सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र ३१:५-६,१४-१७
प्रतिसाद : प्रभो, आपल्या वात्सल्यामुळे माझा बचाव कर.
१) माझ्यासाठी त्यांनी गुपचूप पसरलेल्या जाळ्यातून मला सोडव. कारण तूच मला आसरा देणारा दुर्ग आहेस. मी आपला आत्मा तुझ्या स्वाधीन करतो. हे प्रभू, सत्यस्वरूप देवा, तूच माझा उद्धार करणार आहेस.
२) अनेकांची कुजबुज माझ्या कानावर येत आहे भोवती भीतीचे वातावरण आहे. ते माझ्याविरुद्ध खलबत करत आहेत. माझा जीव घ्यायचा त्यांनी बेत केला आहे.
३) प्रभो, मी तर तुझ्यावर भरवसा ठेवून आहे. मी म्हणतो, "तूच माझा देव, माझे बरेवाईट तुझ्याच हातात आहे. माझा पिच्छा पुरविणारे व माझे शत्रू, ह्याच्या हातून मला सोडव."
जयघोष
हे प्रभो, तुझे शब्द, आत्मा आणि जीवन आहेत. तुझे शब्द सार्वकालिक जीवन देणारे आहेत.
शुभवर्तमान मत्तय : २०:१७-२८
वाचक : मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
येशू वर येरुशलेमास जाण्याच्या बेतात असता त्याने बारा शिष्यांना वाटेत एकीकडे नेऊन म्हटले, “पाहा, आपण वर येरुशलेमास जात आहो आणि मनुष्याच्या पुत्राला मुख्य याजकांच्या व शास्त्रांच्या हाती धरून देण्यात येईल. ते त्याला मरणदंड ठरवतील आणि थट्टा करायला, फटके मारायला व क्रूसवर खिळायला त्याला परराष्ट्रीयांच्या स्वाधीन करतील आणि तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठवला जाईल."
तेव्हा जब्दीच्या मुलांच्या आईने आपल्या मुलांसह त्याच्याकडे येऊन त्याच्या पाया पडून त्याच्याजवळ काही मागणी केली. त्याने तिला विचारले "तुला काय पाहिजे ?" ती त्याला म्हणाली, "तुमच्या राज्यात ह्या माझ्या दोघा मुलांतील एकाने तुमच्या उजवीकडे व एकाने डावीकडे बसावे अशी आज्ञा करा." येशू म्हणाला, "तुम्ही काय मागता हे तुम्हास समजत नाही. जो प्याला मी पिणार आहे तो तुम्हाला पिता येईल काय?" ते त्याला म्हणाले, "पिता येईल." त्याने त्यांना म्हटले, "माझा प्याला तुम्ही प्याल खरा, पण माझ्या उजवीकडे व माझ्या डावीकडे बसण्याचा अधिकार देणे माझ्याकडे नाही, तर ज्याच्यासाठी माझ्या पित्याने हा सिद्ध केला त्याच्यासाठी तो आहे." ही गोष्ट ऐकून दहा शिष्यांना त्या दोघा भावांचा राग आला.
पण येशूने त्यांना बोलावून म्हटले, “परराष्ट्रीयांवर त्यांचे अधिपती प्रभुत्व चालवतात व मोठे लोकही अधिकार करतात, हे तुम्हांला ठाऊक आहे. तसे तुम्हांमध्ये नाही; तर जो कोणी तुम्हांमध्ये श्रेष्ठ होऊ पाहतो तो तुमचा सेवक होईल आणि जो कोणी तुम्हांमध्ये पहिला होऊ पाहतो तो तुमचा दास होईल. ह्याप्रमाणे मनुष्याचा पुत्र सेवा करून घ्यायला नाही, तर सेवा करावयास व पुष्कळांच्या खंडणीसाठी आपला प्राण अर्पण करायला आला आहे."
प्रभूचे हे शुभवर्तमान...
सर्व : हे ख्रिस्त तुझी स्तुती असो.
चिंतन : सत्य व सत्ता ही दोन परस्परविरोधी टोकं आहेत. जिथे सत्य नाही तिथे अहंभाव उत्पन्न होतो.सत्याशिवाय मिळालेली सत्ता इतरांना तुच्छ लेखू पाहते. प्रभूच्या राज्याला सत्याचे अधिष्ठान आहे. ते राज्य सेवा करण्याचे आहे, अधिकार गाजविण्याचे नाही. सत्य कटू असते म्हणून सत्याचा पुरस्कार करणाऱ्यांना नेहमी या ऐहिक जगात छळ सोसावा लागतो. दमन, दहन व दफन सत्य लपवू शकत नाही. सत्याला मूठमाती दिली तरी ते हजारो पटीने उगवते. कारण... देह नश्वर आहे. आत्मा चिरंतन सत्य आहे. मनुष्यत्वाच्या चौकटीत राहून देवत्व साकारणे महाकठीण काम आहे. मात्र अशक्य मुळीच नाही. प्रभूयेशू मनुष्यधारी असूनही देवत्त्व त्यापासून कधीच अंतरले नाही. जगात राहून जगाचे न होणे असा निर्लेप व निरलस दृष्टीकोन ईश्वराशी तादात्म्य पावलेल्या भक्तांनाच मिळू शकतो.
प्रार्थना :हे प्रभू येशू, नम्रता, सहनशीलता, दया, परोपकार व सेवाभाव आमच्यामध्ये वाढीस लावा, आमेन.
0 टिप्पण्या