सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद :स्तोत्र ११६:१०,१५-१९
प्रतिसाद :जिवंतांच्या भूमीवर मी परमेश्वरासमोर चालेन.
१) "मी फार पीडित आहे" असे मी म्हणतो तरी देवावर माझी श्रद्धा आहे. परमेश्वराच्या दृष्टीने त्याच्या भक्तांचे मरण अमोल आहे.
२) हे परमेश्वरा, मी दास आहे. खरोखर मी तुझा दास आहे. तू माझी बंधने सोडली आहेत. मी तुला उपकारस्मरणाचा यज्ञ अर्पीन मी तुझ्या नावाने हाक मारीन.
३) मी परमेश्वराला केलेले नवस त्याच्या सर्व लोकांसमक्ष फेडीन. परमेश्वराच्या मंदिराच्या अंगणात, हे येरुशलेमा, तुझ्यामध्ये मी ते फेडीन.
दुसरे वाचन रोमकरांस पत्र ८:३१-३४
वाचक :पौलचे रोमकरांस पत्र यातून घेतलेले वाचन
बंधूजनहो, देव आपणांला अनुकूल असल्यास आपणांला प्रतिकूल कोण? ज्याने आपल्या स्वत:च्या पुत्राला राखून न ठेवता त्याला आपणा सर्वांकरिता समर्पण केले, तो त्याच्याबरोबर आपल्याला सर्व काही कसे देणार नाही ? देवाच्या निवडलेल्या लोकांवर दोषारोप कोण ठेवील ? देवच नीतिमान ठरविणारा आहे तर दंडाज्ञा करणारा कोण? जो मेला इतकेच नाही, तर मेलेल्यातून उठला आहे, जो देवाच्या उजवीकडे आहे आणि जो आपल्यासाठी मध्यस्थीही करीत आहे तो ख्रिस्त येशू आहे.
जयघोष
तेजस्वी मेघातून पित्याची वाणी ऐकू आली, "हा माझा प्रिय पुत्र आहे. ह्याचे तुम्ही ऐका."
शुभवर्तमान मार्क ९:२-१०
वाचक : मार्कलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"हा माझा प्रिय पुत्र आहे."
येशूने पेत्र, याकोब व योहान ह्यांना आपणाबरोबर एका उंच डोंगरावर एकीकडे नेले व तेथे त्याच्यादेखत त्याचे रुपांतर झाले. त्याची वस्त्रे चकचकीत व इतकी पांढरी शुभ्र झाली की तितकी पांढरी शुभ्र करणे पृथ्वीवरील कोणाही परिटाला शक्य नाही. तेव्हा मोशेसह एलिया त्यांच्या दृष्टीस पडला. ते येशूबरोबर संभाषण करीत होते. तेव्हा पेत्र येशूला म्हणाला, "गुरुजी, आपण येथे आहोत हे चांगले आहे. तर आम्ही तीन मंडप उभारू. आपणासाठी एक, मोशेसाठी एक व एलियासाठी एक." काय बोलावे हे त्याला सुचले नाही. कारण ते भयभीत झाले होते. तेव्हा एक मेघ आला व त्याने त्यांच्यावर छाया केली आणि मेघातून अशी वाणी झाली "हा माझा प्रिय पुत्र आहे, याचे तुम्ही ऐका." मग त्यांनी अकस्मात सभोवती पाहिले पण येशूशिवाय त्यांना आपणाजवळ आणखी कोणी दिसले नाही.
नंतर ते डोंगरावरून उतरत असता त्याने त्यांना निक्षून आज्ञा केली की, तुम्ही जे पाहिले आहे ते मनुष्याचा पुत्र मृतांमधून पुन्हा उठेपर्यंत कोणालाही कळवू नका. हे बोलणे मनात ठेवून मृतांमधून पुन्हा उठणे म्हणजे काय ह्याविषयी ते एकमेकांस विचारू लागले.
प्रभूचे हे शुभवर्तमान...
सर्व : हे ख्रिस्त तुझी स्तुती असो.
