Marathi Bible Reading | 2nd Week of Lent Saturday 6th March 2021

उपवास काळातील

दुसरा  सप्ताह 

शनिवार 

६ मार्च २०२१



संत कॉलेट

(-   कुमारिका )

परमेश्वर अधर्माची क्षमा करितो कारण त्याला दया करण्यात आनंद वाटतो. आजच्या मिखा संदेष्ट्याचा इस्त्राएलाविषयी हा करुणेचा संदेश सर्वांना आशादायी आहे.

आज प्रभू येशू उधळ्या मुलाचा दाखला देऊनपित्याचे प्रेमळ हृदय किती करुणामय असते हे स्पष्ट करीत आहे. व्यसन,  वासना व चैनबाजी करुन सर्वस्व गमावून बसलेला निराश मुलगा शुद्धीवर येतो  आणि माघारी फिरुन आपल्या बापाकडे परत येतो. परत येत असताना, 'बापाने त्याला पाहिले आणि त्याला त्याचा कळवळा आला.' आपला बहकलेला मुलगा परत येईल ह्या आशेने वाट पाहणाऱ्या बापाला तो आल्यावर कळवळा आला, कारण बाप प्रेमळ आणि क्षमाशील आहे. आपल्या सभोवताली अनेक भाऊ असतील त्यांना प्रेरणादायी असा हा दाखला आहे. तर दुसरीकडे वात्सल्य स्वरुप बाप जो नेहमीच आपल्या मुलाचे हीत साधण्यात व त्यांच्या  चुकांवर पांघरुण घालून नव्याने जीवन जगण्यास प्रेरणा देत आहे. परमेश्वर दयाळू, प्रेमळ व क्षमा करण्यात आनंद मानीत असतो. आपण जीवनात देवापासून दूर गेलो तरी देव आपली परत येण्याची वाट पाहत असतो. विशेषतः जीवनात बहकलेले व निराश झालेल्या तरुणांना हा दाखला खूप प्रेरणादायी आहे. देवाच्या आपल्यावरील प्रीतित कधीच खंड पडत नाही. आपण पश्चात्तापी अंत:करणाने प्रभूला शरण जाऊ या. 

✝️


"बाबा, मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्याविरुद्ध पाप केले आहे. आता तुमचा मुलगा म्हणवून घेण्यास मी योग्य नाही."  

✝️

पहिले वाचन :मीखा  ७:१४-१५,१८-२० 
वाचक : मीखा या पुस्तकातून घेतलेले वाचन 


हे देवा, तू आकडी घेऊन आपल्या लोकांना चार, तुझ्या वतनातील मेंढरे कार्मेलच्या झाडीत एकांती राहतात त्यांना चार; प्राचीन काळच्या दिवसांप्रमाणे बाशानात व गिलादात त्यांना चरू दे. तू इजिप्त देशातून बाहेर निघालास त्या दिवसांप्रमाणे त्याला मी अद्भुत कृत्ये दाखवीन.

तुझ्यासमान देव कोण आहे? तू अधर्माची क्षमा करतो, आपल्या वतनाच्या अवशेषांचे अपराध मागे टाकतोस; तो आपला राग सर्वकाळ मनात ठेवणार नाही, कारण त्याला दया करण्यात आनंद वाटतो. तो वळून पुनः आम्हांवर दया करील. तो आमचे अपराध पायांखाली तुडवील. तू त्याची सर्व पापे समुद्राच्या डोहात टाकशील. प्राचीन काळापासून तू आमच्या वडिलांना शपथपूर्वक सांगितल्याप्रमाणे याकोबबरोबर सत्यतेने व आब्राहामबरोबर वात्सल्याने वागशील.

हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र  १०३:१-४,९-१२

प्रतिसाद   परमेश्वर दयाळू व कृपाळू आहे.

