सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र १०५:१६-२१
प्रतिसाद : प्रभूची अद्भुत कृत्ये आठवा.
१) इजिप्त देशावर प्रभूने दुष्काळ आणला. त्यांच्या अन्नधान्याचा पुरवठा पार तोडून टाकला. त्याच्या अगोदर त्याने एक मनुष्य पुढे पाठवला. तो म्हणजे गुलाम म्हणून विकण्यात आलेला योसेफ!
२) त्यांनी त्याचे पाय साखळ्यांनी जखडले, गळ्याभोवती लोखंडी कडे अडकवले, पुढे योसेफने वर्तवलेले भविष्य खरे ठरले. प्रभूच्या वचनानुसार त्याचे म्हणणे बरोबर ठरले.
३) इजिप्तच्या राजाने माणसे पाठवून त्याला मुक्त केले. राष्ट्राच्या अधिपतीने त्याची सुटका केली. त्याने त्याला आपल्या राज्याचा सत्ताधीश आणि आपल्या सर्वस्वावर अधिकारी नेमले.
जयघोष
प्रभू म्हणतो, पुनरुत्थान व जीवन मीच आहे आणि जिवंत असलेला प्रत्येकजण जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीही मरणार नाही.
शुभवर्तमान मत्तय २१:३३-४३,४५-४६
वाचक : मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
येशूने मुख्य याजक आणि लोकांच्या वडीलजनांना म्हटले, "आणखी एक दाखला ऐकून घ्या. कोणी एक गृहस्थ होता. त्याने द्राक्षमळा लावला. त्याभोवती कुंपण घातले. त्यामध्ये द्राक्षरसासाठी कुंड खणले व माळा बांधला आणि तो माळ्यांना लावून देऊन आपण परदेशी गेला. नंतर फळांचा हंगाम आल्यावर त्याने आपले फळ घेण्याकरिता आपल्या दासांना माळ्यांकडे पाठवले. तेव्हा माळ्यांनी त्याच्या दासांना धरून कोणाला ठोक दिला, कोणाला जिवे मारले व कोणाला धोंडमार केला. त्याने फिरून पहिल्यापेक्षा अधिक असे दुसरे दास पाठवले. त्यांच्याशीही ते तसेच वागले. शेवटी माझ्या मुलाचा ते मान राखतील, असे म्हणून, त्याने आपल्या मुलाला त्याच्याकडे पाठवले. परंतु माळी मुलाला पाहून आपसात म्हणाले, हा वारस आहे; चला, आपण ह्याला ठार मारू व ह्याचे वतन घेऊ. तेव्हा त्यांनी त्याला धरून द्राक्षमळ्याबाहेर काढून ठार मारले. तर मग द्राक्षमळ्याचा धनी येईल तेव्हा तो त्या माळ्यांचे काय करील?" ते त्याला म्हणाला, "तो त्या दुष्टांचे हालहाल करून त्यांचा नाश करील आणि जे माळी हंगामी त्याला फळ देतील अशा दुसऱ्यांकडे तो द्राक्षमळा लावून देईल." येशू त्यांस म्हणाला, "जो दगड बांधणाऱ्यांनी नापसंत केला, तोच कोनशिला झाला;" हे परमेश्वराकडून झाले आणि ते आमच्या दृष्टीने आश्चर्यकारक आहे, असे शास्त्रात तुमच्या वाचण्यात कधी आले नाही काय? म्हणून मी तुम्हांला सांगतो, “देवाचे राज्य तुम्हांपासून काढून घेतले जाईल व जी प्रजा त्याचे फळ देईल तिला ते दिले जाईल." मुख्य याजक व परुशी त्याचे दाखले ऐकून, हा आम्हांविषयी बोलत आहे असे समजले. ते त्याला धरायला पाहात होते, परंतु त्यांना लोकसमुदायाची भीती वाटली; कारण ते त्याला संदेष्टा मानत होते.
प्रभूचे हे शुभवर्तमान...
सर्व : हे ख्रिस्त तुझी स्तुती असो.
चिंतन : माणसाचा द्वेष विकोपाला गेला की, तो रक्ताची नाती देखील कशी विसरतो याचे उत्तम उदाहरण योसेफाच्या कथेमधून पाहायला मिळते. कुठल्याही थराला जाऊन दुसऱ्यांचे हिरावून घेणे, लुबाडणे ही दुष्ट माणसांची प्रवृत्ती. येशू दाखल्याद्वारे अशाप्रकारच्या अपप्रवृत्तीच्या दांभिक शास्त्रीपरूश्यांची कान उघडणी करताना त्यांच्या पुढे होणाऱ्या दुर्दशेचे भाकित वर्तवितो आणि त्यांना गर्भित इशारा देतो. दुसऱ्यांचे वतन हिरावून घेतल्यामुळे आपले पतन होते. प्रभूच्या मळ्यातील आपण एक रोपटे आहोत. मोठ्या मायेने त्याने आपली लागवड केली. बाप्तिस्म्याच्या वेळी कृपेच्या झऱ्याने व सामर्थ्यशाली तैलांभ्यंगाने आपली मशागत केली. पवित्र आत्म्याच्या निगराणीखाली प्रायश्चित्त साक्रामेंताने आपली छाटणी करून संगोपन केले. अशासाठी की आपण भरपूर फळ द्यावे. परंतु हंगामाच्या वेळी आपण फळ दिले नाही तर आपल्याला देण्यात आलेली कृपा तो फळ देणाऱ्या झाडांना देईल.
प्रार्थना :हे प्रभू येशू, तुझ्या योजनेला योग्य तो प्रतिसाद देण्यास व परिवर्तनशील जीवन जगण्यास प्रेरणा दे, आमेन.
0 टिप्पण्या