Marathi Bible Reading | 3rd Week of Lent Monday 8th March 2021

 उपवास काळातील


तिसरा  सप्ताह 


सोमवार  


८ मार्च २०२१



देवभक्त संत जॉन

वर्तनसाक्षी (१४९५-१५५०)

जॉनचा जन्म मध्य पोर्तुगालमध्ये इ. स. १४९५ साली झाला. मात्र त्याचे बालपण स्पेनमधील ओरोपेझा या ठिकाणी एका गुराख्याच्या घरी गेले. इथंच तो लहानाचा मोठा झाला आणि एक उत्तम मेंढपाळ म्हणून नावारुपाला आला. त्याच्या साधेपणाला विश्वासूपणा आणि पावित्र्य ह्यांची जोड होती.

पुढे तो सैनिक म्हणून फ्रान्स येथे गेला.  धनगर म्हणून काम पाहू लागला.  काही काळ तो जिब्राल्टार येथे धार्मिक पुस्तके आणि चित्रे विकण्याचा
धंदा करीत होता. वयाच्या ४५ व्या वर्षी एका दृष्टांतामध्ये बाळ येशू त्याच्या दृष्टीस पडला. त्याने त्यास म्हटले, 'हे देवभक्ता जॉन ग्रानाडा हा तुझा क्रूस होईल.' 

त्याच्या ह्या छोट्या घराचा संपूर्ण कारभार तो एकटाच सांभाळीत असे. घराची स्वच्छता, स्वत:चा स्वयंपाक, कपडे धुणे, औषधांची व रुग्णांची देखभाल, त्यांचा दैनंदिन आहार इ. गोष्टींवर तो जातीने लक्ष देत असे. उरलेला वेळ रात्री जागरण करून प्रार्थना, मनन-चिंतन यामध्ये तो घालवित असे. कधी कधी त्याला आपल्या उदरनिर्वाहासाठी पैसे आणि अन्न मागत दारोदार फिरावे लागे. देवाने आपल्यावर इतके प्रेम केलेले आहे. मग आपण देवावरील प्रेमाखातर थोडा तरी त्याग करायला नको का? असे तो सर्वांना सांगत सुटे.
रात्री आसरा शोधत असलेल्यांना तो आपल्या घरात ठेवून घेई, अनाथ, विधवा, गरीब विद्यार्थी, वाकडे पाऊल पडलेल्या वा उपेक्षित, स्त्रिया ह्यांना तो अतिशय प्रेमाने वागवी. बेकारांना तो नोकरी शोधून देई. दुःखितांचे अश्रू पुसत व आनंदोत्सव करणार्यांना उत्तेजन देत तो इकडेतिकडे भटकत राही. आर्चबिशपांनी त्याच्या ह्या कार्याला पूर्ण पाठिंबा दिलेला होता. त्याच्या पावित्र्यपूर्ण जीवनाला चमत्काराचे भरपूर पीक आलेले होते.

मार्च १५५० रोजी वेदीसमोर गुडघे टेकून प्रार्थना करीत असताना त्याला अचानक मृत्यू आला इ.स. १६९० साली त्याला संतपद देण्यात आले. संत जॉन इस्पितळे, आजारी, पारिचारिका, छापखाने आणि पुस्तक विक्रेते ह्याचा तो आश्रयदाता संत आहे.
त्याने स्थापन केलेल्या हॉस्पीटलस ब्रदर्सना इटालीत बरीच लोकप्रियता मिळाली. आज जगातील विविध भागांमध्ये १०० हून अधिक इस्पितळे हे ब्रदर्स चालवित असतात.

चिंतन : हे प्रभो, तुझे काटे माझी गुलाबे आहेत आणि तुझे दु:खसहन माझा गौरव आहे म्हणूनच वेळ असेपर्यंत मी सर्व प्रकारची चांगली कामे अखंडितपणे करीत राहीन. मला तुझी शक्ती दे. - देवभक्त संत जॉन


इस्त्राएलमध्ये अलिशाच्या सांगण्यावरुन कोणीच बरे झाले नव्हते. कारण स्थानिक लोकांचा त्याच्यावर विश्वास नव्हता, नामान मात्र बरा झाला. प्रभू येशूने अनेक चमत्कार केले आणि देवराज्याची शिकवणूक दिली तरीही लोकांनी नासरेथात त्याला 'हा योसेफाचा पुत्र ना' अशा प्रकारे संबोधले.

