सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद :स्तोत्र १३०:१-८
प्रतिसाद : हे परमेश्वरा, तू अधर्म लक्षात आणशील, तर तुझ्यापुढे कोण टिकाव धरील?
१) हे परमेश्वरा, मी शोकसागरातून तुझा धावा करीत आहे. हे प्रभू, माझी वाणी ऐक.माझ्या विनवणीच्या शब्दांकडे तुझे कान लागोत.
२) हे परमेश्वरा, तू अधर्म लक्षात आणशील, तर तुझ्यापुढे कोण टिकाव धरील? तरी पण लोकांनी तुझे भय धरावे म्हणून तुझ्याठायी क्षमा आहे.
३) मी परमेश्वराची अपेक्षा करतो, माझा जीव अपेक्षा करतो आणि मी त्याच्या वचनाची आशा धरतो. पहाटेची वाट पाहणाऱ्या पहारेकऱ्यापेक्षा माझा जीव प्रभूची अधिक वाट पाहतो.
४) हे इस्राएल, परमेश्वराची आशा धर. कारण परमेश्वराच्या ठायी दया आहे. त्याच्याजवळ उद्धार विपुल आहे. तो इस्राएलला त्याच्या सर्व अधर्मांपासून मुक्त करील.
जयघोष
प्रभू म्हणतो, पश्चात्ताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे.
शुभवर्तमान मत्तय ५:२०-२६
वाचक : मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
येशूने आपल्या शिष्यांना म्हटले, "मी तुम्हाला सांगतो, शास्त्री व परुशी ह्यांच्यापेक्षा तुमचे नीतिमत्व अधिक झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही.
खून करू नको. जो कोणी खून करील तो न्यायसभेच्या दंडास पात्र होईल, असे प्राचीन लोकांना सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हांला सांगतो, जो कोणी आपल्या भावावर रागावेल तो न्यायसभेच्या शिक्षेस पात्र होईल. जो कोणी आपल्या भावाला, 'अरे वेडगळा!' असे म्हणेल तो वरिष्ठ सभेच्या शिक्षेस पात्र होईल आणि जो कोणी त्याला अरे मूर्खा !' असे म्हणेल, तो नरकाग्नीच्या शिक्षेस पात्र होईल. ह्यास्तव तू आपले दान अर्पिण्यास वेदीजवळ आणीत असता आपल्या भावाच्या मनात आपल्याविरुद्ध काही आहे असे तेथे तुला स्मरण झाले, तर तेथेच वेदीपुढे आपले दान तसेच ठेव आणि निघून जा; प्रथम आपल्या भावाबरोबर समेट कर, मग येऊन आपले दान अर्पण कर. वाटेवर तुझा वादी तुझ्याबरोबर आहे तोच त्याच्याशी सलोखा कर, नाहीतर वादी तुला न्यायधीशाच्या हाती देईल. न्यायाधीश तुला शिपायांच्या हाती देईल आणि तू तुरुंगात पडशील. मी तुला सत्य सांगतो. दमडीन् दमडी फेडीपर्यंत तू त्याच्यातून सुटणारच नाही."
प्रभूचे हे शुभवर्तमान...
सर्व : हे ख्रिस्त तुझी स्तुती असो.
चिंतन : जुने जाऊ दया मरणालागूनि, जाळूनि किंवा पुरुनी टाका' या काव्यपंक्तीनुसार ख्रिस्ती व्यक्तीचे वर्तन असावे. आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू आम्हाला खरे नीतिमत्व कसे असावे हे सांगत आहे. आपल्याला कुणी दुखविले तर राग व संतापाच्या आहारी जाऊन उपमर्द करणे. त्याला अयोग्य शद्धांनी हीनविणे हे बंधुत्त्वाचे लक्षण नाही. आपल्या मनात दुष्टत्वाची व सूडाची भावना भरून येत असेल तर आपले अर्पण देवाला मान्य होऊ शकणार नाही. म्हणूनच बंधुभगिनीबरोबर सलोख्याने वागणे हेच शहाणपण आहे. तेच ख्रिस्ती अनुयायाचे जीवन आहे.
प्रार्थना : हे परमेश्वरा, तू कृपाळू, दयाळू आणि न्यायी आहेस. आमच्याठायी पश्चातापी हृदय निर्माण कर, आमेन.
0 टिप्पण्या