Marathi Bible Reading | THIRD SUNDAY OF LENT 7th March 2021

उपवास काळातील


तिसरा  रविवार 


७ मार्च २०२१







मानवाचे जीवन सुरळीत असावे व सर्वदा देवाच्या कृपेत वाढण्यासाठी  मोशेद्वारे देवाने दहा आज्ञा दिल्या. ख्रिस्तसभेने आजपर्यंत ह्या दहा आज्ञा प्रमाण मानून त्याची शिकवण दिली आहे. आज्ञा पाळणाऱ्यांना सार्वकालिक जीवन मिळेल व त्यांचा अवमान करणाऱ्यांना योग्य ते शासन होईल असे म्हटले आहे.  आपण सर्वजण चांगले कुमसार करण्यासाठी ह्या दहा आज्ञांवर चिंतन करु या. 

 प्रभू येशू ख्रिस्ताने मंदिराच्या आवारात व्यापार करणाऱ्या सर्व सराफांना मंदिरातून घालवून लावले व म्हटले, 'माझ्या  पित्याच्या घराची बाजारपेठ करु नका. ' आज सुद्धा अनेक ठिकाणी पवित्र मंदिराचे आवार बाजारपेठ झालेली आपण पाहतो. मंदिरात येणारी सर्वच माणसे प्रार्थना उपासनेसाठी येत नाहीत. त्यामुळे देवाच्या पवित्र स्थानाचा  अपमान होत असतो. प्रभू येशू सर्वांनाच आज पवित्र मंदिराचे पावित्र्य जपण्यास  आवाहन करीत आहे.

देवाच्या घरात त्याचे पावित्र्य राखले जावे, शांतता पाळली जावी, प्रार्थनेचे पोषक वातावरण निर्माण व्हावे आणि सर्वांना देवाचे दर्शन घडावे म्हणून प्रभूकडे  प्ररेणा व कृपा मागू या. 

✝️

"माझ्या पित्याच्या घराची बाजारपेठ करू नका."

✝️

पहिले वाचन : निर्गम २०:१-१७
वाचक : निर्गम या पुस्तकातून घेतलेले वाचन 


(देव हे सर्व शब्द बोलला. तो म्हणाला, "ज्याने तुला इजिप्त देशातून, दास्यगृहातून आणले तो मी परमेश्वर तुझा देव आहे. माझ्याखेरीज तुला वेगळे देव नसावेत.")
देव बोलला, आपल्यासाठी कोरीव मूर्ती करू नको. वर आकाशातील, खाली पृथ्वीवरील व पृथ्वीखालच्या जलातील कशाचीही प्रतिमा करू नको. त्याच्या पाया पडू नको किंवा त्याची सेवा करू नको; कारण मी तुझा देव परमेश्वर ईष्ष्यावान देव आहे. जे माझे द्वेष करतात त्याच्या मुलांना तिसऱ्याचौथ्या पिढीपर्यंत वडिलांच्या अन्यायाबद्दल मी शासन करतो आणि जे माझ्यावर प्रेम करतात व माझ्या आज्ञा पाळतात अशांच्या हजारो पिढ्यांवर मी दया करतो. (तुझा देव परमेश्वर ह्याचे नाव व्यर्थ घेऊ नको, कारण जो परमेश्वराचे नाव व्यर्थ घेईल त्याची तो गय करणार नाही. शब्बाथ दिवसाची आठवण ठेवून तो पवित्र पाळ.) सहा दिवस श्रम करून आपले सर्व कामकाज कर, पण सातवा दिवस तुझा देव परमेश्वर ह्याचा शब्बाथ आहे, म्हणून त्या दिवशी कोणतेही कामकाज करू नको. तू, तुझा मुलगा, तुझी मुलगी, तुझा दास, तुझी दासी, तुझी गुरेढोरे व तुझ्या वेशीच्या आत असलेला परका ह्यांनीही कामकाज करू नये. कारण सहा दिवसांत परमेश्वराने आकाश, पृथ्वी, समुद्र व त्यातील सर्वकाही निर्माण केले आणि सातव्या दिवशी विसावा घेतला. म्हणून परमेश्वराने शब्बाथ दिवसाला आशीर्वाद देऊन पवित्र केला.
(आपल्या बापाचा व आपल्या आईचा मान राख, म्हणजे जो देश तुझा देव परमेश्वर तुला देत आहे त्यात तू चिरकाल राहशील.
खून करू नको.
व्यभिचार करू नको.
चोरी करू नको.
आपल्या शेजाऱ्यांविरुद्ध खोटी साक्ष देऊ नको. आपल्या शेजाऱ्याच्या घराचा लोभ धरु नको; आपल्या शेजाऱ्याच्या स्त्रीची अभिलाषा धरू नको, आपल्या शेजाऱ्याचा दास दासी, बैल, गाढव अथवा त्याची कोणतीही वस्तू ह्यांचा लोभ धरू नको.

हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र  १९:८-११

प्रतिसाद  प्रभो, सार्वकालिक जीवनाची वचने आपणांजवळ आहेत.

१) परमेश्वराचे नियमशास्त्र पूर्ण आहे. ते पुनरुज्जीवन देते. परमेश्वराचा निर्बंध विश्वसनीय आहे. तो भोळ्यांना समंजस करतो.

२) परमेश्वराचे विधी सरळ आहेत. ते हृदयाला आनंदित करतात. परमेश्वराची आज्ञा चोख आहे. ती नेत्राला प्रकाश देते.

३) परमेश्वराचे भय शुद्ध आहे. ते सर्वकाळ टिकणारे आहे. परमेश्वराचे निर्णय सत्य आहेत. ते सदैव न्यायी आहेत.

४) ते सोन्यापेक्षा, बावनकशी सोन्याच्या राशीपेक्षा इष्ट आहेत. ते मधापेक्षा, मोहळातून पाझरणाऱ्या मधापेक्षा गोड आहेत.


दुसरे वाचन : १ करिंथकरांस  पत्र १:२२-२५

वाचक पौलचे करिंथकरांस पहिले पत्र यातून घेतलेले वाचन

    बंधुंनो, यहुदी चिन्हे मागतात व हेल्लेणी ज्ञानाचा शोध करतात. आम्ही तर क्रुसावर खिळलेला ख्रिस्त जाहीर करतो. हा यहुद्यांना अडथळा व हेल्लेण्यांना मूर्खपणा असा आहे खरा, परंतु पाचारण झालेल्या यहुदी व हेल्लेणी अशा दोघांसही देवाचे सामर्थ्य व देवाचे ज्ञान आहे; असा ख्रिस्त आम्ही जाहीर करतो. कारण देवाचा मूर्खपणा माणसाच्या ज्ञानाहून श्रेष्ठ आहे आणि देवाची दुर्बळता माणसांच्या बळाहून श्रेष्ठ आहे.

हा प्रभूचा शब्द आहे


जयघोष 

प्रभू म्हणतो, “पश्चात्ताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे,"


शुभवर्तमान योहान २:१३-२५

वाचक : योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

यहुद्यांचा वल्हांडण सण जवळ आला व येशू वर यरुशलेमेस गेला आणि मंदिरात गुरेमेंढरे व कबुतर विकणारे आणि सराफ हे बसलेले त्याला आढळले. तेव्हा त्याने दोऱ्याचा एक कोरडा करून मेंढरे व गुरे ह्या सर्वांना मंदिरातून घालवून दिले. सराफांचा खुर्दाही ओतून टाकला व चौरंग पालथे केले.
तो कबुतरे विकणाऱ्यांना म्हणाला, "ही येथून काढून घ्या; माझ्या पित्याच्या घराची बाजारपेठ करू नका." तेव्हा "तुझ्या मंदिराविषयीचा आवेश मला ग्रासून टाकील," असा शास्त्रलेख असल्याचे त्याच्या शिष्यांना आठवले. त्यावरून यहुदी त्याला म्हणाले, "तुम्ही हे करता तर आम्हांला तुमच्या अधिकाराचे काय चिन्ह दाखवता?" येशूने त्यांना उत्तर दिले, "तुम्ही हे मंदिर मोडून टाका आणि मी तीन दिवसांत ते उभारीन. ह्यावरून यहुदी म्हणाले, "हे मंदिर बांधायला शेहेचाळीस वर्षे लागली आणि तुम्ही हे तीन दिवसात उभारणार काय ?" तो तर आपल्या शरीररूपी मंदिराविषयी बोलला होता म्हणून तो असे म्हणत असे हे तो मेलेल्यातून उठल्यावर त्याच्या शिष्यांना आठवले, आणि त्यांनी शास्त्रावर व येशूने जे वचन सांगितले होते त्यावर विश्वास ठेवला. वल्हांडणाच्या सणात येरुशलेम येथे असताना जी चिन्हे तो करीत होता ती पाहून पुष्कळांनी त्याच्या नावावर विश्वास ठेवला. पण येशू सर्वांना ओळखून असल्यामुळे त्याला स्वत:ला त्यांचा भरवसा नव्हता. शिवाय मनुष्याविषयी कोणीही साक्ष द्यावी ह्याची त्याला जरुरी नव्हती; कारण मनुष्यात काय आहे हे त्याला स्वत:ला ठाऊक होते.

