Marathi Bible Reading | 2nd Week of Lent Thursday 4th March 2021

उपवास काळातील


दुसरा  सप्ताह 


गुरुवार 


४ मार्च २०२१

संत कासिमीर

(- राजपुत्र, वर्तनसाक्षी)

वयाच्या ९ व्या वर्षातच कासिमीर ह्याने आपल्या तीक्ष्ण बुद्धीमतेची आणि पवित्र जीवनाची चमक दखविली होती. तो तासन् तास व बंद असलेल्या देवळासमोर गुडघे टेकून प्रार्थना करण्यात मग्न असे. कधी कधी संपूर्ण रात्रभर तो त्या अवस्थेत प्रार्थनेमध्ये गुंग होऊन जाई.  तशात तो वरचेवर उपवास करायचा. जमिनीवर झोपायचा आणि केवळ एकच केसाळ शर्ट वापरायचा. गरिबांविषयी त्याच्या मनात अपार करूणा भरून राहिलेली होती. त्यामुळे लवकरच त्याला गरीब व दीनदुबळे ह्यांचा संरक्षक व कैवारी" असा किताब मिळाला.

कासिमीर ह्याची पवित्र मरियेवर दृढ श्रद्धा होती. मरियेला तो 'चांगली आई' या नावाने संबोधित असे. कॅटरबरीच्या संत आन्सेल्म ह्याने रचलेले मरियास्तोत्र तो गुडघे घालून वारंवार आळवीत असे.   वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी त्याने आपला देह ठेवला. पवित्र मरियेने त्याला त्याच्या मृत्यूची पूर्वकल्पना खूप आधीच देऊन ठेवली होती. पोप एड्रियन सहावे ह्यांनी १५२२ रोजी त्याला संतपद बहाल केले.

त्याच्या मृत्यूनंतर १२० वर्षांनी त्याचा देह न कुजलेल्या व अविनाशी अवस्थेत आढळला. तो पोलंड आणि लिथुआनिया ह्यांचा आश्रयदाता संत आहे आणि प्लेगच्या आजाराच्या वेळी त्याची मध्यस्थी केली जाते.

आजच्या शुभवर्मानातील दाखल्यावर चिंतन करीत असताना  देवावरील भाव आणि श्रद्धा तपासून पाहू या. स्वत:बरोबरच आपण इतरांच्या  दुःखाचा विचार करू या, केवळ जागतिक सुखासाठी न धडपडता प्रभू येशूची सार्वकालिक जीवनाची शिकवण अमलात  आणू या  परोपकार, सेवा, समेट, शांती व प्रेमाचा पुरस्कार करुन आपण प्रभू येशूला अपेक्षित ख्रिस्ती जीवन जगणार आहोत तरच गरीब लाझरस सारखे सार्वकालिक जीवन मिळणार आहे. 

✝️

"मुला, तू  आयुष्यात  सुख भरून पावलास, तसा लाजर  दुःख भरून पावला, ह्याची आठवण कर; आता ह्याला येथे समाधान मिळत आहे व तू   क्लेश भोगीत आहेस.

✝️

पहिले वाचन : यिर्मया  १७:५-१०
वाचक : यिर्मया या पुस्तकातून घेतलेले वाचन 


परमेश्वर असे म्हणतो, "जो इसम मनुष्यावर भिस्त ठेवतो, मानवाला आपला बाहू करतो व ज्याचे अंत:करण परमेश्वरापासून फिरले आहे तो शापित आहे. तो वैराणातल्या झुडपासारखा होईल व जे कल्याण होईल ते तो पाहणार नाही. अरण्यातील रुक्ष स्थळे, क्षारभूमी व निर्जन प्रदेश यात तो वस्ती करील. जो पुरुष परमेश्वरावर भाव ठेवतो, ज्याचा भावविषय परमेश्वर आहे तो धन्य. तो जलाशयाजवळ लावलेल्या वृक्षासारखा होईल. तो आपली मुळे नदीकिनारी पसरील. उन्हाची झळई येत असली तरी तिला तो भिणार नाही. त्याची पाने हिरवी राहतील. अवर्षणाच्या वर्षी त्याला चिंता पडणार नाही. तो फळे देण्याचे सोडणार नाही." हृदय सर्वात कपटी आहे. ते असाध्य रोगाने ग्रस्त आहे. त्याचा भेद कोणाला समजतो? प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या करणीप्रमाणे प्रतिफळ देण्यास मी परमेश्वर हृदय चाळून पाहतो; अंतर्याम पारखतो.

हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र  १:१-४,६

प्रतिसाद प्रभूवर भिस्त ठेवणारा मनुष्य धन्य.

१) जो मनुष्य दुर्जनांच्या सल्ल्याप्रमाणे चालत नाही. पाप्यांच्या वाऱ्याला उभा राहत नाही किंवा देवनिंदकांच्या बैठकीत सामील होत नाही, तर उलट प्रभूच्या धर्मशास्त्रात रमतो त्याच्या धर्मशास्त्राचे रात्रंदिवस मनन करतो, तो धन्य. 

२) वाहत्या पाण्याजवळ एखादे झाड लावलेले असते, यथाकाळी त्याला बहर येतो , ज्याची पाने कोमेजत नाहीत, अशा झाडासारखा तो असतो. तो हाती घेतो ते सर्व सफल होते.