✝️

"मी तुम्हांला सत्य सांगतो की, कोणताही संदेष्टा स्वदेशात मान्य होत नाही"

✝️

पहिले वाचन : २ राजे  ५:१-१५
वाचक : राजाच्या दुसऱ्या पुस्तकातून घेतलेले वाचन 

अरामच्या राजाचा सेनापती नामान हा एक प्रतिष्ठित गृहस्थ असून आपल्या स्वामीजवळ त्याचे मोठे वजन असे. कारण त्याच्यामुळेच परमेश्वराने अराम्यांना युद्धात विजयी केले होते. तसाच तो मोठा पराक्रमी वीर होता. परंतु त्याला कोड निघाले होते. एकदा अरामी टोळ्यांनी इस्राएली प्रदेशात छापा घालून एक लहान मुलगी कैद करून आणली होती. ती नामानच्या बायकोची दासी झाली होती. ती आपल्या स्वामिनीला म्हणाली, "आमच्या स्वामींनी शोमरोनातल्या संदेष्ट्याची गाठ घेतली तर बरे होईल! तो यांचे कोड बरे करील.” तेव्हा नामानने राजाकडे जाऊन सांगितले की, "इस्राएली प्रदेशातील ती मुलगी असे म्हणत आहे." जा तर 33 मग, अरामचा राजा म्हणाला, "मी इस्राएलच्या राजाला खलिता देतो.” तेव्हा दहा किक्कार रौप्यमुद्रा, सहा हजार सुवर्णमुद्रा (मोहरा) व दहा पोषाख घेऊन नामान निघाला. त्याने इस्राएलच्या राजाला खलिता सादर केला. त्यात लिहिले होते, "या पत्रासोबत मी आपणाकडे आमचे मानकरी नामान यांना पाठवत आहे, त्याचे कोड आपण घालवावे." मग असे झाले की, पत्र वाचताच इस्राएलच्या राजाने त्रागाने आपली वस्त्रे फाडली. तो म्हणाला, "या कोड फुटलेल्या माणसाला बरे करण्याकरिता या गृहस्थाने माझ्याकडे पाठवले आहे; पण मी जीवन आणि मरण देणारा देव का आहे ? पहा ना, माझ्याशी भांडायला हा काही तरी निमित्त पहात आहे."

इस्राएलच्या राजाने आपली वस्त्रे फाडली, हे देवभक्त अलिशाने ऐकले तेव्हा त्यने राजाला निरोप पाठवला, "आपण कशाला आपली वस्त्रे फाडलीत? त्याला येऊ द्या ना माझ्याकडे म्हणजे इस्राएलात संदेष्टा आहे हे त्याला समजेल." तेव्हा नामान आपले घोडे व रथ घेऊन अलिशाच्या दारी येऊन उभा रहिला. मग अलिशाने एक जासूद पाठवून त्याला सांगितले, यार्देनवर जाऊन सात वेळा स्नान कर म्हणजे तुझे शरीर पूर्ववत होऊन तु शुद्ध होशील. पण नामान रागावून निघाला आणि म्हणाला, "मला वाटले होते, तो मला भेटायला बाहेर येईल. जवळ उभे राहून आपल्या परमेश्वराचा धावा करील. रोगट जागेवरून हात फिरवून माझे कोड घालवील. दिमिष्कातल्या अबाना आणि पडपर या नद्या इस्राएलातल्या साऱ्या जलाशयांपेक्षा सरस नाहीत का ? त्यात स्नान करुन मला शुद्ध नाही का होता येणार ?" मग तो मागे फिरला व रागाच्या भरात चालता झाला. तेव्हा त्याचे हुजरे जवळ येऊन म्हणाले, "पिताजी, या संदेष्ट्याने एखादा जालीम उपाय सुचवला असता तर आपण तो केला नसता काय? तर तो म्हणतो, स्नान करा आणि शुद्ध व्हा, त्यात काय आहे?" तेव्हा त्या देवभक्ताच्या सांगण्याप्रमाणे याद्देनवर जाऊन त्याने सात वेळा बुडी मारली; त्याबरोबर त्याची अंगकांती लहान मुलासारखी निर्मळ झाली.
नंतर नामान आपल्या सर्व लवाजम्यासह त्या देवभक्ताकडे जाण्यास मागे फिरला.

हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र ४२:२,३;४२:३,४

प्रतिसाद मला देवाचे दर्शन कधी घडेल ?

