळीस दिवस, मग निनवे जमीनदोस्त होईल !" तेव्हा निनवेच्या लोकांनी देवावर विश्वास ठेवला. त्यांनी सार्वजनिक उपवास जाहीर केला आणि श्रेष्ठांपासून तर कनिष्ठांपर्यंत सर्वजण पश्चात्तापदर्शक गोणपाट नेसले. निनवेच्या राजाला ही खबर पोहचली तेव्हा तो आपल्या सिंहासनावरून उठला आणि त्याने आपल्या अंगावरील राजवस्त्र काढून टाकले व पश्चात्ताप दाखविण्यासाठी गोणपाट नेसून तो राखेत बसला. मग त्याने फर्मान काढून निनवेभर जाहीर केले ते असे, "हा राजाचा व त्याच्या श्रेष्ठींचा हुकूम आहे. कोणीही मनुष्याने, पशूने, गुराढोराने तसे शेरडामेंढराने काहीही चाखू नये, खाऊ नये, पाणी पिऊ नये. माणसे व पशू ह्यांनी गोणपाटे पांघरावी आणि कळकळीने देवाला आळवावे. प्रत्येकाने आपले दुराचरण सोडावे व हिंसाचारापासून आपले हात आवरावे. कोण जाणे कदाचित देव अनुताप पावेल व आपल्या संतप्त क्रोधापासून परावृत्त होईल, म्हणजे आपला नाश होणार नाही. " त्यांनी आपले दुराचरण सोडले. ही त्यांची कृती देवाने पाहिली. तेव्हा त्याने अरिष्ट त्यांच्यावर आणीन असे सांगितले होते त्यापासून तो अनुताप पावला आणि ते त्याने त्यांच्यावर आणले नाही.

हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद :स्तोत्र   ५१:१-२,१०-११,१६-१७

प्रतिसाद : हे देवा, नम्र व पश्चात्तापी अंतःकरण तू झिडकारणार नाहीस.

१) हे देवा, तुझ्या प्रेमाखातर माझ्यावर दया कर. तुझ्या महान दयेला अनुसरून माझ्या अपराधाचे कलंक पुसून टाक. मला धुवून माझा दोष पूर्णपणे दूर कर. माझ्या पापांपासून मला शुद्ध कर.

२) देवा, माझ्याठायी शुद्ध अंत:करण निर्माण कर मला एक नवीन निष्ठावंत आत्मा दे. तुझ्या समोरून मला टाकून देऊ नकोस. माझ्यापासून तुझा पवित्र आत्मा काढून घेऊ नकोस.

३) यज्ञ केल्याने तू प्रसन्न होत नाहीस. नाहीतर तो मी केला असता. होमार्पणांचीदेखील तुला आवड नाही. देवा, तुला शरण आलेला हा आत्मा हाच माझा यज्ञ होय. नम्र व पश्चात्तापी अंत:करण तू झिडकारणार नाहीस,


जयघोष 

तुम्ही वाचावे म्हणून चांगल्याच्या मागे लागा, वाइटाच्या मागे लागू नका; म्हणजे तुम्ही म्हणता त्याप्रमाणे परमेश्वर, सेनाधीश देव, तुम्हांबरोबर असेल


शुभवर्तमान  लूक ११:२९-३२ 
वाचक : लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

लोकसमुदाय येशूजवळ एकत्र जमत असता तो म्हणू लागला, "ही पिढी दुष्ट पिढी आहे. ही चिन्ह मागते. परंतु योनाच्या चिन्हाशिवाय हिला दुसरे चिन्ह दिले जाणार नाही. कारण जसा योना निनवेकरांना चिन्ह झाला तसा मनुष्याचा पुत्र ह्या पिढीला होईल. दक्षिणेकडची राणी न्यायकाळी ह्या पिढीच्या लोकांबरोबर उठून त्यांना दोषी ठरवील. कारण शलमोनचे ज्ञान ऐकावयास ती पृथ्वीच्या सीमेपासून आली आणि पाहा, शलमोनपेक्षा थोर असा एक येथे आहे. निनवेचे लोक न्यायकाळी ह्या पिढीबरोबर उभे राहून हिला दोषी ठरवतील; कारण त्यांनी योनाच्या उपदेशावरून पश्चात्ताप केला आणि पाहा, योनापेक्षा थोर असा एक येथे आहे."

प्रभूचे हे शुभवर्तमान...

सर्व :  हे ख्रिस्त तुझी स्तुती असो.  


चिंतन : निनवे शहरातील लहानथोर सर्वजण, देवाच्या क्रोधाची ताकीद ऐकतात. आणि सुज्ञपणे व तत्परतेने प्रतिसाद देतात. आपले अयोग्य वागणे पदरात घेतात व अनैतिक मार्गापासून दूर राहाण्याचा निश्चय करतात. कडक उपवास व प्रायश्चित घेतात. राजा व प्रजा सर्वजण आपल्या पापी जीवनशैलीचा त्याग करुन सन्मार्ग धरतात, व देवाच्या दयेला ते पात्र ठरतात. जेव्हा दयाळू परमेश्वर आम्हाला परिवर्तनासाठी साद घालतो. तेव्हा आम्ही निनवेच्या लोकांप्रमाणे मनापासून प्रतिसाद देतो का ?

प्रार्थना : : हे प्रभू येशू, योना आणि शलमोना पेक्षा थोर असा तू परमेश्वर देवपुत्र आहेस. तुझ्या वचनाप्रमाणे आचरण करण्यास आमचे अत:करण उघड व प्रेरणा दे, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या