Marathi Bible Reading | 1st Week of Lent Saturday 27th February 2021

 उपवास काळातील 


पहिला सप्ताह 


शनिवार 


२७ फेब्रुवरी  २०२१




दुःखी मातेचा संत गाब्रियल
वर्तनसाक्षी (१८३८-१८६२)

वयाच्या २४ व्या वर्षी मृत्यूने त्याला अकस्मात गाठले व २७ फेब्रुवारी १८६२ रोजी तो मरण पावला. 
त्यांच्या मृत्यूनंतर चमत्कारांना व परिवर्तनांना ऊत आला. त्यामुळे त्याच्या संतीकरणाची प्रक्रिया नेहमीपेक्षा लवकर सुरू करण्यात आली व त्याच्या वृद्ध भावाच्या उपस्थितीत १९२० साली त्याला संत म्हणून घोषित करण्यात आले.
संत गाब्रियल हा आजच्या युवकांचा मुख्य आश्रयदाता संत आहे आणि व्रतस्थ जीवन सुरू करणाऱ्या नवशिष्यांचा तो आदर्श आहे.

चिंतन : माझ्या हृदयातील एखादा हेतू जरी देवाच्या प्रेमाखातर ठोका देत  नसेल तर तो उपटून फेकून देण्यास मी तयार आहे."  - दुःखी मातेचा संत गाब्रिएल

आपण सर्वजण परमेश्वर  पित्याची लेकरे आहोत म्हणूनच जसा परमेश्वर पिता दयाळू आहे तसेच आपणहि असावे ही परमेश्वराची इच्छा आहे. देव प्रीति आणि शोजार प्रीतिची कास प्रत्येकाने धरावी म्हणून आवाहन करण्यात आले आहे. ईश्वरावरील श्रद्धेचा आणि नीतिमत्तेचा अभाव ह्यामुळे आपण देवापासून बहकतो. मात्र देवाच्या आज्ञा पाळल्याने व त्याच्या शब्दाप्रमाणे आचरण करण्याने आपण देवाची मुले बनत असतो.  प्रभू येशू दैवी प्रेम व सर्वांगपूर्ण शील ह्या संबंधाने आज मार्गदर्शन करीत आहे, 'तुम्ही स्वर्गातील पित्याचे पुत्र व्हावे.' परमेश्वराठायी भोदभाव नसून तो सर्वांवर सारखाच प्रेम करीत असतो,  वैऱ्यांवर प्रीति करण्यासाठी मन खूप मोठ असाव लागते. त्याचप्रमाणे| जे आपला छळ करतात व आपल्यावर अन्याय करतात त्यांच्यासाठी प्रार्थना हाच एकमेव चांगला मार्ग आहे. प्रभूने दिलेली ही शिकवण आपल्याला परिपूर्णतेकडे नेणारी आहे. देवाची लायक मुले बनण्यास व त्याच्या प्रीतिचे  साक्षीदार बनण्यास आपण प्रेरणादायी जीवन जगू या.

✝️

"जसा तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण आहे तसे तुम्ही पूर्ण व्हा."

✝️

पहिले वाचन :अनुवाद  २६:१६-१९
वाचक : अनुवाद या पुस्तकातून घेतलेले वाचन 

"तू परमेश्वर आपला देव ह्याची पवित्र प्रजा होशील."

मोशेने लोकांना म्हटले, "हे विधी व नियम तू पाळावे अशी आज्ञा आज तुझा देव परमेश्वर तुला करीत आहे म्हणून ते तू जिवेभावे व काळजीपूर्वक पाळ. परमेश्वर हा आपला देव आहे असे मान्य करून तू आज वचन दिले आहे की, मी तुझ्या मार्गानी चालेन. तुझे विधी, आज्ञा व नियम पाळीन आणि तुझा शब्द मानीन आणि परमेश्वरानेही आज मान्य केले आहे. तुला संगितल्याप्रमाणे तू माझी खास प्रजा झाली आहेस. तू माझ्या सर्व आज्ञा पाळ, म्हणजे मी निर्माण केलेल्या सर्व राष्ट्रांपेक्षा प्रशंसा, नावलौकिक आणि सन्मान ह्या बाबतीत तुला श्रेष्ठ करीन आणि माझ्या म्हणण्याप्रमाणे तू परमेश्वर आपला देव ह्याची पवित्र प्रजा होशील.

हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद :स्तोत्र ११९:१-२, ४-५,७-८

प्रतिसाद जे प्रभूच्या धर्मशास्त्रानुसार वागतात, ते धन्य!

१) ज्याचे आचरण शुद्ध आहे, जे प्रभूच्या धर्मशास्त्रानुसार वागतात, ते धन्य! जे त्याची शिकवण आचरतात, अगदी मनापासून त्याचा शोध करतात, ते धन्य होत.

२) प्रभू तुझे आदेश आम्ही निष्ठापूर्वक पाळावेत. म्हणून तू ते आम्हांला देऊन ठेवले आहेत. तुझ्या नियमांप्रमाणे आचरण राखण्याकडे माझी प्रवृत्ती असली तर बरे.

३) तुझे न्याय्य संकेत मला समजू लागतील. तसा मी सरळ मनाने तुला धन्यवाद देईन. मी तुझे नियम पाळीन,  मला कधीच अंतर देऊ नकोस.


जयघोष 

जे वचन ऐकून सालस व चांगल्या अंत:करणात धरून ठेवतात आणि धीराने फळ दे जातात, ते धन्य होत.


शुभवर्तमान मत्तय  ५:४३-४८

वाचक : मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

    येशूने आपल्या शिष्यांना म्हटले, "आपल्या शेजाऱ्यांवर प्रीती करा व आपल्या वैऱ्याचा द्वेष करा, असे सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हांला सांगतो, तुम्ही आपल्या वै्यांवर प्रीती करा आणि जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. तुम्ही आपल्या स्वर्गातील पित्याचे पुत्र व्हावे; कारण तो वाइटावर व चांगल्यावर आपला सूर्य उगवतो आणि नीतिमानांवर व अनीतिमानांवर पाऊस पाडतो. जे तुमच्यावर प्रीती करतात त्यांच्यावर तुम्ही प्रीती केली तर तुमचे प्रतिफळ काय? जकातदारही तसेच करतात ना? आणि तुम्ही आपल्या बंधुजनांना मात्र प्रणाम करीत असला तर त्यात विशेष ते काय करता? परराष्ट्रीयही तसे करतात ना? ह्यास्तव जसा तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण आहे तसे तुम्ही पूर्ण व्हा."

प्रभूचे हे शुभवर्तमान...

सर्व :  हे ख्रिस्त तुझी स्तुती असो.  


चिंतन : आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू पर्वतावरील प्रवचनाचे अंतःरंग आम्हाला उघडून दाखवत आहे. शेजाऱ्यावर प्रेम करा व शत्रूचा द्वेष करा या जुन्या आज्ञेचा उच्चार करताना, अन्याय व जुलूम करणाऱ्याना क्षमा करा. शत्रूप्रती सूडाची भावना बाळगू नका असे प्रभू येशू सांगत आहे. जुना नियम बाजुला सारा आणि नव्या प्रीतीच्या नियमाची कास धरा. द्वेष व तिरस्कार याद्वारे शत्रूला वागवू नका तर प्रेमाने व नम्रभावाने वागा. क्रुसावरून याच शिकणुकीचा आदर्श प्रभूने आम्हांला घालून दिला आहे. या आदर्शाचे पालन करण्याचा निश्चय करूया.

प्रार्थना : हे प्रेमळ बाप्पा, तुझ्या पूर्णतेत आम्ही एकमय व्हावे व तुझी निवडलेली लाडकी प्रजा बनावेत म्हणून आम्हाला तुझ्या कृपेने भर, आमेन. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या