प्रभूचे हे शुभवर्तमान...

सर्व :  हे ख्रिस्त तुझी स्तुती असो.  


चिंतन :   कोणताही धर्म ह्या जगात टिकण्यासाठी चार गोष्टींची गरज असते  श्रद्धेचे घटक, उपासना, कायदेकानून आणि लोकसमुदाय. आजची तिन्ही वाचने याविषयी आपल्याला मार्गदर्शन करीत असताना दिसतात. 
१) परमेश्वराच्या दहा आज्ञाः आजच्या पहिल्या वाचनातील परमेश्वराच्या दहा आज्ञांपैकी पहिल्या तीन आज्ञा ह्या परमेश्वरावरील विश्वासाविषयी मार्गदर्शन करतात, तर उरलेल्या सात आज्ञा. शेजारप्रीतीविषयी म्हणजे सामुदायिक जीवनाविषयी मार्गदर्शन करतात. तिसऱ्या आज्ञेत (रविवार पवित्र पाळ) उपासना जीवनाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आलेले आहे. प्रायश्चित्तकाळात या दहा आज्ञा डोळ्यांसमोर ठेवून आपण आपल्या मनाची झडती घेऊन पश्चात्ताप करावा अशी अपेक्षा असते. 
२) प्रभू येशूचा क्रूस : क्रूस हे ख्रिस्ती धर्माचे प्रतीक आहे. तिथे देवप्रीतीच्या उभ्या खांबाला शेजारप्रीतीचा आडवा खांब छेदून गेलेला आहे. दुसऱ्या वाचनात संत पॉल आपल्याला क्रुसावर खिळल्या गेलेल्या ख्रिस्ताचा सार्थ अभिमान बाळगायला शिकवत आहे. प्रायश्चित्तकाळात पवित्र क्रुसाच्या वाटेची भक्ती गुड फ्रायडेला क्रूसवंदन अशा आध्यात्मिक साधना आपली श्रद्धा दृढ करण्यास हातभार लावीत असतात. 
३) जेरूसलेमचे पवित्र मंदिर : जेरूसलेमचे मंदिर हे केवळ यहुद्यांसाठीच नव्हे तर परराष्ट्रीयांसाठी प्रार्थनेचे घर होते परंतु यहुदी अधिकाऱ्यांनी व रोमन राज्यकर्त्यांनी तिथे बाजार मांडला होता. केवळ कर्मकांडात रमलेल्या लोकांवर येशूने आसूड, उगारला. येशूचा हा आवेश किंवा राग म्हणजे धर्माधता नव्हती किंवा तो वैयक्तिक रोष नव्हता तर प्रेषितीय सात्विक संताप होता. जेव्हा उदात्त हेतूंसाठी, मर्यादित वेळेपुरता माणूस रागावतो व त्यातून कुठलेही नुकसान न होता समाजाचा, धर्माचा फायदाच होतो तेव्हा तो राग हा सात्विक संताप असतो.

आत्मपरिक्षण : परमेश्वराच्या दहा आज्ञा, प्रभू येशूचा क्रूस आणि आपली विश्वव्यापी व स्थानिक ख्रिस्तसभा यांविषयी आपल्या मनात कोणत्या भावना आहेत? आपल्याला येणारा राग हा सात्विक संताप आहे का? कशावरून ? तो आपण कसा हाताळतो/ व्यक्त करतो?

मननासाठी शास्त्रवाचन : 'तुझा देव परमेश्वर ह्याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जिवाने, संपूर्ण बुद्धीने व संपूर्ण शक्तीने प्रीती कर', 'जशी स्वतःवर तशीच आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर.

प्रार्थना:हे प्रभू येशू, तुझ्या आज्ञा पाळण्यास व तुझ्या वचनाप्रमाणे आचरण  करण्यास कृपा दे, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या