चिंतन : आजच्या शुभवर्तमानात आपल्यासमोर येशूच्या रूपांतराचा प्रसंग वर्णन करण्यात आलेला आहे. त्याद्वारे ह्या प्रायश्चित्तकाळात आपण जी आध्यात्मिक साधना व शिस्त पाळायला हवी त्याविषयी ख्रिस्तसभा आपल्या श्रद्धावंतांना एकूण ७ टप्प्यांत मार्गदर्शन करते.
१) एकांतः सहा दिवस लोकांतात घालवून त्यांची सेवा करणारा येशू आता एकांतात प्रभू परमेश्वराच्या सहवासात वेळ घालविण्यासाठी एका उंच डोंगरावर जातो. डोंगर हे देव-मानवाच्या भेटीचे स्थळ आहे हे मोशे, एलिया, आब्राहाम व आता येशू ह्यांच्या जीवनातून स्पष्ट होते.
२) सामुदायिक जीवन : येशू डोंगरावर एकटाच जात नाही. तो पेत्र, याकोब व योहान ह्यांना सोबत घेतो. आध्यात्मिक जीवन व सामुदायिक जीवन ह्यांच्यात सुसंगती असायला हवी असेच जणू येशू सुचवितो.
३) ईश्वर अनुभव : तिथे त्यांच्यादेखत येशूचे रुपांतर झाले. येशूचे दैवी रुप व त्याचे पवित्र जीवन ह्याचे दर्शन शिष्यांना घडले. येशू हा साक्षात परमेश्वर आहे असा अनुभव त्यांना आला.
४) भूतकाळाकडे पाहण्याची नवी दृष्टी: मोशे व एलिया हे जुन्या करारातील नियमशास्त्र व संदेष्टयांच्या ग्रंथांचे प्रतिनिधी म्हणून तिथे अवतरतात. शिष्यांनी हा भूतकाळ येशूच्या नवीन शिकवणुकीच्या प्रकाशात तपासून पाहावा हा धडा ते शिकत होते.
५) आध्यात्मिक आसक्तीचा मोहः ते दृश्य पाहताच पेत्राला तीन मंडप उभारण्याचा मोह होतो. मात्र गौरवाच्या शिखरावर असताना माणसाने आपले हातपाय मातीने बनलेले आहेत ह्याचे भान ठेवायचे असते. येशूला कालवारीच्या दुःखसहनाचे वेध लागले होते. प्रार्थनेतील शांती व आनंद ह्यांचा आस्वाद घेत असताना व्यावहारिक जीवनातील व्यथा वेदनांकडून पळून जाण्याचा मोह माणसाने टाळायचा असतो.
६) ईश्वरी कृपेची छाया: मेघाने त्यांच्यावर छाया केली. अशी छाया परमेश्वराने इस्राएली लोकांवर वाळवंटातील प्रवासात केली होती. आपल्याला अशी ईश्वरी कृपेची छाया कुठे लाभते ते माणसाने तपासून पाहायचे असते.
७) परमेश्वराची वाणी : अशी परमेश्वराची वाणी येशूच्या बाप्तिस्म्याच्या वेळी ऐकू आली होती. ख्रिस्ती माणसाच्या बाप्तिस्म्याच्या वेळी व्यक्ती देवाचे लेकरू बनत असते. प्रायश्चित्तकाळात पुन्हा त्याची आठवण करून दिली जाते. इस्टरच्या जागरणविधीत बाप्तिस्म्याच्या वचनांचे नूतनीकरण केले जाते.
आत्मपरीक्षण : परमेश्वराचा जवळून अनुभव घेण्यासाठी मी एकांतात जाण्याची सवय लावून घेतली आहे का? येशूच्या रूपांतर प्रसंगातील कोणता टप्पा मला विचार करायला लावतो?
मननासाठी शास्त्रवाचन : 'हा माझा परमप्रिय पुत्र आहे, ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे. ह्याचे तुम्ही ऐका.
प्रार्थना : हे प्रभू येशू, तुज ठायी रूपांतरित जीवन जगून तुझ्या वैभवात सहभागी होण्यास व तुझी साक्ष जगाला देण्यास प्रेरणा व कृपा दें, आमेन.
0 टिप्पण्या