३) पण दुर्जनांचे तसे मुळीच नाही!  वाऱ्याने उडून जाणाऱ्या भुशासारखे ते आहेत. सज्जनांच्या मार्गावर प्रभूचे लक्ष असते; परंतु दुर्जनांचा मार्ग विनाशाकडे जातो.

जयघोष 

प्रभू म्हणाला, "मी जगाचा प्रकाश आहे. जो मला अनुसरतो त्याच्याजवळ जीवनाचा  प्रकाश राहील."


शुभवर्तमान लूक १६:१९-३१

वाचक : लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 


येशू परुश्यांना म्हणाला, कोणीएक श्रीमंत मनुष्य होता. तो जांभळी व तलम वस्त्रे घालीत असे आणि दररोज थाटामाटाने ख्यालीखुशाली करीत असे. त्याच्या दरवाजाजवळ फोडांनी भरलेला लाजर नावाचा एक दरिद्री माणूस पडलेला होता. त्या श्रीमंताच्या मेजावरून खाली पडेल त्यावर आपले पोट भरावे अशी त्याची इच्छा असे. शिवाय कुत्री येऊन त्याचे फोड चाटीत असत. पुढे दरिद्री माणूस मेला आणि देवदूतांनी त्याला आब्राहामच्या उराशी नेऊन ठेवले. श्रीमंतही मेला व त्याची उत्तरक्रिया करण्यात आली. तो अधोलोकात यातना भोगीत असताना त्याने आपली दृष्टी वर करून आब्राहाम व त्याच्या उराशी बसलेला लाजर ह्यांना दुरून पाहिले तेव्हा त्याने हाक मारून म्हटले, हे बापा आब्राहाम, माझ्यावर दया करुन लाजरला पाठव, त्याने आपल्या बोटाचे टोक पाण्यात बुडवून माझी जीभ थंड करावी; कारण ह्या जाळात मी क्लेश भोगीत आहे. आब्राहाम म्हणाला, "मुला, तू आपल्या आयुष्यात आपले सुख भरून पावलास, तसा लाजर आपले दुःख भरून पावला, ह्याची आठवण कर; आता ह्याला येथे समाधान मिळत आहे व त क्लेश भोगीत आहेस. एवढेच नव्हे तर जे इकडून तुम्हाकडे पार जाऊ पाहतात त्यांना जाता येऊ नये व तिकडून कोणी आम्हांकडे येऊ नये म्हणून आमच्या व तुमच्यामध्ये मोठी दरी स्थापलेली आहे." मग तो म्हणाला, "तर बापा, मी विनंती करतो, त्याला माझ्या बापाच्या घरी पाठव. कारण मला पाच भाऊ आहेत. त्यांनी तरी ह्या यातनेच्या स्थळी येऊ नये म्हणून त्याने त्यास इकडची साक्ष द्यावी." पण आब्राहामने त्याला म्हटले, "त्याच्याजवळ मोशे व संदेष्टे आहेत; त्याचे त्यांनी ऐकावे." तो म्हणाला, "हे बापा आब्राहाम, असे नाही; पण मेलेल्यांमधून कोणी त्याच्याकडे गेला तर ते पश्चात्ताप करतील." तेव्हा त्याने त्याला म्हटले, ते मोशेचे व संदेष्ट्यांचे ऐकत नसतील तर मेलेल्यांमधूनही कोणी उठला तरी त्यांची खात्री होणार नाही.

प्रभूचे हे शुभवर्तमान...

सर्व :  हे ख्रिस्त तुझी स्तुती असो.  


चिंतन :   प्रत्येकाच्या सुखाच्या कल्पना वेगवेगळ्या असतात. माणसाला आपल्या अक्कल हुशारीचा व संपत्तीचा गर्व वाटू लागतो तेव्हा तो उत्पन्नकर्त्या परमेश्वराला विसरतो. स्वतःच्या सामर्थ्याच्या जोरावर जग जिंकण्याची ईर्ष्या बाळगतो आणि संवेदनशून्य बनून बेजबाबदारपणे वागू लागतो. अशा दुर्जनांना परमेश्वर योग्य वेळी त्याची जागा दाखवतो. या उलट प्रामाणिकपणे कष्ट उपसून संपूर्णपणे परमेश्वरावर भिस्त ठेवणारा सज्जन देवाला प्रसन्न करतो व जीवनातील कुठलीही विपरीत परिस्थिती त्याला अस्थिर करू शकत नाही. कारण देव त्याचा पाठीराखा व सोबती बनलेला असतो. संवेदना, सहवेदना व कळवळा हे परमेश्वराचे दुसरे सुप्त रूप असते. इतरांप्रती अंत:करणात द्रवणारा देवाचे प्रतिबिंब आहे. अशा ईश्वरनिष्ठ भाविकांचे रक्षण व कल्याण स्वर्गातून केले जाते. मात्र स्वार्थलोलूप व अहंकारी मनुष्याचा देव निषेध करतो.

प्रार्थना :हे परमेश्वरा, तुझ्या आज्ञा पाळून सार्वकालिक जीवनाकडे वाटचाल  करण्यास आम्हाला प्रेरणा दे, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या