१) हे माझ्या जिवा, परमेश्वराचा धन्यवाद कर; हे माझ्या सर्व अंतर्यामा, त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर. हे माझ्या जिवा, परमेश्वराचा धन्यवाद कर, त्याचे सर्व उपकार विसरु नको.

२) तो तुझ्या सर्व दुष्कर्माची क्षमा करतो, तो तुझे सर्व रोग बरे करतो, तो तुझा जीव विनाशगर्तेतून उद्धरतो, तो तुला दया व करुणा ह्यांचा मुकूट घालतो.

३) तो सर्वदाच दोष देत राहाणार नाही; तो आपला क्रोध सर्वकाळ राहू देणार नाही. आमच्या पातकांच्या मानाने त्याने आम्हाला शासन केले नाही, त्याने आमच्या दुष्कृत्यांच्या मानाने आम्हांला प्रतिफळ दिले नाही.

४) कारण जसे पृथ्वीच्यावर आकाश उंच आहे तशी त्याची दया त्याचे भय धरणाऱ्यांवर विपुल आहे. पश्चिमेपासून पूर्व जितकी दूर आहे, तितके त्याने आमचे अपराध आमच्यापासून दूर नेले आहेत.


जयघोष 

आताच समय अनुकूल आहे आजच तारणाचा दिवस आहे.



शुभवर्तमान लूक  १५:१-३,११-३२

वाचक : लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

सर्व जकातदार व पापी येशूचे ऐकायला त्याच्याजवळ येत होते, तेव्हा परुशी व शास्त्रीही अशी कुरकुर करू लागले की, "हा पाप्यांना जवळ करून त्यांच्याबरोबर जेवतो." मग त्याने त्यांना एक दाखला सांगितला :
कोणाएका मनुष्याला दोन मुलगे होते. त्यापैकी धाकटा बापाला म्हणाला, बाबा, मालमत्तेचा माझा वाटा मला द्या. तेव्हा त्याने आपल्या मिळकतीची त्यांच्यात वाटणी केली. मग फार दिवस झाले नाहीत तोच धाकटा मुलगा सर्व काही जमा करून दूर देशी निघून गेला आणि तेथे त्याने चैनबाजी करून आपली मालमत्ता उधळून टाकली. त्याने आपले सर्व खर्चून टाकल्यावर त्या देशात मोठा दुष्काळ पडला. तेव्हा त्याला अडचण पडू लागली. मग तो त्या देशातील एका रहिवाशाजवळ जाऊन त्याला चिकटून राहिला. त्याने त्याला आपल्या शेतात डुकरे चारायला लावले. तेव्हा डुकरे खात असत त्यातल्या शेंगा तरी खाऊन पोट भरावे अशी त्याला फार इच्छा होई. त्याला कोणी काही देत नसे. नंतर तो शुद्धीवर येऊन म्हणाला, माझ्या बापाच्या किती तरी मोलकऱ्यांना भाकरीची रेलचेल आहे आणि मी तर येथे भुकेने मरतो आहे. मी उठून आपल्या बापाकडे जाईन व त्याला म्हणेन, "बाबा, मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्याविरुद्ध पाप केले आहे. आता तुमचा मुलगा म्हणवून घेण्यास मी योग्य नाही. आपल्या एका मोलकऱ्याप्रमाणे मला ठेवा." मग तो उठून आपल्या बापाकडे गेला. तो दूर आहे तोच त्याच्या बापाने त्याला पाहिले आणि त्याला त्याचा कळवळा आला आणि धावत जाऊन त्याच्या गळ्यात गळा घालून त्याने त्याचे मुके घेतले. मुलगा त्याला म्हणाला, "बाबा, मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्याविरुद्ध पाप केले आहे. आता तुमचा मुलगा म्हणवून घेण्यास मी योग्य नाही." पण बापाने आपल्या दासांना सांगितले, "लवकर उत्तम झगा आणून ह्याला घाला. ह्याच्या हातात अंगठी व पायात जोडा घाला आणि पुष्ट वासरू आणून कापा; आपण खाऊ आणि आनंदोत्सव करू कारण हा माझा मुलगा मेला होता, तो पुन्हा जिवंत झाला आहे; हरवला होता, तो सापडला आहे." मग ते आनंदोत्सव करू लागले.

