सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद :स्तोत्र ५०:८-९,१६-१७,२१-२३
प्रतिसाद : सरळमार्गी मनुष्याला मी देवाच्या मुक्तीचे दर्शन घडवीन.
१) तुझ्या यज्ञाबद्दल मी तुला दोष देत नाही तुझी होमार्पणे सतत माझ्यासमोर असतात. तुझ्या घरचा गोऱ्ह किंवा तुझ्या कळपातले बकरे घ्यायची मला गरज नाही.
२) माझ्या आज्ञा जाहीर करून तुला काय करायचे आहे ? तुझ्या तोडी माझा करार कशाला? तुला तर शिस्तीचा तिटकारा आहे. मी बोलतो तेव्हा तू तोंड फिरवतोस.
३) या गोष्टी तू केल्यास तरीदेखील मी गप्प बसू काय ? तुला वाटते मी तुझ्यासारखाच आहे. आभारप्रदर्शनरूपी यज्ञ करणारा माझे गौरव करता. सरळमार्गी मनुष्याला मी देवाच्या मुक्तीचे दर्शन घडवीन.
जयघोष
देवाने जगावर एवढी प्रीती केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला; अशासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.
शुभवर्तमान मत्तय : २३:१-१२
वाचक : मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
येशू लोकसमुदायांस व आपल्या शिष्यांस म्हणाला, "शास्त्री व परूशी हे मोशेच्या आसनावर बसले आहेत. म्हणून ते जे काही तुम्हांस सांगतील ते सर्व आचरीत व पाळीत जा. परंतु त्यांच्या कृतीप्रमाणे करू नका, कारण ते उपदेश करतात पण तसे आचरण करत नाहीत. जड अशी ओझी बांधून ते लोकांच्या खांद्यांवर देतात, परंतु ती काढण्यास ते स्वतः बोटही लावावयाचे नाहीत. आपली सर्व कामे लोकांनी पाहावी म्हणून ते ती करतात. ते आपली मंत्रपत्रे रुंद व आपले गोंडे मोठे करतात. जेवणावळीतील श्रेष्ठ स्थाने, सभास्थानातील श्रेष्ठ आसने, बाजारात नमस्कार घेणे व लोकांकडून गुरुजी म्हणवून घेणे त्यांस आवडते. तुम्ही तरी आपणास गुरुजी म्हणवून घेऊ नका, कारण तुमचा गुरु एक आहे व तुम्ही सर्व भाऊभाऊ आहा. पृथ्वीवरील कोणाला आपला पिता म्हणू नका, कारण तुमचा पिता एक आहे. तो स्वर्गीय आहे. तसेच आपणास स्वामी म्हणवून घेऊ नका, कारण तुमचा स्वामी एक आहे. तो ख़िस्त होय. पण तुमच्यामध्ये जो मोठा असेल त्याने तुमचा सेवक व्हावे. जो कोणी स्वतःला उंच करील तो नमविला जाईल आणि जो कोणी स्वतःला नमवील तो उंच केला जाईल."
प्रभूचे हे शुभवर्तमान...
सर्व : हे ख्रिस्त तुझी स्तुती असो.
चिंतन : धार्मिकविधी जेव्हा कर्मकांड बनू लागतो तेव्हा धर्माला एक प्रकारची ग्लानी येते. देवाचे कार्य करताना ते ईश्वरनिष्ठ असावे, व्यक्तिनिष्ठ असू नये कारण जी सुवार्ता पवित्र आत्मा आपल्या ओठांमधून बाहेर आणतो ते शब्द देवाचे आहेत, आपले नव्हेत. याचे सदैव भान असावे. श्रद्धा महत्वाची असली तरी तिला कृतीची जोड असावी. वर्तनामध्ये दिखाऊपणा येऊ लागला की, श्रद्धा उथळ होत जाते. उलटपक्षी, नम्रपणे, सेवाभावी वृत्तीने जेव्हा चांगली कृत्ये आपल्या हातून घडू लागतात तेव्हा आपल्या द्वारे परमेश्वराचा गौरव होत असतो. देवाला हेच अभिप्रेत आहे. फुलांफळांनी डवरलेली फांदी जेव्हा भाराने वाकते, तेव्हा पाहणाऱ्याला उदात्त सौंदर्याचे मनोज्ञ दर्शन घडते. जेव्हा भाविकजन अध्यात्माच्या भाराने लीन होऊन वाकतात तेव्हा त्यांच्या देहबोलीतून ईश्वराचे प्रत्ययकारी दर्शन घडते. जे अंतःकरणाचे लीन ते धन्य.
प्रार्थना : हे प्रभू येशू, नम्र अंत:करणाने समर्पित जीवनाद्वारे तुझी सेवा करण्यास आम्हाला प्रेरणा दे, आमेन.
0 टिप्पण्या