उपवास काळातील
पहिला सप्ताह
गुरूवार
२५ फेब्रुवरी २०२१
धन्यवादीत राणी मारिया
(रक्तसाक्षी )
देवाला आपल्या सर्व गरजा माहित आहेत पण त्यासाठी देवाकडे योग्य प्रकारे साकडे घातले पाहिजे. एस्तेर राणीने कळकळीने देवाकडे योग्य प्रकारे केलेल्या प्रार्थना देवाने ऐकल्या .
आपली मागणी जर पूर्ण होत नसेलतर आपण चिंतन करणे गरजेचे आहे. आपण चांगले शारीरिक आरोग्य मागतो व खाण्या-पिण्याच्या व सुख - समृद्धी मागतो . जीवनात सफलता, शांती, समाधान आणि मान - सन्मान हवा असतो, मात्र आपण देवाच्या आज्ञा पाळून त्याच्या वचनाप्रमाणे आचरण करीत आहोत का ? इतरांना क्षमा करायला तयार आहोत का ? प्रभूचा सुवर्ण नियम आहे की, 'लोकांनी जसे तुमच्याशी वागावे म्हणून तुमची इच्छा आहे तसेच तुम्ही त्यांच्याशी वागा.' आपण हा सुवर्ण नियम अमलात आणणे महत्वाचे आहे. आपण देवासमोर अनेक मागण्या मांडत असताना देवाची आपल्या जीवनातीलइच्छा जाणण्याचा प्रयत्न करायला हवा. प्रभू आपणास सर्व काही देण्यास तयार आहे, त्यासाठी आपण आपली भौतिक नव्हे तर आध्यात्मिक प्रगती साधण्याचा प्रयत्न करु या. दया, क्षमा, समेट, बंधुप्रेम व सेवा करण्यासाठी प्रेरणा मागू या.
✝️
"जो कोणी मागतो त्याला मिळते."
✝️
पहिले वाचन : एस्तेर १४:१,३-५,१२-१४
वाचक : एस्तेर या पुस्तकातून घेतलेले वाचन
एस्तेर राणीने मृत्यूच्या भयाने प्रभूचा आसरा घेतला आणि इस्राएलचा देव प्रभू परमेश्वर याच्याकडे प्रार्थना केली; ती म्हणाली, "हे माझ्या प्रभू परमेश्वरा, तूच आमचा राजा आहेस. एकाकी असलेल्या मला मदत कर. तुझ्याविना मला दुसरा कुठलाच आधार नाही. माझे जीवन तळहातावर ठेवून मी जगत आहे. हे प्रभो, मला माझ्या बालपणापासूनच माझ्या जातबांधवांपासून हे शिक्षण मिळाले आहे. सर्व राष्ट्रांमध्ये इस्राएलला त्याच्या सर्व पूर्वजांमधून माझ्या वाडवडिलांना आपल्या सार्वकालिक प्रजेच्या रूपाने आपले वारस केले आहे. त्यांच्याबरोबर जो करार केला होता तो तू पूर्ण करीत आला आहेस."
हे प्रभो, आमची आठवण ठेव. संकटकाळी आमच्यावर दयादृष्टी ठेव. सर्वोच्च आणि सर्वाधिकारसंपन्न ईश्वरा, मला धैर्य प्रदान कर. मी सिंहाच्या सामोरा जात आहे. माझ्या मुखात योग्य शब्द ठेव आणि त्याच्या हृदयात आमच्या शत्रूविषयी द्वेष उत्पन्न कर की, ज्यामुळे आमचा शत्रू आपल्या समर्थकांच्या बरोबर नष्ट होईल.
हे प्रभो, आपल्या हाताने आमचे संरक्षण कर आणि मला सहायता दे. हे प्रभू, तू सर्व काही जाणून आहेस. तुझ्याशिवाय मला दुसरा आधार नाही."
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद :स्तोत्र १३८:१-३,७-८
प्रतिसाद :प्रभो, मी तुझा धावा केला, तो तू ऐकलास.
१) हे प्रभो, मी अंत:करणाने तुझे आभार मानीत आहे. कारण माझा धावा तू ऐकला आहेस. देवदूतांसमोर मी तुझी स्तुती गाईन. तुझ्या पवित्र मंदिरात मी तुझा सन्मान करीन.
२) तुझे अपुर्व प्रेम आणि सत्यप्रतिज्ञतेमुळे मी तुला धन्यवाद देत आहे. ज्या दिवशी मी तुझा धावा केला, त्याच दिवशी तू तो ऐकलास व मला आत्मबळ प्रदान केलेस.
३) आपला हात पुढे करून तू मला वाचवलेस. तुझा हात माझे रक्षण करीत असतो. हे प्रभो, तुझे प्रेम अनंतकाळ आहे. आपल्या सृष्टीचे रक्षण करण्याची कृपा कर.
जयघोष
मनुष्य केवळ भाकरीने नव्हे, तर परमेश्वराच्या मुखातून निघणार्या प्रत्येक वचनाने जगेल.
शुभवर्तमान मत्तय ७:७-१२
वाचक : मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, “मागा म्हणजे तुम्हांला दिले जाईल. शोधा म्हणजे तुम्हांला सापडेल, ठोका म्हणजे तुमच्याठायी उघडले जाईल. कारण जो कोणी मागतो त्याला मिळते. जो शोधतो त्याला सापडते व जो ठोकतो त्याच्यासाठी उघडले जाते. आपल्या मुलाने भाकर मागितली तर त्याला धोंडा देईल आणि मासा मागितला तर त्याला साप देईल, असा तुमच्यात कोण माणूस आहे ? मग तुम्ही वाईट असताना आपल्या मुलाबाळांना चांगल्या देणग्या देणे तुम्हांला समजते, तर तुमच्या स्वर्गातील पित्याजवळ जे मागतात त्यांना तो किती विशेषकरून चांगल्या देणग्या देईल.
ह्या करिता लोकांनी जसे तुमच्याशी वागावे म्हणून तुमची इच्छा आहे तसेच तुम्ही त्यांच्याशी वागा, कारण नियमशास्त्र व संदेष्ट्यांचे ग्रंथ हेच होत."
प्रभूचे हे शुभवर्तमान...
सर्व : हे ख्रिस्त तुझी स्तुती असो.
चिंतन : आजचे शुभवर्तमान आपल्याला येशूने सांगितलेल्या सोनेरी नियमाची आठवण करून देते. इतरांनी तुम्हांला जसे वागवावे असे तुम्हांला वाटते, तसेच तुम्हीही त्यांच्याशी वागा. आपण स्वतःवर प्रेम करून सर्वोत्तम गोष्टींची अपेक्षा धरतो. तसेच इतरांवर प्रेम करताना, त्यांना सर्वोत्तम ते मिळू दे अशी आपली प्रार्थना असावी. याबाबत एस्तेर राणीने सुंदर आदर्श घालून दिला. स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवून तिने इस्राएल प्रजेसाठी मनोभावे प्रार्थना केली व तिची मागणी देव पित्याने मान्य केली.
प्रार्थना : हे प्रभु परमेश्वर,यथाकाळी आम्हास तुझ्या इच्छेप्रमाणे आचरण करण्यास व योग्य ते वरदान मागण्यास प्रेरणा दे, आमेन.
0 टिप्पण्या