त्याचा वडील मुलगा शेतात होता; तो घराजवळ आला तेव्हा त्याने गायनवादन व नृत्य ह्यांचा आवाज ऐकला. तेव्हा त्याने एका चाकराला बोलावून विचारले, हे काय चालले आहे? त्याने त्याला सांगितले, तुमचा भाऊ आला आहे आणि तो तुमच्या वडिलांना सुखरूप परत मिळाला म्हणून त्यांनी पुष्ट वासरू कापले आहे.

तेव्हा तो रागावला व आत जाईना; म्हणून त्याचा बाप बाहेर आला व त्याची समजूत घालू लागला. परंतु त्याने बापाला उत्तर दिले. पाहा, मी इतकी वर्षे तुमची सेवाचाकरी करीत आहे आणि तुमची एकही आज्ञा मी कधीच मोडली नाही; तरी मला आपल्या मित्राबरोबर आनंदोत्सव करण्यासाठी तुम्ही कधी करडूही दिले नाही. पण ज्याने तुमची संपत्ती कसबिणींबरोबर खाऊन टाकली तो हा तुमचा मुलगा आला आणि तुम्ही त्याच्यासाठी पुष्ट वासरू कापले ! त्याने त्याला म्हटले, "बाळा, तू तर माझ्याबरोबर नेहमीच आहेस आणि माझे जे काही आहे ते सर्व तुझेच आहे. तरी उत्सव आणि आनंद करणे योग्य आहे; कारण हा तुझा भाऊ मेला होता, तो जिवंत झाला आहे; हरवला होता, तो सापडला आहे."

प्रभूचे हे शुभवर्तमान...

सर्व :  हे ख्रिस्त तुझी स्तुती असो.  


चिंतन :   आईवडिलांचे सुसंस्कार व अपार माया दुर्दैवाने वाहयात गेलेल्या त्यांच्या मुलांमुलींना एक ना एक दिवस मागे फिरण्यास भाग पाडतात. आपल्या जन्मदात्यांचा त्याग व प्रेम त्यांच्या अंतःकरणात त्यांना सतत खुणावित असतो. आपल्या परमेश्वरपित्याचे क्षितिजात कवेत घेणारे हृदय आपल्या प्रत्येकांसाठी माया व ममतेने ओसंडून वाहत आहे. आपण आपला मार्ग बदलून त्याच्या कुशीमध्ये शिरावे म्हणून आतुरतेने तो आपली वाट पाहत आहे. पारंपारिक वडिलोपार्जित मिळकत सांभाळून पुढच्या पिढीच्या हाती सुपूर्द करण्याची जबाबदारी मुलांची आहे. ती मिळकत गिळंकृत करण्यापेक्षा स्वकष्टाने व कर्तृत्वाने त्यामध्ये भर टाकणे आपले कर्तव्य आहे. वाडवडिलांनी गुरांढोरांबरोबर कष्ट उपसून प्रतिकूल परिस्थितीतही जपून ठेवलेली शेतीबागायती अविचाराने विकून दोन दिवसांची श्रीमंती उपभोगणारे उधळे पुत्र कसे रसातळात गेले हे आपण पाहिले आहे. आपण नक्की कोण आहोत? सुसंस्कार करणारे पालक की उधळपट्टी करणारी मुले ? यावर चिंतन करूया.

प्रार्थना:हे प्रभू परमेश्वरा, पश्चातापी अंत:करणाने चांगले कुमासर  करण्यास व परिवर्तीत जीवन जगण्यास मला प्रेरणा दे, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या