१) हे देवा, पाण्याच्या प्रवाहासाठी एखादी हरिणी धापा टाकते तसाच माझा जीव तुझ्यासाठी धापा टाकीत आहे.

२) माझा जीव देवाकरिता, जिवंत देवाकरिता तान्हेला झाला आहे; मला देवाचे दर्शन कधी घडेल?

३) तुझे तेज, तुझे सत्य प्रकट कर; ते मला मार्गदर्शन करोत. तुझ्या पवित्र डोंगरावर तुझ्या निवासस्थानी घेऊन जावोत.

४) मग मी देवाच्या वेदीजवळ, देव जो माझा परमानंद, त्याच्याजवळ जाईन. हे देवा, माझ्या देवा, वीणेवर मी तुझे गुणगान गाईन.


जयघोष 

प्रभू म्हणतो, "मीच जगाचा प्रकाश आहे. जो मला अनुसरतो त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील."


शुभवर्तमान लूक  ४:२४-३०

वाचक : लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

येशू नाझरेथ गावी आला आणि सभास्थानातील लोकांना म्हणाला, "मी तुम्हांला सत्य सांगतो की, कोणताही संदेष्टा स्वदेशात मान्य होत नाही. आणखी मी तुम्हांला खरे ते सांगतो की, एलियाच्या काळी साडेतीन वर्षे आकाश बंद राहून सर्व देशात मोठा दुष्काळ पडला होता त्या काळी इस्राएलात पुष्कळ विधवा होत्या. तरी त्यातील एकीच्याकडेही एलियाला पाठवले नव्हते, तर सिदोन प्रदेशातील सारफथ येथील एका विधवेकडे मात्र त्याला पाठवले होते. तसेच अलिशा संदेष्ट्याच्या काळी इस्राएलात पुष्कळ कुष्ठरोगी होते; तरी त्याच्यातील कुणीही शुद्ध झाला नाही, तर सुरियाचा नामान मात्र शुद्ध झाला." हे ऐकत असताना सभास्थानातील सर्व लोक संतापले. त्यांनी उठून त्याला गावाबाहेर काढले आणि ज्या डोंगरावर त्याचे गाव वसले होते त्याच्या कड्यावरून त्याला लोटून देण्यास तेथवर नेले. पण तो त्यांच्यामधून निघून गेला.

प्रभूचे हे शुभवर्तमान...

सर्व :  हे ख्रिस्त तुझी स्तुती असो.  


चिंतन : परमेश्वराला आपल्या प्रत्येक लेकराची काळजी वाटते, आपली प्रत्येक व्यथा तो जाणून आहे. आपल्या संकटसमयी तो कुणाच्या तरी रूपाने आपणांस मदत करू इच्छितो. परंतु गर्विष्ठ व नतद्रष्ट माणसाला हे ईश्वरी संकेत कळत नाहीत. कारण त्याचे मन ईश्वरापासून बहकलेले असते. त्यामुळे अत्यंत अडचणीत असताना देखील तो आपला अहंकार सोडायला तयार होत नाही. ईश्वरी दया आपल्या ताठर स्वभावापेक्षा कितीतरी श्रेष्ट आहे. कर्मठ सनातनी व देवापुढे तोंडदेखलेपणा करणाऱ्या कपटी धर्ममार्तंडाना प्रभू येशू देवापुढे मान झुकविण्याचे आवाहन करीत आहे. गरिबांतल्या गरीब, कनिष्ठ, नगण्य अशा उपेक्षित लोकांकडे प्रभूचे आवर्जून लक्ष असते. माणसाने कितीही बढाया मारू देत, आपल्या अक्कल हुशारी व ताकदीचे कितीही प्रदर्शन करू दे. देवाच्या पुढे एका धुळीच्या कणाइतकेही त्याचे अस्तित्व नसते. परंतु देव या यःकिंचित अशा प्रत्येक माणसाची जातीने दखल घेतो. देवाचे भय बाळगून त्याची दया मागणार्या प्रत्येकाचे देव कल्याण करतो. माझा अहंकार माझ्या प्रगती आड कसा येतो त्यावर चिंतन करूया.

प्रार्थना : हे प्रभो परमेश्वरा, आमच्या परिसरातील लोकांचा योग्य तो सन्मान आम्हांला करता यावा आणि खऱ्या नेत्यांची ओळख व्हावी म्हणून आम्हांला कृपा दे, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या