सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद :स्तोत्र ७९:८-९,११-१३
प्रतिसाद : प्रभो, आमच्या दुष्कृत्यांनुसार आमची परतफेड करू नकोस.
१) आमच्या वाडवडिलांचे अपराध आठवून आम्हांला शासन करू नकोस. तुझ्या करुणेची सावली आमच्यावर लवकर पडू दे. कारण आमची अतिशय दैन्यावस्था झाली आहे.
२) आमच्या उद्धारक देवा, तुझ्या नामाचा महिमा व्हावा म्हणून आम्हांला मदत कर. हे आमच्या प्रभू परमेश्वरा, तुझे नाव राखले जावे म्हणून आमची सुटका कर आणि आमच्या पापांची क्षमा कर.
३) आम्हा बंदिजनांचे उसासे तुझ्या कानी पडून देत. मरणाच्या दाढेत सापडलेल्यांची आपल्या महासामर्थ्याने सुटका कर. हे स्वामी, आमच्या शेजारच्या. राष्ट्रांनी केलेल्या तुझ्या नालस्तीची भरपाई सातपटीने त्यांच्या पदरी घाल. मग तुझ्या कुरणातला जणू कळप अशी आम्ही तुझी प्रजा, तुला सदैव धन्यवाद देऊ. तुझी कीर्ती पिढ्यान्पिढ्या वर्णीत राहू.
जयघोष
मी उठून आपल्या बापाकडे जाईन व त्याला म्हणेन, "बाबा, मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्याविरुद्ध पाप केले आहे."
शुभवर्तमान लूक ६:३६-३८
वाचक : लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
येशूने आपल्या शिष्यांना म्हटले, "जसा तुमचा पिता दयाळू आहे तसे तुम्हीही दयाळू व्हा. तुम्ही कोणाचे दोष काढू नका, म्हणजे तुमचे दोष कोणी काढणार नाही. कोणाला दोषी ठरवू नका म्हणजे तुम्हांला कोणी दोषी ठरवणार नाही. क्षमा करा म्हणजे तुमची क्षमा होईल. द्या म्हणजे तुम्हांला दिले जाईल. चांगले माप दाबून, हालवून व शीग भरून तुमच्या पदरी घालतील. कारण ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हांला परत काढून देण्यात येईल."
प्रभूचे हे शुभवर्तमान...
सर्व : हे ख्रिस्त तुझी स्तुती असो.
चिंतन : आपला स्वर्गीय पिता प्रेमळ व दयास्वरूप आहे. आपल्या लेकरांवर तो उदंड दयावृष्टी करतो. कारण परमेश्वराला दया करायला आवडते. तथापि, जाणीवपूर्वक त्याला नाकारणाऱ्या दुष्ट व कुटील पिढीची तो गय करणार नाही. येशू म्हणतो शोधा म्हणजे सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल तसेच द्या म्हणजे तुम्हांस अनेक पटीने मिळेल. दानधर्माची महती विशद करताना येशू आज आपणास नीतीने जगण्याचे नियम घालून देत आहे. मानवी हृदयात जेव्हा दयेचे पाझर फुटतात तेव्हा समोरील व्यक्तीचे सर्व अपराध त्या पाझरात विरघळून जातात. द्वेषाच्या शुष्क व वैराण वाळवंटात क्षमेचे हिरवे कोंब उगवतात, माणुसकी व प्रेमाची उब अंकुरांची जोपासना करते आणि अंतःकरणात खऱ्या सात्विक शांतीची बाग फुलते. द्वेषाकडून थेट शांतीकडे पोहचणारा हा भावरथाचा प्रवास दयासागर परमेश्वराच्या दिव्य अस्तित्वाची, सान्निध्यात अनुभूती देतो. आणि परमेश्वरा प्रमाणे आपण ही दयाळू बनण्यास सुरुवात होते.
प्रार्थना : हे दयाळू परमेश्वरा, तुझ्या परिपूर्णतेत सहभागी होण्यास आम्ही पात्र बनावेत म्हणून आम्हाला प्रेरणा व कृपा दे, आमेन.
0 टिप्पण्या